नगर – कंबरेला गावठी पिस्तूल लावून फिरणार्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने बुर्हाणनगर रोडवर असलेल्या दमडी मशिद जवळ पकडले आहे. त्याच्या कडून एक गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जाबीर सादिक सय्यद (वय-३४, रा. घर नं.-६ शहा कॉलनी, गोविंदपुरा, अहमदनगर) असे या आरोपीचे नाव आहे. भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांना गुरुवारी (दि.२५) सायंकाळी गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम त्याचे कंबरेला गावठी कटटा लावुन बुर्हाणनगर रोडवरील दमडी मशिद जवळ संशयास्पद फिरत आहे. ही माहिती मिळताच त्यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना तात्काळ सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पथकाने दमडी मशिदजवळ जावुन पाहणी केली असता तेथे जाबीर सादिक सय्यद संशयास्पद फिरतांना दिसुन आल्याने त्यास जागीच ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत कंबरेला खोचलेला एक गावठी बनावटीचा कटटा व दोन जिवंत काडतुस आढळून आले. ते जप्त करत त्याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आर्म अॅट ३/२५ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक योगेश राजगुरु, पोलीस अंमलदार रेवणनाथ दहिफळे, कैलास सोनार, संदिप घोडके, दिपक शिंदे यांच्या पथकाने केली आहे.