परदेश दौर्‍यावर जाणार आहात?

0
26

येत्या काही महिन्यांत विशेेषत: ऑक्टोबरनंतर परदेशात जाण्याचे नियोजन करत असाल तर वीस टक्क्यांपर्यंत टीसीएस भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे ही वाढ 1 जुलैपासून लागू होणार होती. पण तीन महिन्यासांठी ही वाढ पुढे ढकलली. सध्यातरी पर्यटकांना, नागरिकांना दिलासा मिळाला असून टीसीएस पाच टक्के दराने भरावा लागणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांतील परदेशातील बुकिंग करताना टीसीएसशी संबंधित नियमांची माहिती ट्रॅव्हल एजंट किंवा कोणत्याही चार्टर्ड अकाउंट्सकडून घेऊ शकता.

कोण करेल कपात ?- ऑक्टोबरनंतर आपण एखाद्या टूर ऑपरेटबरोबर परदेशात जाण्याची तयारी करत असाल तर हा ऑपरेटर आपल्याकडून टीसीएस कापून घेईल. उदा. ब्रिटनला जायचे असेल आणि यासाठी ऑनलाइन ट्रॅव्हल संकेतस्थळ किंवा कार्यालयात पाच लाख रुपयांची बुकिंग करत असाल तर ट्रॅव्हल कंपनी 20 टक्के टीसीएस वसूल करेल. म्हणजे या पॅकेजचा खर्च हा सहा लाख रुपये होईल. टीसीएसची रक्कम ही पॅकेज बुकिंगच्या वेळी भरावी लागेल.

रिफंडसाठी दावा – परदेश दौर्‍यादरम्यान आगाऊन आणि अधिक टीसीएस भरणारा व्यक्ती हा प्राप्तीकर विवरण भरताना रिफंडचा दावा करु शकतो. जोपर्यंत क्लेम केला जात नाही, तोेपर्यंत ही रक्कम लॉक राहते.

एजन्सीच्या बुकिंगवर कर आपण विविध प्रवासी कंपन्यांच्या संकेतस्थळावर टूर पॅकेज घेत असाल तर या कंपन्या आपल्याकडून टीसीएस वसुल करतील आणि तो त्यांचा अधिकार आहे. कारण जेव्हा परदेश टूर पॅकेजचा मुद्दा येतो तेव्हा टीसीएस गोळा करण्याची जबादारी ही ट्रॅव्हल एजन्सीवरच राहते.

कमी खर्चात फायदा नव्या नियमानुसार एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे जर परदेश दौर्‍यावर आपला संपूर्ण खर्च सात लाखांपेक्षा अधिक होत असेल तर वीस टक्के दराने टीसीएस भरावा लागेल. अन्यथा पाच टक्के जुन्या दरानेच टीसीएस कपात केली जाईल. म्हणूनच संपूर्ण प्रवासादरम्यान आपला खर्च हा आंतरराष्ट्रीय डेबिट आणि क्रेडिट कार्डने करावा आणि तो खर्च सात लाखांपेक्षा कमी ठेवावा. परिणामी अधिक टीसीएस देण्यापासून आपला बचाव होईल. शिवाय एखादा व्यक्ती ब्रिटनचा दौरा करत असेल आणि तो तेथे राहण्यासाठी थेट हॉटेलशी संपर्क करून रुम बुक करत असेल तर ब्रिटनचे हॉटेल टीसीएस कपात करणार नाही. मात्र ट्रॅव्हल एजंटने हॉटेल बुक केल्यास तो कपात करु शकतो. याप्रमाणे परदेशी एअरलाइन्स संकेतस्थळावर थेट तिकीट खरेदी केल्यानंतरही टीसीएस आकारला जाणार नाही. या मार्गाने आपण टीसीएस वाचवू शकता, मात्र प्राप्तीकर विभाग हा आपल्याला या खर्चाची माहिती मागवू शकते.

परदेशातील चलनावर कर – परदेश दौर्‍याच्या बुकिंगवरच नाही तर अन्य अधिकृत डिलरकडून परकीय चलन खरेदी केल्यानंतर टीसीएसची कपात केली जाईल. तसेच परदेशात खर्च करण्यासाठी फॉरेक्स कार्डसाठी काही रक्कम आपण बँकेत जमा करतो. त्यावेळी ती रक्कम देखील 20 टक्के टीसीएसच्या कक्षेत येते. अर्थात हे नवीन बदल ऑक्टोबरपासून लागू होणार असून तूर्त तीन महिने तरी जुन्याच पद्धतीची कर आकारणी केली जाणार आहे.

आरोग्य आणि शिक्षणासाठी सवलत – एखादा व्यक्ती गंभीर आजारावरील उपचारासाठी परदेशात जात असेल तर आणि त्याने कागदपत्रे जोडली तर त्यास 20 टक्के टीसीएसच्या व्यवस्थेतून सवलत मिळेल. मग त्याचा खर्च सात लाखांपेक्षा अधिक झालेला असेल तरीही सवलत मिळेल. याशिवाय परदेशात शिक्षण घेणार्‍या मुलांना देखील या नवीन व्यवस्थेतून सवलत देण्यात आली आहे.