मतदान हवे असेल तर, बात हमारी भी सुनो…विद्यार्थ्यांचे ‘आत्मक्लेश व अन्नत्याग’ आंदोलन

0
31

उड्डाणपूल, मेट्रो, स्मार्ट सिटी होतीलच पण तरुणांच्या प्रश्नांचे काय? स्मायलिंग अस्मिता विद्यार्थी संघटनेचा सवाल

नगर – जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात ३० टक्के तरुण मतदार आहेत. मात्र निवडणुकीत तरुणांच्या मुख्य प्रश्नांकडेच दुर्लक्ष झाले आहे. खर्‍या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘बात हमारी भी सुनो’ या टॅगलाईनखाली स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेतर्फे ४ मे रोजी छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकासमोर ‘आत्मलेश व अन्नत्याग’ आंदोलन करण्यात आले. निवडणुकीत तरूणांच्या खर्‍या प्रश्नांसाठी कुठलाही उमेदवार बोलताना दिसत नाही. राज्यात मतदानाचा हक्क असलेल्या तरुणांची संख्या ३० टक्के आहे आणि अहमदनगर जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात १४ लाखांपर्यंत ही तरुणांची संख्या आहे. आम्ही गेल्या महिन्याभरापासून तरुणांमध्ये मतदान जागृतीचे कार्यक्रम राबविले आहेत. त्यासोबतच आपल्या प्रश्नांवरती प्रमुख उमेदवारांनी बोलले पाहिजे, आपले प्रश्न समजून घेत निवडून आल्यावर कार्यवाही करू, अशी ग्वाही दिली पाहिजे. आम्ही औद्योगिक वसाहती आणल्या, असे उमेदवारांकडून म्हंटले जाते, परंतु त्यात तरूणांच्या स्टार्टअपसाठी किती टक्के जागा राखीव आहेत याबद्दल बोलले जात नाही. अहमदनगर शहरात ऑलिम्पिकच्या धर्तीवर सहा खेळाची मैदाने हवीत, त्यासोबतच बाहेरगावाहून उच्च शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी शहराच्या विविध भागात किमान १५ वस्तीगृह हवेत, आमच्यावर अग्निवीर थोपलेच आहे तर त्यात किमान माणुसकी दाखवत अग्निवीरची मर्यादा दुप्पट करण्यात यावी, ६ अद्ययावत अभ्यासिका तसेच विद्यार्थ्यांसाठी मोफत दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली पाहिजे, रस्ते, पूल, मेट्रो, स्मार्ट सिटी, औद्योगिक वसाहती होतीलच, परंतु सध्या शेती बिघडल्यामुळे वरील मागण्या त्वरित मान्य होणे व त्याची जबाबदारी उमेदवारांनी घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी एक दिवसाचे आत्मलेश व अन्नत्याग आंदोलन केले आहे, अशी माहिती स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी दिली.

सध्या उभ्या असलेले उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहे. कोण कुठल्या पक्षातून आले, कुणी काय केले किंवा कोणी काय केले नाही करणार आहे, असे भाष्य केले जाते, परंतु आमच्या अडचणी काय आहेत व त्यासाठी काय केले पाहिजे यासाठी मात्र विविध विद्यार्थी संघटनांशी चर्चा कोणी केलेली नाही किंवा करतही नाही. फक्त भूलथापा दिल्या जातात राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकासाठी दिलेला ३० लाखांचा निधी हा दिल्लीतच अडकून पडला आहे त्याबद्दलसुद्धा उमेदवारांनी जबाबदारी घेतली पाहिजे. आम्हाला मतदानाचा अधिकार आहे. आमच्या मागण्या जे उमेदवार पूर्ण करण्यासाठी ग्वाही देतील, अशांनाच उच्चशिक्षित तरुण व ज्या विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार आहे, त्यांनी मतदान करावे, असे आवाहन यशवंत तोडमल यांनी केले. यावेळी अभिजित दरेकर, सौ. नंदा पांडूळे, लीना ठाकरे, अलका पोटे, कोमल पांडुळे, काजल पोकळे, प्रतीक्षा सुरोसे, प्रियंका इरकर, प्रेम थोरवे, प्रथमेश सूर्यवंशी, अक्षय साबळे, विशाल पांडुळे, शुभम सांगळे, नागेश घुगे उपस्थित होते. उन्हाचा त्रास झाला म्हणून शुभम पांडूळे यांना भोवळ आली होती. तिथे असलेल्या डॉ. अमित पवार यांनी औषधोपचार केले. उपस्थितांनी सुरूवातीला छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या समाधी व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी केली.