चक्रवाढ व्याजाचे फायदे

0
54

गुंतवणुकीसाठी आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पूर्वी सोने, जमीन किंवा मुदत ठेव याठिकाणी गुंतवणुकीला प्राधान्य असायचे. आज शेअर बाजार, म्युच्युअल फंड, गोल्ड इटिएफ, सरकारी बॉंड याचा अधिक विचार होताना दिसून येतो. आर्थिक गुंतवणुकीबात नवीन पिढी सजग झाली असून मुदत ठेव किंवा सोन्यात गुंतवणूक करण्यापेक्षा गुंतवणुकीची कायम संधी देणार्‍या शेअर बाजाराकडे ओढा वाढला आहे. तरीही अनेक गुंतवणुकदार पैसा बुडेल या भीतीपोटी शेअर बाजारात पैसा टाकण्यात टाळाटाळ करतात. परंतु यातूनही एक मध्यमार्ग आहे. तो म्हणजे म्युच्युअल फंड आणि त्यातही एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन). तुमचे वय 25 असेल तर तुम्ही चक्रवाढ व्याजाच्या माध्यमातून लखपती होण्याची शक्यता अधिक आहे. जर तुम्ह 35 ओलांडली असेल तर गुंतवणूक डबल करून लखपती होऊ शकता. चक्रवाढ पद्धतीतून मिळणारा परतावा हा कधी कधी कल्पनेपेक्षा अधिक देणारा ठरतो. ठराविक काळानंतर जमा झालेली रक्कम ही पाल्याच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी,कर्जफेडीसाठी किंवा घर घेण्यासाठी मदतगार सिद्ध होते. चक्रवाढ पद्धतीने मिळणारे व्याज हे मागील गुंतवणुकीपेक्षा अधिक गुंतवणूक वाढवणारे ठरते. त्याचबरोबर एखादा कर्जदार असेल तर त्याची अनेक वर्षे चक्रवाढ व्याजाने आकारल्या जाणार्‍या व्याजदरातून त्याची सुटका होत नाही. त्यासाठी जास्तीत जास्त कर्जखात्यात आगावू रक्कम भरणे हिताचे ठरते.

चक्रवाढ व्याज कसे काम करते? – बारा वर्षांसाठी दरमहा एक हजार रुपये बचत केल्याचे गृहीत धरा. आठ टक्के चक्रवाढ व्याजदराने ही रक्कम साधारणत: 1 लाख 84 हजार इतके होते. जर पुढे बचत सुरु ठेवली नाही तर ती पंधरा वर्षांनंतर त्याची किंमत सुमारे 2 लाख 70 हजार इतकी होते. एसआयपीतून किमान दहा आणि जास्तीत जास्त 18 ते 20 टक्के व्याज मिळालेले आहे. बाजारातील प्रवेश आणि बाहेर पडण्याची वेळ कशी निवडता त्यावर फायदा-नुकसान अवलंबून असते. दीर्घकाळ गुंतवणूक सुरू ठेवल्यास फायदाही तेवढ्याच प्रमाणात आपल्या पदरात पडतो. किमान तीन वर्षे तरी एसआयपी सुरू ठेवावी, असे मानले जाते.

नफा-तोट्यात समतोल – चक्रवाढ पद्धतीत गुंतवण्यात येणारी रक्कम ही स्थिर राहते. जर त्यात नियमित गुंतवणूक करत असाल तर त्यात फारसे नुकसान होत नाही. कालांतराने झालेले नुकसान भरून निघते. कधी कधी कमी कालावधीतही चांगला नफा मिळवून बाहेर पडू शकता. एसआयपीचा विचार केला तर नुकसानीच्या काळात जास्तीत जास्त यूनिट आपल्या खात्यात जमा होतात आणि बाजार वरच्या पातळीवर असताना त्याच युनिटला अधिक भाव येतो. त्यातील नफा काढून आपण मुद्दल बाजारात ठेवू शकतो. त्यामुळे बाजार पडतो तेव्हा गुंतवणुकीची संधी असते, असे नेहमी म्हटले जाते.

कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल ? – जर तुमची एसआयपी सुरू करण्यासाठी पुरेशी तयारी झाली नसेल तर तुम्ही कर्जाची रक्कम कमी करण्यासाठी पुढाकार घेऊ शकता. कर्जाचे मुद्दल कमी करण्यासाठी आर्थिक नियोजन करण्याचा प्रयत्न करून नियमित इएमआय व्यतिरिक्त जादा रक्कम कर्जात भरण्याचा विचार करा, जेणेकरून चक्रवाढ व्याजातून मुक्ती मिळेल. जर तुम्हाला कर्जमुक्तीचे जीवन हवे असेल तर तुम्ही नेहमीच अधिक रक्कम भरण्याची तयारी करायला हवी. यामुळे लवकर तुमचे कर्ज फिटेल आणि नव्याने गुंतवणूक करण्यासाठी मार्ग मोकळा होईल.

व्याजपद्धत सर्वांनाच फायदेशीर ? चक्रवाढ व्याजपद्धतीने मिळणारी रक्कम ही सर्वांनाच फायदेशीर ठरते. उच्च गटातील किंवा उच्च उत्पन्न गटातील मंडळींना गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय असतात. परंतु ज्याचे उत्पन्न मर्यादित आणि कमी आहे, अशा मंडळींना गुंतवणुकीवर मर्यादा येतात. त्यामुळे कमी गुंतवणुक असूनही चक्रवाढ व्याज मिळत असेल तर त्याचा निश्‍चितच फायदा मिळतो. बारा वर्षांसाठी आठ टक्के चक्रवाढ पद्धतीने मिळणारे व्याज हे गुंतवणूक दुप्पट करणारे ठरते. चोवीस वर्षात हीच गुंतवणूक चौपट झालेली असते.

आज बचत, उद्या फायदा ? आजच्या खर्चातून काही पैसे वाचवता आले तर भविष्यासाठी ही गुंतवणूक किंवा बचत निश्‍चित फायदेशीर ठरते. प्रसिद्ध गुंतवणुकदार वॉरेन बफे यांच्या मते, अगोदर गुंतवणूक करा आणि राहिलेल्या पैशातून खर्च करा. बफे यांचा हा संदेश मोलाचा आहे आणि फायदेशीर आहे. आज खिशाला किंवा काही प्रमाणात सुखसोयीना कात्री लावत बचत, गुंतवणूक केल्यास उद्याचा दिवस निश्‍चितच सुवर्णकाळ घेऊन येणारा ठरू शकतो.