फायदे पोर्टेबिलिटीचे

0
53

अलिकडच्या काळात पोर्टेबिलिटी सुविधेला महत्त्व आहे. जर एखादी मोबाईल कंपनी चांगली सेवा देत नसेल आणि अव्वाच्या सव्वा बिल आकारात असेल तर तोच नंबर कायम ठेवत आपण कंपनी बदलू शकतो आणि चांगल्या सेवेचा लाभ घेऊ शकतो. या प्रक्रियेला पोर्टेबिलिटी असे म्हणतात. अर्थात ही प्रक्रिया सर्वांनाच ठावूक आहे. त्याचबरोबर बँक खातेसुद्धा पोर्टेबिलिटी करता येते. आता आरोग्य विमा पोर्टेबिलिटीसुद्धा करता येणे शक्य झाले आहे. या सुविधेच्या माध्यमातून विमा पॉलिसीधारक उपलब्ध फायदे न गमावता चालू पॉलिसी अन्य कंपनीत स्थलांतरित करू शकतो. मग संबंधित पॉलिसीधारक नव्या कंपनीत नव्याने पॉलिसी काढू शकतो किंवा जुनी चालू ठेवू शकतो. आरोग्य विमा पॉलिसी स्थलांतरित करण्याचे फायदे आपल्याला सांगता येतील. आरोग्य विमा पॉलिसीची कंपनी बदलून घेताना काही फायदे आपल्या पदरात पडतात. त्याअनुषंगाने नवीन कंपनी आपल्याला चांगली आणि तत्परसेवेचा लाभ देऊ शकते. त्याचबरोबर तातडीने क्लेम सेटलमेंटची हमीही देते. नवीन आरोग्य विमा आपल्याला नवीन वैशिष्ट्यासह आणि लाभासह मिळू शकते. उदा. ज्येष्ठ नागरिकांना काही कंपन्या आरोग्य विम्याचा लाभ देत नाहीत. अशावेळी नवीन कंपनीत हा लाभ मिळू शकतो.

नवीन आरोग्य विम्याच्या हप्त्याची रक्कम कमी स्वरूपात राहू शकते. अन्य कंपन्यांच्या तुलनेत हप्ता कमी बसवण्यासाठी आपण कंपनीशी वाटाघाटी करू शकतो. पोर्टेबिलीटीचा पर्याय हा सर्व वैयक्तिक, समूह स्वरुपात काढलेल्या आरोग्य विमा पॉलिसीला लागू आहे. त्याचबरोबर फॅमिली फ्लोटर पॉलिसीलाही ही सुविधा लागू आहे. समूह पॉलिसी असेल तर ती पॉलिसी वैयक्तिक पॉलिसीत रुपांतरित करता येऊ शकते. त्याचबरोबर वैयक्तिक पॉलिसी असेल तर समूह पॉलिसीत त्याचा समावेश करता येतो. त्याप्रमाणे वैयक्तिक पॉलिसीचे फॅमिली फ्लोटर पॉलिसीतही आपण रुपांतर करून त्याचा लाभ गेऊ शकतो. आपल्या गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार पॉलिसीत बदल करू शकतो. जुनी पॉलिसी अन्य कंपनीत बदलून घेताना जुन्याबरोबर नवीन लाभही त्यात समाविष्ट करू शकतो. कंपनीच्या अनेक ऑफर्स आपण पदरात पाडून पोर्टेबिलिटीचा लाभ घेता येतो. जुन्या पॉलिसीत बोनसचा समावेश नसेल तर नव्या पॉलिसीत बोनसचा पर्याय आहे का याची चौकशी करून त्याचा लाभ आपण घेऊ शकतो. त्याचप्रमाणे विद्यमान कंपनी बोनस देत असेल तर तो बोनस नवीन कंपनीसुद्धा पॉलिसीधारकाला प्रदान करू शकते.