पुणे ते नगर प्रवासादरम्यान महिलेच्या बॅगमधील सोन्याच्या दागिन्यांची चोरी

0
21

पुण्यात गुन्हा दाखल; तपासासाठी नगर येथील कोतवाली पोलिस ठाण्याकडे वर्ग 

नगर – पुणे ते नगर प्रवासादरम्यान महिलेच्या बॅगमधील ३८ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी सोनाली दीपक गुगळे (वय ४८, रा. सिंहगड रस्ता, पुणे) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सदरचा गुन्हा तपासकामी येथील कोतवाली पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी बुधवारी (दि.२४) याबाबत नोंद करून घेतली आहे. फिर्यादी या ४ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता त्यांच्या पुण्यातील राहत्या घरातून पीएमपीएल बसने पुण्यातील खराळवाडी बस स्थानक येथे गेल्या. त्यावेळी त्यांच्याकडे ट्रव्हल बॅग होती. त्या बॅगमध्ये छोटी पर्स होती व त्यात ३८ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र ठेवले होते. दरम्यान तेथे त्यांना त्यांचे पती घेण्यास आले. ते दोघे त्यांच्या दुचाकीवरून नगरमधील नालेगाव येथे नातेवाईकांच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी आले. तेथे रात्री नऊ वाजता त्यांनी बॅग पाहिली असता बॅगेतील पर्स दिसले नाही. पर्स व त्यातील ३८ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पुणे येथे जाऊन स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तो कोतवाली पोलिसांकडे वर्ग केला आहे. कोतवाली पोलिसांनी बुधवारी (दि.२४)पोलीस दप्तरी नोंद करून घेतली आहे. अधिक तपास सुरू केला आहे.