वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी सरसावले नगरमधील निसर्गप्रेमी

वनक्षेत्रातील पाणवठ्याची दुरुस्ती करत सोडले वन्यप्राण्यांसाठी पाणी

नगर – वनक्षेत्रात सध्या सर्वत्र उन्हाची दाहकता वाढलेली आहे. त्यामुळे मुळे चारा पाण्यासाठी वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणात भटकंती होत आहे. नगर तालुयातील गुंडेगाव येथील वनविभागाच्या  फॉरेस्टमध्ये वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. या पाणवठ्यात सामाजिक बांधिलकी जपत नगर शहरातील सामाजिक संस्था असलेल्या निसर्ग
भ्रमंती ग्रुपने पाणवठ्याची दुरुस्ती केली व टँकरद्वारे १७ मार्च रोजी ५ हजार लिटर पाणी पाणवठ्यात टॅकरद्वारे सोडण्यात आले आहे.

या वर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच उष्णतेची तीव्रता लक्षात घेता सामाजिक बांधिलकीची जपत, वाढदिवसाचा  खर्च टाळून प्रत्येकाने जंगलातील पाणवठ्यात वन्य प्राण्यांसाठी पाणी सोडण्याचे आवाहन निसर्ग भ्रमंती ग्रुपचे विद्यासागर पेटकर यांनी वन्यप्रेमीना केले आहे. पाणवठ्यावर पाणी उपलब्ध झाल्याने जंगलातील वन्यजीव या पाणवठ्यांवरच तहान भागविणार आहेत. वन्यप्राण्यांना उन्हाळ्यातही पाण्याची मुबलकता राहणार आहे. तसेच वन्यजीवांचा पाण्याच्या शोधार्थ वनक्षेत्राबाहेर वावर कमी होणार आहे असे मत वन विभागाच्या अधिकार्‍यांनी यावेळी व्यक्त करत निसर्ग भ्रमंती ग्रुपचे आभार मानले. या उपक्रमासाठी निसर्ग भ्रमंती ग्रुपचे विद्यासागर पेटकर यांच्या सह प्रसाद खटावकर, निशिकांत
महाजन, धीरज खिस्ती, नितीन केदारी, रामा जगताप, प्रशांत पठारे, विनय कुलथे व ग्रुपचे इतर सदस्य यांचे सहकार्य लाभले.

यावेळी विद्यासागर पेटकर, वनपाल शैलेश बडदे, वनसंरक्षक मानसिंग इंगळे, वन कर्मचारी रमेश शेळके, रामचंद्र भोसले, वन्यजीव प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.

सावेडी उपनगरात २१ मार्चपासून भागवत कथा ज्ञान यज्ञास प्रारंभ

नगर – सावेडी उपनगरात माऊली सभागृहात २१ ते २७ मार्च पर्यंत अहिल्यानगर चिन्मय मिशन ने नगरकरांसाठी
श्रीमद भागवत कथा आयोजित केली असून या ज्ञान यज्ञाचा प्रारंभ शुक्रवारी सकाळी ९ वाजता सावेडीत प्रोफेसर कॉलनी
चौकात मिरवणुकीने करण्यात येणार आहे. दुपारी २ ते सायं. ६ पर्यंत नांदेड येथील चिन्मय मिशन प्रमुख व प्रवचनकार
स्वामी प्रत्ययानंद सरस्वती आपल्या अमृतमय रसाळ वाणीतून कथा सांगणार आहेत, अशी माहिती अहिल्यानगर चिन्मय मिशनचे अध्यक्ष अ‍ॅड. डी.डी. घोरपडे यांनी दिली. या भागवत कथा सप्ताहामध्ये स.७:१५ ते ८:१५ एक तास भजगोविंदम विषयावर प्रवचन होणार आहे. २१ ते २७ मार्च पर्यंत भागवत कथा श्रवणाचा  लाभ नगरकरांनी घ्यावा.
अशा या दुर्मिळ योगाचा, सुवर्णसंधीची फायदा, कथा ऐकणार्यांसाठी चिन्मय मिशन करून देत आहे.

