आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र आरोग्यपूर्ण म्हातारपण

0
88

सुनंदामावशी 60 वर्षांच्या आहेत. शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या. आयुष्यभर नोकरी व घर जबाबदारीने सांभाळले. आता या वयात त्यांना दोन सुना आल्या. परंतु तरीही घरातील प्रत्येक काम स्वतःच करण्याचा प्रयत्न करत असत. सुनेने केलेले काम त्यांना पटत नसे. एके दिवशी माळ्यावरील पापड्यांचा डबा काढायला त्या खुर्चीवर उभ्या राहिल्या. खुर्ची अचानक कलंडल्यामुळे खाली पडल्या. त्यांच्या मांडीच्या हाडाला फ्रेंक्चर झाले. कमरेतील तीन मणके सरकले. त्यानंतर हॉस्पिटलम ध्ये संपूर्ण एक महिना ऍडमिट राहावे लागले. वर्षभर घरी आराम करावा लागला. या काळात त्यांना दुसर्‍यावरच अवलंबून राहावे लागले. आता त्या सुनेने केलेला स्वयंपाक व मोलकरणीने केलेले काम या आधारावरच जीवन जगत आहेत. खरे तर सुनंदामावशींना या वयात माळ्यावरून डबा काढण्याची गरजच नव्हती. या वयामध्ये काम आपल्याला झेपेल का, याचा विचार करायला हवा होता. कारण काम करण्याचा उत्साह तारुण्यावस्थेप्रमाणेच असला तरी वाढत्या वयानुसार शरीरातील पेशींची, स्नायूंची कार्यक्षमता कमीकमी होत जाते. हाडे पोकळ होतात. त्यामुळे छोट्याशा अपघातानही हाड फ्रेंक्चर होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे इतरांच्या सहकार्याने सर्वांशी प्रेमाने वागून वृद्धांनी आपली दिनचर्या आचरणात आणावी. या वयात शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे मासिक पाळी बंद झाल्यामुळे कॅल्शिअम कमी होऊन हाडे ठिसूळ होतात. सांधे ढिले पडतात. पेशीचे आरोग्य खालावून त्याची वाढ मंद गतीने होते. एकूणच सर्व अवयवांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी त्वचेवर सुरकुत्या दिसतात. डोक्यावरील केस विरळ व पांढरे होतात. कमी दिसते, मोतीबिंदू होतो. कंबरदुखी, गुडघेदुखी बळावते. बरेचसे दात पडतात, कमी ऐकू येते, हात व पाय थरथर कापतात.

या शारीरिक लक्षणांबरोबरच मानसिक लक्षणेही दिसू लागतात. कारण मेंदूची कार्यक्षमता कमी होते. परिणामी विस्मरण होते. स्वयंपाकघरात आपण कशासाठी गेलो किंवा फ्रीज कशासाठी उघडला हे बर्‍याचशा स्त्रियांना आठवत नाही. सतत उदास वाटणे, छोट्याशा कारणांवरून चिडचिड होणे, उगीचच रहायला येणे, एकाकी वाटणे, झोप कमी लागणे, स्वतःचेच म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करणे, हेकेखोर वृत्ती वाढणे असे मानसिक बदलही होतात. या सर्व कारणांमुळे घरातील तरुण पिढी वृद्ध व्यक्तीकडे दुर्लक्ष करू लागते. हेकेखोर वृत्तीमुळे व चिडचिडीमुळे तरुण पिढी दूर राहण्याचा प्रयत्न करते. दोन पिढ्यांमधील प्रेमाचा व आपुलकीचा संवाद कमी व्हायला लागतो. त्यामुळे वृद्धांनी मनम ोकळी मनोवृत्ती ठेवून नवीन पिढीशी जुळवून घ्यायला हवे. नवीन पिढीनेही वृद्धांचा आदर करायला हवा. यामुळे आपोआपच घरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते. सर्व जण एकमेकांची काळजी घेतात. गृहस्थाश्रमाची जबाबदारी पुढच्या पिढीवर सोपवून या वयात स्त्रियांनी सत्संगाचा मार्ग स्वीकारावा.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400