‘जिल्हा मराठा’ संस्थेच्या अध्यक्षपदी रामचंद्र दरे यांची बिनविरोध निवड

0
38

सचिवपदी अ‍ॅड. विश्वासराव आठरे पाटील, उपाध्यक्षपदी डॉ. विवेक भापकर, सहसचिवपदी जयंत वाघ, खजिनदारपदी अ‍ॅड. दिपलक्ष्मी म्हसे

नगर – नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या अहम दनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपडी रामचंद्र दरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर सचिव पदी अ‍ॅड. विश्वासराव आठरे पाटील, उपाध्यक्षपदी डॉ. विवेक भापकर, सहसचिवपदी जयंत वाघ, खजिनदार पदी अँड. दिपलक्ष्मी म्हसे यांच्याही निवडी झाल्या आहेत. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नवीन पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी (दि.२५) अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. तथापि, अर्ज भरण्याच्या मुदतीच्या शेवटच्या दिवसाअखेर प्रत्येक पदासाठी केवळ एकच अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्या. तथापि, अधिकृत निवडी नंतर घोषित केल्या जाणार आहेत. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे या पूर्वीचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी ११ ऑगस्ट २०२३ रोजी संस्थेच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. तो संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या २५ ऑगस्टच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. त्या वेळी अध्यक्षपदाच्या निवडीचे पुढील सोपस्कर पूर्ण होईपर्यंत संस्थेचे तत्कालीन ज्येष्ठ विश्वस्त रामचंद्र दरे यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभारी पदभार देण्यात आला होता. अध्यक्ष झावरे यांनी दिलेल्या राजीनाम्यावर विश्वस्त मंडळाने चर्चा करुन हा निर्णय घेतला होता. तत्पूर्वी संस्थेच्या १४ विश्वस्तांनी झावरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर मतदानही झाले होते. तथापि, ते सीलबंद ठेवण्यात आले होते. एका बड्या नेत्याने मध्यस्थी करत झावरे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्याऐवजी त्यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असा तोडगा काढण्यात आला होता. त्यानुसार आणखी वितुष्ट नको म्हणून झावरे यांनीच स्वत:हून राजीनामा दिला होता. त्याच वेळी आता संस्थेच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात झावरे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी आग्रही असलेल्या अन्य १४ विश्वस्तांमधून दरे यांच्याच नावाला पसंती मिळाली होती. त्यानंतर नव्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणे सर्व पाचही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने या निवडी बिनविरोध झाल्या आहेत.