कथा ऐकल्याने आपली पापां पासून मुक्ती होऊन मोक्ष मिळतो. अशी हि भागवत कथा आत्ममुक्तीचा मार्ग दाखवते. तेव्हा या कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिशनचे कार्यकारणी सदस्य हभप विद्याताई हारदे यांनी केले आहे. सप्ताहामध्ये भागवत आरती, प्रसादाचा लाभ सर्वांना मिळणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून या धार्मिक
कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन चिन्मय मिशनच्या वतीने करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित बालनाट्य प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ

नगर – बालनाट्य ही अभिव्यक्ती व खेळनाट्य व्हायला हवीत. अश्या शिबिरांमधूनच भविष्यात लेखक, दिग्दर्शक
व अभिनेते घडतील. जगाच्या पाठीवर कुठल्याही क्षेत्रामध्ये भरारी घेणारे, माणूसपण निर्माण करणारे, विवेकबुद्धी,  प्रामाण्यवादी व विवेकशील लेखन निर्माण करून कलाकारांनी सामाजिक सांस्कृतिक आरोग्य जपले पाहिजे.
राज्य शासनाचा बालनाट्य शिबिराचा हा उपक्रम निश्चितच चांगला आहे. त्याचा योग्य उपयोग बाल कलावंतांनी आपल्या अव्यक्त प्रतिभा व्यक्त करण्यासाठी करावा आणि जास्तीत जास्त बाल रसिक तयार व्हावेत. प्रत्येकच बालकलाकार नाटक
करेलच असे नाही परंतु नाटक बालकांपर्यंत गेलं पाहिजे. विशेषता बाल रंगभूमी ही ग्रामीण भागात रुजू व्हावी व वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी शिबिराच्या उदघाटनप्रसंगी केले. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सोमनाथ मुटकुळे, पी. डी. कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या
अहिल्यानगर उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर, शिबीर संचालक ज्येष्ठ रंगकर्मी अनंत जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पी. डी. कुलकर्णी आणि प्रा. प्रसाद बेडेकर यांनी मनोगतातून शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत शिबिराथींनी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी शिबीर संचालक अनंत जोशी, समन्वयक सागर मेहेत्रे, जालिंदर शिंदे, बाल रंगभूमी परिषदेचे सचिव प्रसाद भणगे, नाट्यकर्मी अविनाश कराळे उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित करण्यात आलेले बालनाट्य प्रशिक्षण शिबीर १७ ते २६ मार्च या १० दिवसांच्या कालावधीत सावेडी उपनगरातील माऊली सभागृहाच्या बेसमेंट हॉल होणार आहे. शिबिराचा समारोप शिबिरात सहभागी झालेल्या बालशिबिराथींना घेऊन बालनाट्य प्रयोग २७ मार्च रोजी माऊली सभागृहाच्या रंगमंचावर सादर होणार आहे. या उपक्रमासाठी सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हे शिबीर संपूर्णतः निशुल्क या उपक्रमात मुलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

मानवसेवेतून ईश्वर प्राप्ती होते

अभयकुमार गुगळे यांचे प्रतिपादन; आनंदऋषीजी हॉस्पिटलमधील जनरल सर्जरी तपासणी शिबिरास प्रतिसाद

नगर – आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांच्या शिकवणी प्रमाणे समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. हे समजून आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब व गरजु रुग्णांची सेवा घडत आहे. या शिबिराचे आयोजन करण्याची संधी गुगळे परिवाराला मिळाली आहे.हे मी माझे भाग्य समजतो.
मानवसेवेतून ईश्वर प्राप्ती होते, असे प्रतिपादन उद्योजक व आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले अभयकुमार गुगळे यांनी केले आहे.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांच्या ३३ व्या पुण्य स्मृती दिनानिमित्त मोफत जनरल सर्जरी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन उद्योजक अभयकुमार गुगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी साधना गुगळे, कल्पना गुगळे, विनोद गांधी, श्रुती गांधी, आशाताई मुनोत, सी.ए.सोहन गुगळे, सारिकाताई गुगळे, हर्षल गुगळे, श्रद्धा गुगळे, रोनक गुगळे, लक्ष्मी गुगळे, अभिजीत गांधी आदींसह जैन सोशल फेडरेशनचे सदस्य डॉ.प्रकाश कांकरिया, संतोष बोथरा, मानकचंद कटारिया, सतीश लोढा, सुभाष मुनोत, प्रकाश छल्लाणी, डॉ.आशिष भंडारी तसेच शिबिराचे तज्ञ डॉटर डॉ.प्रविण मुनोत, डॉ.विवेक भापकर आदी उपस्थित होते.

