शरीर हीच संपत्ती

0
115

एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता. तो दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावित असे. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळू हळू तो खूप श्रीमंत झाला परंतु त्याला अनेक रोगांनी विळखा घातला. तो व्यक्ती स्वार्थी नव्हता, परंतु त्याच्याकडे आपला पैसा खर्च करण्यासाठी वेळ नव्हता त्याला जणू पैसे कमावण्याची सवयच लागली होती. त्याला डॉक्टरांकडे जाण्यासाठी वेळच मिळत नसे. शरीराकडे लक्ष न दिल्याने हळूहळू त्याचे शरीर कमजोर व्हायला लागले. एक दिवस कामावरून थकून तो घरी आला. आज त्याचे डोके खूप दुखत होते, म्हणून तो सरळ आपल्या रूममध्ये जावून झोपून गेला. जेव्हा त्याच्या नोकराने त्याला जेवायला विचारले तेव्हा भूक नाही म्हणून, त्याने जेवायला नाही म्हटले.

अर्ध्या रात्री त्याचे डोक्यात अतिशय वेदना व्हायला लागल्या. त्याला काहीही लक्षात येत नव्हते. अचानक त्याच्या समोर त्याच्याच आकाराएवढी एक आकृती उभी राहिली. ती आकृती म्हणाली, ‘‘मी तुझी आत्मा आहे आणि आज मी तुझे शरीर सोडून जाणार आहे.’’ तेव्हा तो माणूस भित भित म्हणाला, ‘‘तू माझ्या शरीराला का सोडत आहे? माझ्याकडे भरपूर पैसा आहे व मी माझे संपूर्ण आयुष्य मेहनत केली आहे. मी एवढ्या विशाल घरात राहतो, की या घरात राहण्याची आणि अनेक जण फक्त स्वप्नेच पाहतात.’’ आत्मा म्हणाली, ‘‘माझी गोष्ट ऐक, तुझे हे मोठे घर माझ्या काहीही कामाचे नाही. माझे घर तर तुझे शरीर आहे. जे दिवसेंदिवस कमजोर होऊन, अनेक रोगांनी ग्रसीत झाले आहे. तू कल्पना कर अनेक वर्षे तुटलेल्या झोपडीत राहण्याची. बस त्याच पद्धतीने तू माझी हालत केली आहे आणि आता मी या घरात अधिक काळ राहू शकत नाही. एवढे बोलून आत्मा त्या शरीराला सोडून निघून गेली.’’

तात्पर्य – शरीर व चांगले स्वास्थ्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे.