क्रेडिट शिफ्ट करताना…

0
55

आपले बिल आणि कर्ज हे एका बँकेतून दुसर्‍या बँकेत ट्रान्सफर करता येते, हे आपल्याला ठाऊक आहे का. या प्रक्रियेलाच आपण बॅलेन्स ट्रान्सफर असेही म्हणतो. मात्र प्रामुख्याने त्याचा वापर हा व्याजाचे ओझे कमी करण्यासाठी केला जातो.

क्रेडिट कार्डमध्ये कर्जाची विभागणी : एखादे मोठे कर्ज असेल तर त्याची विभागणी वेगवेगळ्या क्रेडिट कार्डमध्ये करणारे अनेक कार्डधारक दिसतात. ते अशा प्रकारची कृती का करतात, असा प्रश्‍न आपल्याला पडू शकतो. यामागे कारण म्हणजे कार्डवर कमी भरणा असेल तर आपसूक व्याजाचे ओझे कमी राहू शकते. मात्र उर्वरित कर्जावर वार्षिक 40 टक्क्यांपर्यंत व्याज द्यावे लागते. बॅलेन्स ट्रान्सफरने आपण एवढ्या मोठ्या प्रमाणातील व्याज देण्यापासून वाचू शकता. क्रेडिट कार्ड देणार्‍या अनेक बँका अशा आहेत की, दुसर्‍या बँकच्या क्रेडिट कार्डमध्ये रक्कम ट्रान्सफर केली तरी काही महिन्यांपर्यंत व्याजही आकारत नाहीत. साधारणत: 6 महिन्यांचा सवलतीचा कालावधी असतो. मात्र यासाठी प्रोसेसिंग फी भरावी लागते. काही प्रकरणात तर आपल्याला एकूण आऊटस्टँडिंगवर दर महिन्याला एक ते दोन टक्क्यांपर्यंत दराने व्याज द्यावे लागते.

असा लाभ उचला : बॅलेन्स ट्रान्सफरच्या सुविधेवर काही ठिकाणी सहा महिन्यांपर्यंत व्याजात सवलत मिळते असल्याने कर्जदाराला मोठी सवलत मिळते.यादरम्यान कर्जाच्या रकमेची जुळवाजुळव करण्यासाठी बर्‍यापैकी कालावधी मिळतो. अर्थात व्याजमुक्तीच्या काळात आऊटस्टँडिंग क्लिअर न झाल्यास सामान्य दराने व्याजाची आकारणी होते. काही कार्ड असेही असतात की त्यात सहा महिन्याच्या अगोदर बॅलेन्स ट्रान्सफरची सुविधा मिळत नाही. तीन मुद्दे महत्त्वाचे : बॅलेन्स ट्रान्सफर करताना नवीन बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि प्रोसेसिंग फीस आणि त्याच्या व्याजदराबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. कधी कधी छुप्या मार्गाने शुल्क आकारणी होते. जर आपण सध्याच्या क्रेडिट कार्डचे बिल किंवा कर्ज भरू शकत नसाल आणि भरभक्कम व्याज द्यावे लागणार असेल तर आपण क्रेडिट ट्रान्सफर करू शकता. आपला पुरेसा वेळ देणार्‍या बँकेच्या क्रेडिट कार्डची निवड करावी. जेणेकरून कर्ज फेडण्यासाठी वेळ मिळेल.