श्रुती गांधी म्हणाले, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिरामध्ये सेवा करण्याची संधी गुगळे परिवाराला दिली आहे. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. काहीजण भक्ती, पूजा, आराधना करतात. प्रबुध्द विचारक गुरुवर्य आदर्शऋषीजी महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. गरजवंताला मदत केल्यास तीच खरी सेवा घडते. आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून समाजातील गोरगरिब व गरजु रुग्णांची सेवा घडते. येथे काम करण्यात
वेगळा आनंद मिळतो. संतोष बोथरा म्हणाले, अभयकुमार गुगळे यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटल व वर्धमान महावीर
युनिव्हर्सिटीच्या कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. अनेक वेळा नाशिक, मुंबई, पुणे येथे त्यांनी आनंदऋषीजी
हॉस्पिटलच्या कार्यासाठी प्रवास केला आहे. तसेच विनोद गांधी व गांधी परिवार ही सामाजिक कार्यात
नेहमीच अग्रेसर असतो. समाजातील अशा दानशूर व्यक्तींमुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे भरविली
जात आहेत. आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले डॉ.विवेक भापकर व डॉ.प्रवीण मुनोत
यांच्यासारख्या अनुभवी व तज्ञ डॉटरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यामुळेच आनंदऋषीजी
हॉस्पिटल चे सेवा कार्य सर्व दूर पसरले आहे. प्रास्ताविकात डॉ.प्रकाश कांकरिया म्हणाले,
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या उभारणीच्या सुरुवातीच्या काळापासून प्रत्येक कार्यात अभयकुमार गुगळे यांचे
सातत्याने योगदान लाभत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींमुळेच हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य
सेवा शिबिरे होत आहेत. कार्याक्रमाच्या सुरुवातीला उदयप्रभाजी म.सा. यांनी मंगल पाठ दिला. स्वागत
डॉ.आशिष भंडारी यांनी केले. जनरल सर्जरी तपासणी शिबिरात १७० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

न्युरॉन प्रीस्कूलच्या चिमुकल्यांना पदविका प्रदान

नगर – बागडपट्टी येथील न्युरॉन प्रीस्कूलची ग्रॅज्युएशन सेरेमनी नुकतीच झाली. यावेळी यु.के. जी.च्या मुलांना आयुष्यातील पहिली पदविका प्रदान करण्यात आली. प्राचार्या डॉ.सौ. संगीता मिसाळ यांनी स्वरचित स्वागत गीत व ग्रॅज्युएशन
साँगवर मुलं थिरकताना दिसले. मुलांच्या तालबद्ध नृत्य व गायनाने पालकवर्ग आनंदित झाले. कार्यक्रमात मुलांनी
वर्षभरात विविध प्रतियोगितांमध्ये मिळालेले कौशल्याचे कौतुक  Glimpse of Graduate या रूपाने करण्यात आले. यावेळी प्रोजेट फेअरचे प्रदर्शनही या विद्यार्थ्यांकडून भरविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे घरं (Types
of Houses)  व Aid-Box या विषयावर प्रोजेट बनविले होते.

प्राचार्या डॉ.सौ. संगीता मिसाळ यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
पालकांमध्ये सौ. रोहिणी तावरे, सौ. पायल तांदुलवाडकर, सौ. रशमी परदेशी, सौ. मंजिरी देशपांडे व सौ. तांबोळी यांनी शाळेच्या अभ्यास पद्धतीचे कौतुक केले व मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास न्युरॉन प्रीस्कूलमध्ये योग्यरित्या केला
जातो याविषयी मत मांडले. तसेच काही पालकांनी आवर्जून सांगितले की, न्युरॉन प्रीस्कूलमध्ये मुलांचा पूर्वप्राथमिक शाळेचा पाया भक्कम केला जातो. सूत्रसंचालन सौ. स्वाती डोंगरे तर आभार प्रदर्शन सौ. रिया कल्याणी या शिक्षिकांनी केले.

