शेतकऱ्यांकडून व्याजाची वसुली थांबविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ‘ठिय्या’ आंदोलन

0
111

नगर – मार्चअखेर मुळे जिल्हा सहकारी बँकेकडून पीककर्जाची वसुली सुरु आहे. परंतु नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांकडून केवळ कर्ज मुद्दल रकमेची वसुली करण्याचे सहकार आयुक्तांचे आदेश असतानाही बँकेकडून मुद्दलीसोबत व्याजही घेतले जात आहे. याच्या निषेधार्थ नगर तालुका महाआघाडीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत व्याजाची वसुली त्वरित थांबविण्याची मागणी केली. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, माजी जिल्हापरिषद सदस्य बाळासाहेब हराळ, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, माजी सभापती संदीप गुंड, माजी सदस्य गुलाब शिंदे आदींनी हे आंदोलन केले. तत्पूर्वी या शिष्टमंडळाने जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेवून व्याजाची वसुली थांबविण्याची मागणी केली. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांची भेट घेत निवेदन दिले व सहकार आयुक्तांच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा बँकेला कराव्यात, अशी मागणी केली.

मात्र जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने तशा सूचना न दिल्याने शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधक पुरी यांच्या कार्यालयाबाहेरच ठिय्या आंदोलन सुरु केले. जोपर्यंत व्याज वसुली थांबविण्याचे आदेश दिले जात नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा संदेश कार्ले यांनी दिला. सध्या अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असल्याने जिल्हा बँकांनी पीककर्जाची नियमित परतफेड करत असलेल्या शेतकर्‍यांकडून फक्त कर्ज मुददल रकमेची वसुली करणेबाबत पत्र देण्यात आलेले आहे. तथापी दुष्काळी परिस्थितीमध्येही नगर जिल्हा बँकेकडून व्याजाच्या रकमेची आकारणी करण्यात येत आहे. शेतकर्‍यांची परिस्थिती दयनीय असून पत्राची जिल्हा बँकेकडून अंमलबजावणी झालेली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकर्‍यांची म्हंटली जाणारी बँक खरोखरच शेतकर्‍यांचे हीत जपतेय का? बँकेचा हा मनमानी कारभार बँकेच्या चेअरमन यांच्याच इशार्‍यावर सुरु असल्याचा आरोपही संदेश कार्ले यांनी केला आहे. दुपारी उशिरापर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरुच होते.