आरोग्यदायी उन्हाळ्यासाठी…

0
113

प्रत्येक पदार्थाचं स्वत:चे असे गुणविशेष असतात. या गुणविशेषानुसार आहारात त्या त्या पदार्थांचा आहारातील समावेश नेमका कधी करायचा हे ठरत असतं. हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारे तिळासारखे पदार्थ आपण खाल्ले. आता उन्हाळ्यात काही पदार्थांचा आहारात समावेशं आत्यंतिक गरजेचा आहे. दुसरीकडे काही पदार्थांना आहारातून हद्दपार करायला हवं. आरोग्यदायी उन्हाळ्यासाठी कसा असावा आहारविहार? जाणून घेऊ.

उन्हाळा आरोग्यदायी ठरण्यासाठी रसाळ फळं, ताज्या भाज्या, सॅलेड यांना आहारात वरचं स्थान असायला हवं. या दिवसात डिहायड्रेशनची समस्या डोकं वर काढते. त्यामुळे शरीरात भरपूर पाणी राहणं गरजेचं आहे. त्यामुळे कलिंगड, टरबुज यासारखी रसाळ फळं आणि टॉमेटो, काकडीसारख्या थंडावा देणार्‍या फळभाज्या यांचा समावेश आहारात करा.

कोकम सरबत आणून ठेवा. नारळ पाणी, लिंबू पाणी पित राहा. ताक, फळांचे रस, शोरबा अशा द्रवपदार्थांचं सेवन करा. यामुळे शरीरातील इलेक्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहून तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळू शकेल. तसंच पोषक घटकही भरपूर मिळतील.

दिवसाला 10 ते 12 ग्लास पाणी प्या. सोबतच पोषक घटकही मिळवा. स्ट्रॉबेरी, किवी किंवा अगदी बासिलचा समावेश आहारात करा. ? हिरव्या पालेभाज्या खा. पालेभाज्या पोषक गुणांची खाण मानली जातात. यात कॅन्सरविरोधी घटक असतात. रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता यात असते.

थंड सूप्स घ्या. काकडी, टॉमेटो, पालक यांचं सूप आहारात घेता येईल. आईस टी, आईस कॉफीचा पर्यायही आहे. पण हे पर्याय दैनंदिन आहारात नको.

अतिरिक्त प्रथिनं या दिवसात टाळायला हवीत. प्रथिनं पचायला बरीच जड असतात. त्यामुळे प्रथिनयुक्त आहार घेतल्यानं मळमळणं, निरूत्साही वाटणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. तुमचं वजन 57-58 किलो असेल तर आहारात प्रथिनांचं प्रमाण 57-58 ग्रॅमपेक्षा कमी असणं चांगलं.