केडगावला रंगली लंडन किड्स प्री स्कूल शाळेची शिवजयंतीची मिरवणूक

शिवरायांबरोबर प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेत चिमुकले सहभागी

नगर – ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित लंडन किड्स प्री स्कूलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या मिरवणुकीने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
हातात भगवे ध्वज तसेच शिवकालीन वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

मिरवणुकीतील शिवाजी महाराजांची पालखी आणि तब्ब्ल ५१ विद्यार्थ्यांनी साकारलेल्या शिवकालीन वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, लक्ष्मीबाई राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, संत तुकाराम या महापुरुषांच्या वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी झाले होते. प्रसाद जमदाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणत कार्यक्रमाची शाळेत सुरुवात केली. ते म्हणाले की, आजची जयंती
सर्व चिमुकल्यासाठी प्रेरणा देणारी आहे. शिवरायांचे विचार घरात फोटो लावून किंवा घोषणा देऊन आत्मसात होणार नसून,  त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची गरज आहे. छत्रपती शिवराचे विचार येणार्‍या पीढी मध्ये रुजले पाहिजे,
असे त्यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. शाळेपासून बँक कॉलनी ते शाहूनगर बस स्टॉप व नंतर पुन्हा शाळेत मिरवणुकीचा समारोप झाला.
मिरवणुकीत विद्यार्थ्यांसह संस्थेचे सचिव संदीप भोर, ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रसाद जमदाडे, शाळेच्या प्राचार्या रुचिता जमदाडे, सुप्रिया मुळे, कल्याणी शिंदे, जयश्री साठे, प्रतिभा साबळे, सपना साबळे, गोंदके, साबळे मावशी, विठ्ठल नगरे, शिवम ठोंबरे, आदेश पवार, कृष्णा कातखडे, अथर्व चंदन आदी सहभागी झाले होते. मिरवणूक पाहण्यासाठी पालक व नागरिकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

भगवंताला, संपत्ती, ऐश्वर्या न देता एक प्रेमभाव व भक्तिभाव द्यावा

हभप जंगले महाराज शास्त्री यांचे प्रतिपादन; सावेडीगाव येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज निमित्त आयोजित सप्ताहाचे काल्याचे किर्तनाने समारोप

नगर – स्त्रिया कुटुंबात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, स्त्रियांनी आपल्या संस्कृती प्रमाणे, धर्माप्रमाणे वर्तन करावे हे सांगत असताना स्त्रियांनी शिक्षणाबरोबर आपली संस्कृती व स्त्री धर्म सांभाळावा, रास क्रीडा करत असताना सर्व गोपींना अभिमान झाला म्हणून भगवंत तेथून निघून गेले. पडली भुल धांवतें सैराट ॥ भगवंत गेल्यामुळे गोपिकांची झालेली अवस्था
धावे सैराट त्याच प्रमाणे आपल्या जीवनात जर भगवंत नसेल किंवा साधुसंतांची संगती नसेल तर आपलंही जीवन सैराट धावत म्हणजे अज्ञानात व अहंकारात धावत जसा गोपिकांना अभिमान झाला व भगवंत गोपिकांपासून निघून गेले त्याच
प्रमाणे आपल्याला जर थोडा जरी अभिमान झाला तर देव आपल्यापासून दूर जातो परमार्थ व भक्ती करत असताना अभिमान नसावा. त्याचप्रमाणे व्यवहारातही जगत असताना माझ्याकडे ही गोष्ट आहे याचा अभिमान कधीही नसावा त्या अभिमानामुळे आपले सर्व ऐश्वर्या नष्ट होते, त्यामुळे देवाची प्राप्ती करत असताना अभिमान नसावा, असे मत हभप जंगले महाराज शास्त्रींनी व्यक्त केले.

