म्युचुअल फंडात गुंतवणुकीतून परताव्याच्या आमिषाने केडगावच्या महिलेची २ लाख ८० हजारांची फसवणूक

0
70

नगर – म्युचुअल फंडात पैसे गुंतवल्यास त्यातून चांगला परतावा मिळवून देण्याचे अमिष दाखवत केडगाव येथील मजुरी काम करणार्‍या महिलेची दोघांनी २ लाख ८० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पूनम महेश गायकवाड (रा. अंबिका विद्यालयाजवळ, केडगाव, हल्ली रा. बालिकाश्रम रोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेची झोपडी कँटीन जवळील टाटा एआयजी ऑफिस मध्ये काम करणारा गणेश कराळे व पंजाब नॅशनल बँकेच्या सावेडी शाखेत काम करणारा सोमनाथ रावसाहेब कर्डिले यांच्याशी ओळख झालेली होती. या दोघांनी वेळोवेळी त्या महिलेच्या घरी जावून म्युचुअल फंडात पैसे गुंतवल्यास त्यातून चांगला परतावा मिळवून देवू असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे त्यांनी दि. २० मे २०२३ ते ७ डिसेंबर २०२३ या कालावधीत वेळोवेळी फोन पे तसेच इतर माध्यमातून या दोघांना २ लाख ८० हजार रुपये दिले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी या दोघांकडे म्युचुअल फंडात गुंतवलेले पैसे व परतावा मागण्यास सुरुवात केली. त्यांनी काही दिवस टाळाटाळ केली. मात्र नंतर सोमनाथ कर्डिले याने ५ नोव्हेंबर २०२३ रोजी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा ७० हजारांचा धनादेश फिर्यादी महिलेला दिला. परंतु सदर महिला धनादेश वटविण्यासाठी गेली असता, कर्डिले याने त्या अगोदरच बँकेशी संपर्क साधत त्याच्या खात्याचे सर्व व्यवहार बंद केले. त्यामुळे तो धनादेश वटला नाही. फिर्यादीने अनेकवेळा दोघांकडे पैशांची मागणी केली मात्र त्यांनी ते दिल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी (दि.२७) रात्री कोतवाली पोलिस ठाण्यात गणेश कराळे व सोमनाथ कर्डिले या दोघांच्या विरोधात भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. गणेश धोत्रे हे करीत आहेत.