साहित्य सहवास – ‘ऊन…’

0
80

हिवाळ्यात तो पहाटे उठला. खरं तर थंडीमुळे त्याला काहीही करणं अशक्य वाटु लागलं. वेळ पुढे-पुढे जाऊ लागली. कोवळ्या उन्हात बसला. छान वाटलं. आणखी थोड्या वेळाने ऊन खूपच छान वाटलं. दिवसभर याच उन्हात बसुन रहावसं त्याला वाटलं. मे महिन्यात सकाळी दहा वाजेनंतरचं ऊन त्याला चटके देऊ लागलं. दुपारी बारा वाजेनंतरचं ऊन त्याला विस्तवासारखं जाणवलं. उगवणारा सूर्य संध्याकाळी मावळतो. उन्हाचंही लहानपण, तरुणपण, म्हातारपण असतंच. हिवाळ्यात हवहवसं वाटणारं ऊन, उन्हाळ्यात नको वाटतं. भर उन्हात काम करणार्‍या व्यक्ती पाहिल्या की आपल्याला निश्चितच वाईट वाटतं. उन्हाळ्यात कोकम सरबत, ऊसाचा रस, लस्सी, आईस्क्रिम, थंडगार ताक, फ्रिजमधलं पाणी आपल्याला अत्यावश्यक वाटतं. एखादी व्यक्ती म्हणते की त्या दिवशी ऊन ’मी’ म्हणत होतं. अर्थात हा मी, त्याच्या स्वतः बद्दलचा नाहीय तर ’कडक ऊन’ अशा अर्थाचा आहे. दूसरी एखादी व्यक्ती म्हणतेच ना की तो अमुक ऊन स्वभावाचा आहे. एखादी आई आपल्या लेकराला, भाकरी करतांना म्हणते की भाकरी ऊन आहे, घे जेऊन लगेच. उन्हाळ्यातील कडक उन्हाचा आपण धिक्कार करतो पण हेच कडक ऊन हवं असतंच ना कपडे वाळण्यासाठी, उन्हाळ्यातील शेवाया, पापड, कुरड्यासाठी. कडक उन्हामुळे पाण्याची वाफ होऊन वर जाते. वाफेचं रुपांतर ढगात होतं. ढगांतुन पाऊस पडतो. कोवळं ऊन जेवढं गरजेचं आहे तेवढंच ’मी’ म्हणणारं ऊनसुध्दा गरजेचं आहे. ’ऊन स्वभावाचा’ म्हणजेच रागीट स्वभावाचा.

आपल्या मनातही ऊन असतंचना ? छे! शक्य नाही. मनात ऊन असुच शकत नाही. ऊन तर बाहेर असतं. दोघांचा वाद सुरु होतो. मुद्यावरचं भांडण गुद्यावर येतं. एकमेकांना शिव्या, अपशब्दांची लाखोली वाहिली जाते. हा व्देष, ही नकारात्मकता, हे वाईट शब्द म्हणजे सुध्दा ऊनच. मे महिन्यातल्या कडक उन्हाचा धिक्कार करुन, व्देष- तिरस्कार करुन काहीही साध्य होणार नाही. ऊन स्वभावाचा अर्थात रागीट स्वभावाचा काहीही फायदा होत नसतो. कोवळं ऊन हवहवसं वाटतं कारण ड जीवनसत्व कोवळ्या उन्हातुन मिळतं. तसं सकारात्मक विचारांचं कोवळं ऊन आपल्याला अधिकाधिक चांगल्या प्रकारे घडवतं, वाढवतं. उन्हाळ्यातलं अगदीच सकाळचं ऊन, दुपारचं ऊन, संध्याकाळचं ऊन या प्रत्येक ऊन्हाची स्वतःची अशी ओळख आहे, अर्थ आहे. ऊन स्वभावाचे होत जाऊ तर माणसं आपल्यापासून दुरावतील. माणसं दुरावली की आपली प्रगती थांबणार. सहवासातल्या मित्राचा, परिचिताचा, नातेवाईकाचा ऊन स्वभाव असेल तर त्याला, ऊन स्वभावाचे तोटे लक्षात आणुन दिले पाहिजे. माझ्याकडुन होणार्‍या कृतीमुळं अनेकांचं नुकसान होणार असेल तर ते ’मी म्हणणारं ऊन’ असेल. वेगवेगळ्या प्रकारचं ऊन, सजीवांच्या वाढीसाठी देणार्‍या सूर्यदेवाचे ऋण व्यक्त करुया. फक्त एकदाच प्रश्न विचारा – ’ऊन नसतं तर ?’ ह्या एकाच प्रश्नामुळे, अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. कोवळं ऊन अर्थात नम्रपणा हा स्वप्रगतीसाठी फारच आवश्यक आहे. ऊन नसतंच तर पाण्याची वाफ झाली नसती, मग पाऊस पडला नसता. पाऊस पडला नसता तर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असता. धान्य, भाजीपाला शेतात पिकलाच नसता. ऊन म्हणजेही निसर्गच. वर्षानुवर्षे सजीवांना ऊन देणार्‍या सूर्य देवाच्या ऋणात राहुया.

सुनील राऊत

माळीगल्ली, भिंगार,अ नगर., मो.9822758383