महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार; त्रस्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

0
22

नगर – शहरातील बाबा बंगाली परिसरातील मशिद आणि चर्च समोरच कचर्‍याचे संकलन केले जात असून सदरचा कचर्‍याचा ढिगारा चार-चार दिवस उचलला जात नाही त्यामुळे परिसरात, अस्वच्छता पसरली असून दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. कचरा संकलनाची जागा बदलावी अन्यथा कोणत्याही क्षणी महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. दैनंदिन साफसफाई केल्यानंतर जमा होणारा कचरा बाबा बंगाली परिसरातील रस्त्याच्या बाजूला संकलित केला जातो. या ठिकाणा जवळच मशिद आणि चर्च आहे. या ठिकाणी दररोज अनेक भाविक येतात परंतु रस्त्याच्या बाजूलाच गटारीत कचर्‍याचा ढिगारा लावला जात असल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरते तसेच कचर्‍यामुळे गटार तुंबली जात असून परिसरात दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे अनेक लहान मुले, नागरिक आजारी पडत आहेत.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि गटारीही तुंबल्या; कचरा संकलनाचे ठिकाण बदलण्याची मागणी

अस्वच्छतेमुळे डासांचा उपद्रवही वाढला आहे. सदर कचरा रोजच्या रोज उचलला जात नाही. चार दिवसातून एकदा हा कचरा उचलला जातो त्यामुळे परिसरात नेहमीच दुर्गंधी सुटलेली असते. याबाबत वारंवार तक्रारी करुनही महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून आरोग्य धोयात आले आहे. महापालिका प्रशासनाने तक्रारींची तात्काळ दखल घेऊन रहिवासी परिसरात कचरा संकलन तात्काळ थांबवावे, ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही अशा ठिकाणी कचरा संकलन करावे जेणेकरुन रोगराई पसरणार नाही. सध्या अधूनमधून पाऊसही पडत आहे. या पावसाने कचर्‍याचा घाण वास सुटत असून तात्काळ कचरा संकलनाचे ठिकाण बदलावे अन्यथा महापालिकेत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.