नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे ३ मे रोजी पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषण

0
35

नगर – अर्बन बँकेच्या ठेवीदारांना ठेवीची रक्कम परत मिळण्याबरोबरच बँकेवर दरोडा घालणार्‍या दोषी संचालक आणि कर्जदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई होण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिसांवर दबाव वाढविण्याच्यादृष्टीने ३ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वा. पर्यंत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसण्याचा निर्णय बँक बचाव संघर्ष कृती समितीने घेतला असल्याची माहिती समितीचे डी.एम. कुलकर्णी यांनी दिली आहे. या संदर्भात कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, बँकेचा नियोजनपूर्वक खून झाल्यानंतर बँक वाचविण्यासाठी बँक बचाव संघर्ष समितीने सातत्याने प्रयत्न केले आहेत. ठेवीदारांच्या बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी समितीने सनदशीर मार्गाने लढा दिला आहे. याच तळमळीतून २ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन केले.

पोलिस व प्रशासनाबरोबरच सातत्याने चर्चा केल्या. ठेवीदारांच्या व्यथा पोटतिडकीने शासनस्तरावर मांडल्या. या लढ्यासाठी वारंवार आवाहन करूनही मोजकेच ठेवीदार प्रत्येक वेळी उपस्थित राहत असल्याबाबत खंत वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बँक बचाव समिती ठेवीदारांच्या हक्काचा पैसा परत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल आहे. सदर पैसे आजारपण, अडचणीच्यावेळी ठेवीदारांना उपलब्ध व्हावा यासाठी समितीची तळमळ आहे. बँक लुटणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी पोलिस दलावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शुक्रवारी (दि.३) जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. ठेवीदारांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.