माणसं परावलंबी बनली असून दुसऱ्याच्या जीवावर जगण्याची प्रवृत्ती तयार झाली ह.भ.प. वाणी भूषण दयानंद महाराज कोरेगावकर

0
20

अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यानिमित्त कीर्तन

नगर – कोणी आपल्याकडे गालबोट दाखवू नये असं जीवन जगायचं, दिवसाला दररोज दहा पाच मिनिटे तरी खळखळून हसायचं, हसल्याने बीपी, शुगर, अटॅक यासारखे अनेक रोग नाहीसे होतात, टेन्शन संपून जातं, या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे, माणसाने आपलं जीवन अतिशय आनंदाने घालवावं, टाहो फोडून जीवन जगायचं, आनंदी जीवन जगायचं, स्वर्ग मोक्ष हे लगेच भेटत नसतं, इथे स्वर्ग निर्माण करायचा असतो. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळी हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माणसं परावलंबी बनली. दुसर्‍याच्या जीवावर जगण्याची प्रवृत्ती तयार झाली. आपल्या मुलावर चांगले संस्कार करा, स्वदेशाबरोबर आपल्या मातीवर आपल्या माणसावर यांना प्रेम करायला शिकवा, कधीतरी सांगा मी मज मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. त्या मातृभूमीविषयी यांना प्रेम निर्माण करा. आधुनिक जीवन जगत असताना संस्काराचा विसर पडू देऊ नका. आपल्या माणसाचा अभिमान धारण करा. आपल्यातले कोणी पुढे जात असेल तर त्याची स्तुती करा. आजच्या विज्ञान युगात कॉम्प्युटर युगात अंधश्रद्धेला अजिबात थारा देऊ नका. ‘ऐसा ज्याचा अनुभव | विश्व देव सत्यत्वे ॥ देव तया जवळी असे | पाप नासे दर्शने ॥’ पाप ताप दैन्य संत दर्शनाने जातं पण संत दर्शन होण्यासाठी आपल्याकडे पुण्य पाहिजे. ते पुण्य मनुष्य जीवनात प्राप्त करून घेता येते. शहराच्या ठिकाणी असा अखंड हरिनाम सप्ताह करून संस्काराची खर्‍या अर्थाने शिदोरी निर्माण करत आहात. माणसाने अतिशय आनंदाने जीवन जगावे असा वेळोवेळी संदेश कीर्तनातून ह.भ.प. वाणी भूषण दयानंद महाराज कोरेगावकर महाराजांनी केला.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी व माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा निमित्त ह.भ.प. वाणी भूषण दयानंद महाराज कोरेगावकर यांचे कीर्तन झाला. यावेळी जनसमुदाय उपस्थित होता. बाबासाहेब वाकळे म्हणाले की, सावेडी गावांमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे भव्य दिव्य मंदिरातून त्यांच्या बीजे निमित्त गेल्या २५ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते यामध्ये सात दिवस नामवंत कीर्तनकार यांचे कीर्तन होत असून त्या माध्यमातून समाजामध्ये अध्यात्मिकतेची व धार्मिक तिची गोडी निर्माण होत आहे असे म्हणाले. समाजाने देशाबद्दल, मातेबद्दल प्रेम व अभिमान बाळगावा, विश्व हे परमेश्वराने भरलेले आहे, श्रद्धेने सर्व काही मिळत असते, टाळी हा शब्द आपल्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी आहे, देवाचे दर्शन होण्यासाठी आपल्याकडे पुण्य लागत असते त्यासाठी समाजामध्ये वावरत असताना संतांचे विचार अंगी करावे, असे ह.भ.प. वाणी भूषण दयानंद महाराज कोरेगावकर यांनी सांगितले.