अविचारी कृत्य
एक शिकारी माणूस रानात शिकार शोधत असता त्याच्या नजरेला एक सुंदर कोल्हा पडला. त्याचे कातडे आपल्याजवळ असावे, अशी इच्छा होताच त्याने कोल्ह्याचे लपण्याचे ठिकाण शोधून काढले. कोल्हा आतमध्ये लपला होता; म्हणून शिकार्याने त्याच्या बिळाच्या बाहेर एक मोठा खड्डा खोदला. त्यावर झाडाचा पालापाचोळा पसरला आणि त्यावर एक मोठा मांसाचा तुकडा ठेवला. कोल्हा बाहेर आल्यावर मांसाचा तुकडा खाण्यासाठी तेथे जाताच नेमका त्या खड्ड्यात पडेल आणि आयताच जिवंतपणी आपल्या हाती लागेल, असे शिकार्याला वाटले. अशी सर्व व्यवस्था करून शिकारी आडबाजूस जाऊन दडून बसला. काही वेळा कोल्हा बिळाबाहेर आला असता समोरच त्याला मांसाचा मोठा तुकडा दिसला. तो खावा, असे वाटताच तो थोडा पुढे आला; पण यामागे काहीतरी कपट असावे, हे धूर्त कोल्ह्याने ओळखले व तो परत बिळात जाऊन लपला. थोड्या वेळानेच एक वाघ त्या रस्त्याने जात असता त्याने तो मांसाचा तुकडा पाहिला. कसले मांस आहे हे पाहावे, म्हणून मागचा-पुढचा कसलाही विचार न करता तो त्या तुकड्याकडे धावला, तसा त्या खड्ड्यात पडला. त्याचा पडण्याचा आवाज शिकार्याच्या कानी पडताच तोही तिकडे धावला. खड्ड्यात कोल्हा पडला, असे समजून त्याने खड्ड्यात उडी टाकली असता खवळलेल्या वाघाने त्याच्यावरच हल्ल केला आणि त्याला ठार केले. तात्पर्य ः अविचाराने केलेले कृत्य कधी-कधी जिवावर बेतते.