नगरच्या बसस्थानकांमध्ये महिला करतात पाकिटमारी

0
37

नगर – नगर शहरातील बसस्थानके चोर्‍या, पाकीटमारी करणार्‍या गुन्हेगारांचे अड्डे बनले असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बसस्थानकातून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असून या चोर्‍यांचा तपास लावण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. शुक्रवारी (दि.३) दुपारी माळीवाडा बसस्थानकावर एका सेवानिवृत्त शिक्षकाचा खिसा मारताना एका चोरट्या महिलेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली आहे. याबाबत श्रीराम रंगनाथ शिरसाठ (वय ६२, रा. शिरसाठ वाडी, ता. पाथर्डी, हल्ली रा. आंबेगाव खुर्द, जि. पुणे) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिरसाठ हे कामानिमित्त गावी शिरसाठवाडी येथे गेले होते. तेथील काम आटोपून ते शुक्रवारी दुपारी नगर – पाथर्डी एस.टी. बसने नगरला आले होते. नगरमधून त्यांना पुढे आंबेगावला जायचे होते.

सेवानिवृत्त शिक्षकाच्या खिशातून पैसे चोरताना महिलेला पकडले

बस दुपारी १.३० च्या सुमारास माळीवाडा बसस्थानकात आली. त्यावेळी ते बसमधून खाली उतरत असताना त्यांच्या पँटच्या पाठीमागील खिशात असलेली २४ हजार ९५० रुपयांची रोकड चोरण्याचा प्रयत्न एका महिलेने केला. आपल्या खिशातून कोणीतरी पैसे चोरत असल्याचे फिर्यादी शिरसाठ यांना जाणवताच त्यांनी त्या महिलेला रंगेहाथ पकडले. त्यावेळी काही प्रवाशांनी बसस्थानकावरील पोलिस चौकीत असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना बोलावले. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेवून चौकशी केली असता तिचे नाव शिल्पा विनोद काळे (रा. पाथर्डी रोड, शेवगाव) असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिला पोलिस ठाण्यात आणले. याबाबत शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात सदर आरोपी महिलेविरुद्ध भा.दं.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.