ओझेमुक्तीचे चार टप्पे

0
67

प्रत्येकालाच स्वत:चे आणि हक्काचे घर हवे असते. परंतु त्यासाठी मोठी रक्कम असणे गरजेचे आहे. आता बँकेच्या गृहकर्जाच्या मदतीने घराचे स्वप्न पूर्ण करू शकतो. मध्यंतरी कोरोना काळात व्याजदरात मोठी घसरण पाहवयास मिळाली आणि हा व्याजदर 6.5 टक्क्यांपर्यंत पोचला. मात्र गेल्या दीड वर्षात सुमारे तीन टक्के वाढ झाल्याने व्याजदर 9 टक्क्यांपर्यंत पेाचला आहे. म्हणजे एप्रिल 2022 मध्ये वीस वर्षांसाठी 6.6 टक्के व्याजदराने घेतलेले गृहकर्ज आता 30 ते 31 वर्षांपर्यंत फेडावे लागणार आहे. या कालावधीत कपात करायची असेल तर प्रीपेमेंटचा पर्याय गृहकर्जादाराकडे राहतो. गृहकर्जाचे प्री पेमेंट करण्यासाठी चार टप्प्यांचा अंगीकार करावा. एक तर प्रीपेमेंट सुरवातीच्या टप्प्यातच केले तर व्याजदराचा बोजा हा बर्‍यापैकी कमी राहतो.

पहिला टप्पा

गृहकर्जासाठी अर्ज – गृहकर्ज दीर्घकाळासाठी असून ते किमान दहा वर्ष तर कमाल 25 ते 30 वर्षांपर्यंत राहते. प्रामुख्याने कर्जाचा कालावधी गृहकर्जदाराच्या वयावर अवलंबून असतो. गृहकर्जाच्या पहिल्या टप्प्यात योग्य कालावधी आणि योग्य बँकेची निवड ही महत्त्वाची राहते. गृहकर्जदार हा दीर्घकाळाचा पर्याय निवडून हप्ता कमी ठेवतो. त्याचवेळी कर्जफेडीचा कालावधी अधिक असेल  तर व्याजही बर्‍यापैकी जाते. शक्य असल्यास कमीत कमी कालावधी ठेवण्याचा प्रयत्न करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डाउन पेमेंट अधिक करणे. तुम्ही 50 लाखांचे कर्ज 8 टक्के व्याजदराने 20 वर्षासाठी घेत असाल आणि त्यात पाच लाख रुपयांचे डाउनपेमेंट वाढविले तर संपूर्ण कालावधीत 6 लाख रुपयांची बचत करु शकता. गृहकर्जाचे व्याजदर अनेक घटकांवर अवलंबून आहे आणि प्रत्येक बँक किंवा आर्थिक संस्था स्वत:च्या धोरणानुसार व्याज आकारणी करत असतात. आजघडीला 40 हून अधिक बँका ग्राहकांना परवडेल अशा व्याजदरात गृहकर्ज देत आहेत. यशिवाय आणखी काही सुविधा देखील देऊ शकतात.

दुसरा टप्पा

20 टक्के कालावधी पूर्ण होणे – गृहकर्ज घेऊन वीस टक्क्याचा कालावधी पूर्ण झाला असेल म्हणजे दोन तीन वर्ष झाले असतील तर हप्त्यातून अजूनही 60 ते 70 टक्के रक्कम ही व्याजातच जात असते. अशावेळी प्रीपेमेंट करणे हा अतिशय चांगला निर्णय ठरू शकतो. नियमित उत्पन्नाव्यतिरिक्त मिळणारा पैसा, बोनस, लाभांश आदी रक्कम ही थेट कर्जाच्या मूळ रक्कमेत भरू शकता. यामुळे कालावधी कमी होतो आणि हप्त्याच्या रक्कमेतही बदल होत नाही. अशा रितीने व्याजारुपी बाहेर जाणारा पैसा वाचू शकतो. वेतनात दरवर्षी चांगली वाढ होत असेल तर हप्त्याच्या रक्कमेत वाढ करायला हवी. उदा. हप्त्यात पाच हजार रुपयांनी वाढ केली आणि 40 लाखांचे गृहकर्ज 7.5 टक्के दराने 20 वर्षासाठी घेतलेले असेल तर हप्ता वाढीनंतर आठ लाखांची बचत होते आणि सात वर्ष अगोदरच कर्जमुक्त होऊ शकतो. कर्ज घेऊन पाच वर्ष झाले असतील आणि अन्य बँका कमी व्याजाची ऑफर देत असतील तर विद्यमान बँकेशी चर्चा करून कर्ज स्थानांतरित करु शकता. आणखी काही फायदे पदरात पाडून बँक बदलू शकता. गृहकर्जात सुधारणा करताना बँकांचे प्रक्रिया शुल्क आणि अन्य शुल्कांचे आकलन करावे. यानुसार कर्जाची बँक बदलायची की नाही याचा निर्णय घ्यावा. या बदलामुळे रक्कमेत किती फरक पडतो, याची आकडेमोड करावी.

तिसरा टप्पा

50 टक्के कालावधी पूर्ण होणे कर्जाचा निम्मा कालावधी झाल्यानंतर हप्त्यातील मूळ रक्कमेत वाढ होऊ लागते आणि ती 60 ते 70 टक्क्यांपर्यंत पोचते. अशावेळी व्याजाची रक्कम ही 30 ते 40 टक्क्यांपर्यंत खाली येते. या टप्प्यात प्रीपेमेंट करण्यापूर्वी गुंतवणुकीच्या अन्य पर्यायावर विचार करण्याची गरज आहे. गृहकर्जापोटी देत असलेल्या व्याजावर करसवलतीचा दावा करत असाल तर अशावेळी गुंतवणुकीला झुकते माप द्यावे. तीस टक्क्यांच्या स्लॅबमधील कर्जदार 9 टक्के व्याजाने कर्ज फेडत असेल आणि त्यावर करवसलत मिळत तो व्याजदर 6.2 टक्केच इतका राहतो. हा व्याजदर कॉर्पोरेट फिक्स बॉंडच्या व्याजदराएवढाच राहतो. या टप्प्यावर मार्केट लिंक्ड गुंतवणुकीचा देखील विचार करू शकता. जोखीम उचलण्याची तयारी असेल तर म्युच्युअल फंड, शेअर बाजारातील गुंतवणकीचा विचार करायला हवा. प्रीपेेमेटपेक्षा हा पर्याय चांगला ठरू शकतो.

चौथा टप्पा

80 टक्के कालावधी पूर्ण या टप्प्यात हप्त्यातील मोठी रक्कम ही मुद्दलातच जात असल्याने प्रीपेमेंटला फारसा अर्थ राहत नाही. अशावेळी अतिरिक्त रक्कम ही प्रीपेमेंटसाठी अजिबात वापरू नये आणि त्यापेक्षा चांगल्या गुंतवणूक योजनेत पैसा वळवावा. नवीन खरेदीची योजना असेल, तणावमुक्त राहायचे असेल किंवा लवकर कर्ज फेडीची मनीषा असेल तर या टप्प्यांवर संपूर्ण रक्कम भरून कर्जमुक्त होऊ शकता.