उमेदवारी अर्ज छाननी बंद दाराआड गुपचूप न करता सर्वासमक्ष करावी

0
28

व्हिडिओ शूटिंग करून ती प्रक्रिया एलईडी वॉलद्वारे आम जनतेला दाखवावी; अपक्ष उमेदवार गिरीश जाधव यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नगर – लोकसभा निवडणुकीसाठी दाखल होत असलेल्या उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया बंद दाराआड गुपचूप न करता सर्वासमक्ष करण्यात यावी. या प्रक्रियेचे इन कॅमेरा व्हिडिओ शूटिंग करून ती प्रक्रिया एलईडी वॉल द्वारे आम जनतेला दाखवावी, आणि ही निवडणुक पारदर्शी पद्धतीने सुरु असल्याचे सिध्द करावे, अशी मागणी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले गिरीश तुकाराम जाधव यांनी जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया असून येथे २६ एप्रिल या तारखेला अर्जाची छाननी होणार आहे. प्राप्त माहितीनुसार नगर दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या अखत्यारित ही अर्जाची छाननी बंद दाराआड करणार आहेत असे समजले आहे. गुजरात राज्यातील सुरत मध्ये कॉग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज, बंद दाराआड अर्जाची छाननी करून, एकतफीं बाद ठरवण्यात आला. भाजपानं इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचे समुपदेशन करून त्यांचे अर्ज त्यांना मागे घ्यायला लावले आणि भाजपा उमेदवार खासदारकीच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आला.

नगर दक्षिण मध्ये अर्ज छाननी करताना इतर कोणासमोर न करता अधिकारी आपसात करणार आहेत असे समजले आहे. असे करून त्यांना नगरमध्ये सुरत प्रमाणे भाजपाचा खासदार बिनविरोध निवडून द्यायचा आहे का? अर्ज छाननीची प्रक्रिया बंद दाराआड गुपचूप न करता ती सर्वासमक्ष करावी आणि त्याचे इन कॅमेरा व्हिडिओ शूटिंग करून ते एलईडी वॉल द्वारे बाहेर आम जनतेला दाखवावे आणि ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने होते आहे हे सिद्ध करावे. अशी आपणास विनंती आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरणार्‍यांची संख्या मोठी असून त्यामुळे प्रस्थापित उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपा आणि मित्र पक्षांची सत्ता असल्या कारणाने ते या निवडणुकीत मनमानी करून प्रक्रिया राबवत आहेत. निवडणूक आयोग आणि प्रशासकीय अधिकार्‍यांना हाताशी धरून ते सोयीचे निर्णय घेत आहेत. विरोधी उमेदवारांना विविध परवानगी देत असताना त्यांची अडवणूक होते आहे. प्रचारादरम्यान आचारसंहितेचा भंग जर भाजप व मित्र पक्षांच्या लोकांकडून झाला तर त्याकडे ते सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक निकोप वातावरणात न होता लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवून ती भाजपासाठी एकतर्फी करण्याचा घाट घातला जात आहे. तेव्हा मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वास रहावा, यासाठी अर्ज छाननीची प्रक्रिया सर्वांसमक्ष करावी अशी मागणी आम्ही करीत आहोत, असे गिरीश जाधव यांनी म्हंटले आहे.