बेदम मारहाण करत केडगावमध्ये खून

0
74

मृतदेह चाँदबीबी महालाजवळ फेकला; सहा जणांवर गुन्हा दाखल

नगर – कार्यक्रमासाठी पत्नीच्या माहेरी केडगाव येथे आलेल्या युवकाला पती – पत्नीच्या वादातून बेदम मारहाण करत त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनानंतर त्याचा मृतदेह चाँदबीबी महालाजवळ बारदरी (ता.नगर) शिवारात फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी मयताची पत्नी व तिच्या माहेरचे नातेवाईक अशा ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मयताची पत्नी व मेव्हण्याला अटक केली आहे. प्रशांत जगन्नाथ घाटविसावे (वय २८, रा. केळ पिंपळगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे मयताचे नाव आहे. तर त्याच्या खून प्रकरणी त्याची पत्नी कल्याणी प्रशांत घाटविसावे (मूळ रा. केळ पिंपळगाव, हल्ली रा. शास्रीनगर, केडगाव), सासरा सोमनाथ बनकर, सासू वैशाली सोमनाथ बनकर, मेव्हणा अजय सोमनाथ बनकर, मेव्हणी प्रियंका सोमनाथ बनकर (सर्व रा. शास्रीनगर, केडगाव) अजय बनकर चा मेव्हणा मोहित दिनेश पाडळे (रा. बोहरी चाळ, रेल्वे स्टेशन रोड, केडगाव) यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२, ३२३, १४३, १४७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मयत प्रशांत घाटविसावे याचा चुलत भाऊ किशोर बापूराव घाटविसावे (रा. केळ पिंपळगाव, ता. आष्टी, जि. बीड) याने नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत प्रशांत घाटविसावे हा मंगळवारी (दि.२३) केडगाव येथे पत्नीच्या माहेरी कार्यक्रमासाठी आलेला होता. रात्री पती – पत्नीच्या वादातून त्याचे व त्याच्या सासरच्या लोकांचे वाद झाले.

ही बाब त्याने आपल्या कुटुंबियांना फोन करून कळविली होती. त्यानंतर बुधवारी (दि.२४) त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद लागला. गुरुवारी (दि.२५) सकाळपासूनही त्याच्याशी संपर्क न झाल्याने त्याला शोधण्यासाठी त्याचे भाऊ व इतर नगरकडे येत असताना दुपारी त्यांना फोन वर समजले की, प्रशांत याचा मृतदेह चाँदबीबी महालाजवळ बारदरी (ता.नगर) येथे आढळून आला आहे. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी तेथे धाव घेत पाहिले असता मयत प्रशांत याच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुणा दिसल्या.

त्यामुळे त्याचा चुलत भाऊ किशोर बापूराव घाटविसावे याने गुरुवारी रात्री नगर तालुका पोलिस ठाण्यात मयताची पत्नी व इतर नातेवाईक अशा ६ जणांच्या विरोधात फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच स.पो.नि. प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, महिला पो.ना. मोहिनी कर्डक, पो.कॉ. विक्रांत भालसिंग, संभाजी बोराडे यांच्या पथकाने मयताची पत्नी कल्याणी प्रशांत घाटविसावे व मेव्हणा अजय सोमनाथ बनकर यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे करीत आहेत.