ढोंगीने केलेल्या परमार्थापेक्षा विधीने केलेला संसार केव्हाही चांगला : ह.भ.प. उद्धव महाराज सबलस

0
49

नगर – जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात पाचव्या दिवसाची सेवा हरिभक्त परायण उद्धव महाराज सबलस यांची झाली. सेवेसाठी जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा ‘मार्गी बहुत | याची गेले साधुसंत ॥ नका जाऊ आडराने | ऐसी गर्जती पुराणें ॥’ अभंग निवडला. यावर प्रतिपादन करताना महाराज म्हणाले, भजन कीर्तन मग जेवण असा सुंदर उपक्रम या सप्ताहात चालू आहे. कीर्तनाने नामस्मरणाने अन्नातला दोष निघून जातो. ‘रामकृष्ण नाम सर्वदोषा हरण | जड जीवा तारण हरी एक ॥’ म्हणजे इथं अन्नदान करणार्‍यांचं मोठं कौतुक करावं, अन्नातले दोष निघून जाऊन जैसा खाया अन्न वैसा बने मन अन्नाचा परिणाम मन शुद्ध होतं, भजनाचा परिणाम उपासना घडते, आपण गेल्या २५ वर्षापासून बीजेचा उत्सव साजरा करतात आपले कौतुक करावे, तेवढे कमी पण देव सुद्धा वैकुंठात बीजेचा सोहळा साजरा करताना तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा.. आपले सर्वांचे कौतुक… सध्या मुलींची संख्या कमी कमी होत चालली आहे ही चिंतेची बाब आहे. मुलगीच खरं प्रेम आई वडिलावर करते. ज्याला मुली नाही त्याच्या अंत समयी रडण्यासाठी कुणी नसेल.

अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यानिमित्त कीर्तन

प्रपंचात सर्व वजाबाकीच आहे. पणजोबांनी केलं ते आजोबांनी तेच बापाने वेगळं काहीच नाही परमार्थात मात्र आनंदच आनंद आहे त्यामुळे संत महात्मे या मार्गाने गेले त्याच मार्गाने आपण चालावं त्यांचा अनुकरण करावं आणि जे निष्कलंक असतात तेच संत असतात. ज्यांच्या ठिकाणी त्याग असतो ते संत असतात. आपण कोणालाही संत म्हणतो. भगवे कपडे घातले किंवा काही टाणाटोणा केला तो साधू नसतो. काही माणसं संसार नीटनेटका करीत नाही. परमार्थातही पचका करून ठेवतात. खरा धक्का त्यांना बसतो. ढोंगीने केलेल्या परमार्थापेक्षा विधीने केलेला संसार केव्हाही चांगला. संतांनी आपल्याला चांगला मार्ग स्वच्छ मार्ग दाखवला याच पद्धतीने जीवन जगा संस्कार करा बापाला जर माळ नाही, गंध नाही, संस्कार नाही तर त्याच्या मुलाला कसे संस्कार होतील. म्हणून सर्वांनी संस्कारित बनण्याचा प्रयत्न करा आणि आयुष्य आनंदाने घाला निर्व्यसनी जीवन जगा असे हभप उद्धव महाराज सबलस यांनी आपल्या किर्तनातून सांगितले.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी व माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यानिमित्त ह.भ.प. उद्धव महाराज सबलस यांचे कीर्तन झाले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. संत तुकाराम महाराज यांची वेशभूषा साकारलेले रविंद्र महाराज गावडे आकर्षण ठरले. सावेडीत संत तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त अखंड हरीनाम सप्ताह उत्साहात सुरु असून यात नागरिक विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आहे. यात ह.भ.प. रविंद्र महाराज गावडे हे दररोज संत तुकाराम महाराज यांची वेशभूषा परिधान करत हातात चिपळी वाजवत संपूर्ण किर्तनात ते दंग होवून जात असल्याचे पहायला मिळत असून ते आकर्षण ठरत आहे.