सावेडी गाव येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण
सप्ताहाचे हभप जंगले महाराज शास्त्री यांच्या काल्याचे किर्तन समारोप झाला. सप्तामध्ये काल्याचे किर्तन कीर्तन
करताना हभप जंगले महाराज शास्त्री. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी महापौर बाबासाहेब
वाकळे, अनिल बोरुडे, पुष्पाताई बोरुडे, माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर, निखिल वारे, उद्योजक मोहन
मानधना, अशोक वाकळे, हभप संदीप महाराज खोसे, हभप चंद्रकांत महाराज बारस्कर, हभप विठ्ठल महाराज
फलके, दगडू पवार, विलास ताठे, दत्ता पाटील सप्रे, शिवा चव्हाण आदीसह नागरिक उपस्थित होते.
हभप जंगले महाराज शास्त्री पुढे म्हणाले की भगवंताने ज्यावेळी गोपिकांच्या वस्त्राचे हरण केले त्यावेळी एक-
एक गवळण येऊन देवाला आपल्या सुवर्णाचा आपल्या धनाचा अभिमान करत देवाला वस्त्र देण्याकरता सांगत असताना देवाने त्या सर्वांकडे पाहिलेही नाही याप्रमाणे आपण देवाला आपल्या धना मुळे किंवा आपले आयुष्य मुळे संपत्तीमुळे
जर प्राप्त करण्याची इच्छा करत असतात तर देव कधीही प्राप्त होत नाही पुढे बोलत असताना महाराजांनी एक गवळण अशी आहे, ’की ती देवाला म्हणते देवा काहीच नाही मी तुला अनन्य भावाने शरण येते आता तू माझे वस्त्र दे
यावरून असे लक्षात येते की भगवंताला इतर संपत्ती इतर ऐश्वर्या न देता भगवंताला एक प्रेम भाव व भक्तिभाव द्यावा असे ते म्हणाले.
सावेडी गावामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह हा भाविकांसाठी एक अध्यात्मिकतेचे केंद्र बनले
असून या पावन भूमीतून धार्मिकतेचा प्रसार-प्रचार होण्याचे काम केले जाते. बाबासाहेब वाकळे यांनी गेल्या २६ वर्षापासून सुरू केलेली परंपरा कौतुकास्पद असून आजच्या युवा पिढीला आपल्या साधुसंतांचे विचार देण्याचे काम केले जात आहे. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीज निमित्त हभप जंगले महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्त्याचा समारोप झाला असल्याचे मत ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकलव्य संघटनेतर्फे बेमुदत उपोषण

नगर – एकलव्य संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गीताराम बर्डे, मोहन गोलवाड, अरुण जाधव, वैजंता गोलवाड, सोमनाथ गोरे, आप्पा गोलवाड, दत्ता गोरे, बाबुराव फुलमाळी, किरण माळी, सुभाष माळी, किशोर माळी, जालिंदर माळी आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, मौजे पाचेगाव येथील  गट क्रमांक २८३ मधील आदिवासी भिल्हे समाजाचे अतिक्रमण कायम करण्यात यावे व पिंपरी वळण ता राहुरी येथील गट क्रमांक १९८ मधील सर्व आदिवासी भिल्ल समाजाचे अतिक्रमण कायम करण्यात यावे तसेच येडू आई देवस्थानला जागा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच आदिवासी समाजाच्या सर्व जमिनी वर्ग एक करण्यात याव्यात व सर्व आदिवासी समाजाला राहत्या जागेत घरकुल व इतर सुविधा देण्यात यावी तसेच
जिल्ह्यातील सर्व तालुयांना आदिवासी विकास निधीचे समान वाटप करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे
जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.

