निवृत्तीनंतरच्या सुखमय जीवनासाठी

0
97

बचतीला सुरवात करा – तुम्ही अजुनही बचतीला किंवा गुंतवणूकीला सुरवात केली नसेल तर आतापासूनच बचतीची सवय लावून घ्या. सध्याचा खर्च खूप असला तर कमीत कमी किती बचत करता येईल, याचा विचार करून त्यानुसार नियोजन करणे गरजेचे ठरतेे. मुख्यत्वे पेन्शन प्लॅनला प्राधान्य दिले पाहिजे. बचतीसाठी सरकारी आणि खासगी वित्तीय संस्थेच्या अनेक योजना आहेत. या योजनेबाबत आर्थिक सल्लागाराकडून माहिती घेऊन आपले उत्पन्न आणि गुंतवणूक याचा मेळ बसवून बचतीला सुरवात केली पाहिजे.

पेन्शन प्लॅनची माहिती घ्या : नोकरदार असाल तर आपल्याला मिळणार्‍या पेन्शनची आणि लाभाची माहिती घेणे गरजेचे आहे. आपली नोकरी, वय आणि मिळणारा लाभ याचा ताळेबंद करून मिळणारी पेन्शन समाधानकारक असेल का, याबाबत चर्चा करणे गरजेचे आहे. वैयक्तिक लाभ किती मिळणार आहेत, याचीही कंपनी किंवा सरकारी कार्यालयातून माहिती घेणे हिताचे ठरू शकते. जर आपण नोकरी बदलणार असू तर पेन्शनच्या योजनेत किती फरक पडणार आहे, हेही जाणून घेतले पाहिजे. पूर्वीच्या नोकरीतून निवृत्ती योजनेतून किती फायदा झाला, जोडीदाराला किती लाभ मिळू शकतो याचा अभ्यास केला पाहिजे.

निवृत्तीनंतरची गरज – निवृत्तीनंतरचे जीवनमान खर्चिक असते. आजारपणे, लग्नसमारंभ, घरखर्च आदी बाबींचा याच समावेश होतो. तरुणवयात असणारा उत्पन्नाचा स्त्रोत निवृत्तीमुळे थांबल्याने आपण केलेल्या बचतीवरच उदरनिर्वाह करावा लागतो. त्यामुळे अर्थतज्ज्ञांच्या मते, निवृत्तीसाठी सुमारे 70 टक्क्यांपर्यत बचत केली पाहिजे. त्यापेक्षा चांगली कमाई करणार्‍या व्यक्तीने तर ही बचत 90 टक्क्यांपर्यत न्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निवृत्तीनंतरही आपल्या राहणीमानात, जीवनशैलीत फरक पडू नये याची काळजी आपण अगोदरच घेणे गरजेचे आहे.

बचत मोडू नका – आपण नियोजन करून केलेली बचत किंवा गुंतवणूक मोडण्याची वेळ येते. उदा. अचानक उदभवलेले आजारपण, शिक्षण, घर आदी गोष्टीसाठी पैसे जमविताना होणारी दमछाक करण्यापेक्षा केलेली बचत, गुंतवणूक काढण्याचा विचार करतो. विशेषत: भविष्य निर्वाह निधीतून पैसा काढण्याचा अनेक जण विचार करतात. शक्यतो अशा योजनातील पैसे काढल्यामुळे व्याजावर आणि करसवलतीवर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा वेळी तात्पुरते कर्ज काढून किंवा अन्य खर्चात कपात करून निधी उभारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेगवेगळ्या फंडात गुंतवणूक किंवा बचत केली तर फायदे चांगले मिळतात. कमी जोखमीचे आणि जादा परताव्याचे फंड घेण्यासाठी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. योग्य आर्थिक नियोजन केल्यास निवृत्तीनंतरचे जीवन सुखमय होऊ शकते.