जागतिक किडनी दिनानिमित्तानं…

0
69

किडनी हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव. शरीरातील विषारी घटक मूत्रमार्गे बाहेर टाकणं हे किडनीचं प्रमुख कार्य मानलं जातं. या कार्यात अडथळे आले तर अनेक विकारांना निमंत्रण मिळू शकतं. किडनीचं कार्य बंद पडलं तर डायलिसिसला पर्याय नसतो. किडनीच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी 2006 पासून मार्च महिन्याच्या दुसर्‍या गुरूवारी जागतिक किडनी दिन पाळला जातो. यंदा 10 मार्च हा दिवस जागतिक किडनी दिन म्हणून पाळला जाणार आहे. किडनीचं आरोग्य आणि किडनी विकारांबाबत जागरूकता निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या सर्वांगिण आरोग्याच्या दृष्टीनं किडनी या अवयवाचं असलेलं महत्त्व या निमित्तानं अधोरेखित केलं जातं. दरवर्षी एक थीम घेऊन हा दिवस साजरा केला जातो. यंदा लहान मुलांमधील किडनी विकार ही थीम असून त्यात किडनी विकाराच्या प्रतिबंधावर भर देण्यात येणार आहे. वेळीच उपाय योजले तर मुलांमधील किडनी विकारांनाप्रतिबंध करता येतो, असा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे.

किडनी हा शरीरातील अत्यंत गुंतागुंतीचा पण उपयुक्त असा अवयव आहे. आपल्या रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्याचं तसंच लाल रक्तपेशींची निर्मिती करण्याचं आणि हाडांचं आरोग्य राखण्याचं काम किडनी करत असते. यासोबत सोडियम, पोटॅशियमसारख्या खनिजांची पातळी नियंत्रणात राखण्याचं कार्यही किडनी करते. रक्तातलं आम्लाचं प्रमाण नियंत्रणात ठेवलं जातं. मूत्राची निर्मितीही किडनीमुळे होते. अशा अत्यंत महत्त्वाच्या अवयवाची काळजी घ्यायला हवी. भारतातील आकडेवारीवर नजर टाकली तर किडनी विकारांचं गांभीर्य लक्षात येईल. प्रत्येक एक लाख लोकसंख्येपैकी 100 जणांना किडनीशी संबंधित विकार होतात. देशात वर्षाला 90,000 किडनी प्रत्यारोपणांची तर महाराष्ट्रात वर्षाला दहा हजार किडनी प्रत्यारोपणाची गरज असते. डायलिसिसची गरज असणार्‍या रूग्णांपैकी फक्त 22.5 टक्के रूग्णांना उपचार मिळतात. तर फक्त 2.5 टक्के लोकांमध्ये किडनी प्रत्यारोपण केलं जातं. लहान मुलांमध्येही किडनी विकारांचं प्रमाण बरंच जास्त आहे. जीवनशैलीतील बदलांमुळे किडनी विकारांचं प्रमाण वाढताना दिसतंय. धूम्रपान किडनीचा मुख्य शत्रू आहे. धूम्रपानामुळे किडनी विकार होण्याची शक्यता 50 टक्क्यांनी वाढते. जुनाट किडनी विकार बरे होत नाहीत. त्यावर दीर्घकालीन उपचार घ्यावे लागतात. धूम्रपानामुळे किडनीला होणार्‍या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे त्यांचं कार्य मंदगतीनं होतं. भारतात कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित विकारांनंतर किडनीविकार सर्वात घातक मानले जातात. किडनीशी संबंधित विकार हे भारतातील मृत्यूंमागचं तिसरं सर्वात प्रमुख कारण आहे. त्यामुळे धूम्रपान सोडणं, आरोग्यदायी पदार्थांचं सेवन, भरपूर पाणी पिणं आणि वेळोवेळी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी या मार्गांनी किडनी विकारांना आळा घालता येऊ शकतो.