महिला बचत गटांसाठी मॉल उभारण्याचा पालकमंत्र्यांचा निर्णय स्वागताह

नगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी अहिल्यानगर येथे महिला बचत गटांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने मॉल उभारण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून त्यामुळे जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण चळवळीस गती मिळेल, असा विश्वास कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायकराव देशमुख यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात सध्या बचत गटांच्या माध्यमातून
चार लाख पेक्षा जास्त महिला कार्यरत असून उत्पादन व सेवा व्यवसायाच्या माध्यमातून त्या सक्रिय आहेत. या बचत गटांची उत्पादने अत्यंत दर्जेदार असून त्याचे दरही माफक आहेत. या बचत गटांना शहरी बाजारपेठेशी जोडून दिल्यास या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. एक महिला सक्षम झाल्यास एका कुटुंबाचे अर्थकारण सुधारलेते. त्यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी मॉल उभारण्याचा निर्णय अत्यंत क्रांतिकारक असून त्यामुळे ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्या नेतृत्वाखाली
जिल्ह्यातील महिला बचत गट चळवली गती मिळेल,असा विश्वास श्री.देशमुख यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  प्रत्येक जिल्हास्तरावर अशा प्रकारचे मॉल उभारण्याचे सुतोवाच केले आहे.विकासाची दूरदृष्टी असलेले ना.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भातएक पाऊल पुढे टाकले असूनअशाच प्रकारचे मॉल प्रत्येक तालुका
स्तरावरही उभारण्याचे ठरविले आहे. यासाठी जिल्हा निधीतून आवश्यक ते अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची
घोषणा देखील ना. विखे यांनी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्ताने अशा प्रकारचे मॉल उभारून एक प्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आगळ्यावेगळ्या प्रकारचे स्मारकच उभारले जाणार आहे. ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या कल्पक व दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळे आगामी काळात राज्याला दिशादर्शक ठरतील असे विविध विकास कार्यक्रम राबविले जातील असा विश्वास श्री. देशमुख यांनी व्यक्त केला. आगामी काळात महिला बचत गटाच्या सदस्यांना कौशल्य विकास कार्यक्रमाशी जोडले जाणार असून त्या माध्यमातून महिलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. असे श्री. देशमुख यांनी सांगितले

 

सरोष कँटीन मध्ये लागली भीषण आग ; सुदैवाने जीवितहानी नाही

नगर – शहरातील मध्यवस्तीत सरोष पेट्रोल पंप मागे असलेल्या सरोष कँटीन मध्ये १७ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली. आंतरराष्ट्रीय अवतार मेहेरबाबा केंद्राजवळ असणाऱ्या या कँटीन मधील एका पत्र्याच्या शेडला भीषण आग लागून शेडमध्ये असणाऱ्या फोम गाद्या जळून खाक झाल्या. यावेळी मेहेरबाबा केंद्रातून सुरवातीला पाण्याचा पाईप लावून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आग अत्यंत भीषण असल्याने  ती आटोक्यात येत नव्हती त्यानंतर अग्निशमन गाडी आली त्या गाडीने आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला

शेजारी पेट्रोल पंप आणि याठिकाणी आग वाढली असती तर शेजारी शेकडो घरांची वस्ती पेट्रोल पंपाला आग लागून मोठा स्फोट होउन आणखी मोठं नुकसान झालं असत आणि दुसरीकडे आग वाढत असताना अग्निशमन दलाची मोठी गाडी तातडीने दाखल होत असताना या सरोष कँटीन परिसरात मातीचे मोठं-मोठे ढिगारे आणि कचऱ्याचे ढीग टाकून येथे अतिक्रमण करून रस्ते बंद करण्यात आले आहेत त्यामुळे या गाडीला येण्यासाठी अडथळे आले मात्र पेट्रोल पंपाकडून गाडी आत आली आणि अर्धा तास शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले

सुद्यवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. बंद पडलेली दीपाली टॉकीज आणि सरोष कँटीन परिसर याठिकाणी १०० ते १५० ट्रॅक्टर मातीचे ढिगारे टाकून जाणून बुजून रस्ते बंद करण्यात आले असून या जागेत किती प्रमाणात कचरा आणि मातीचे ढिगारे करण्यात आले असून नगर मनपाने तातडीने याठिकाणी स्वच्छता करावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

आग लागली त्याच्या शेजारी मेहेर बाबा यांचे आंतरराष्ट्रीय केंद्र असून याठिकाणी अमेरिका,जर्मनी,फ्रांस,इंग्लड,रशिया,इराण आणि जगभरातील मेहेरभक्त येत असतात अशा ठिकाणी आग लागून पुढील मोठा अनर्थ सध्या तरी टळला परंतु मनपा प्रशासनाने याठिकाणी तातडीने स्वछता करणे अत्यावश्यक आहे.