मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज -अन्नाचे पचन कसे होते?

0
75

जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. अन्नाखेरीज माणूस जास्तीत जास्त 7 आठवडे जिवंत राहू शकतो. आपल्या अन्नात कर्बोदके, प्रथिने, स्निग्धपदार्थ, क्षार, जीवनसत्त्वे आणि पाणी हे सहा घटक असतात. आपण खातो त्या स्वरूपात शरीर अन्नाचा उपयोग करू शकत नाही. शरीराच्या पोषणासाठी या पदार्थांचे बारीक, रक्तात शोषले जातील अशा घटकात रूपांतर व्हावे लागते. पचनामुळे हीच प्रक्रिया होते. निरनिराळ्या विकारांमुळे ही प्रक्रिया घडून येते. या घटकांमधील हा बदल म्हणजेच अन्नाचे पचन होणे. आपण अन्नाचा घास तोंडात ठेवल्यानंतर दाताने त्याचे बारीक तुकडे करतो. हे होत असतानाच त्यात लाळ मिसळली जाते. लाळेतील विकरामुळे कर्बोदकांचे काही प्रमाणात पचन होते. एक घास खूप वेळा चावून चावून खावा असे म्हणतात, ते यासाठीच. नंतर हे अन्न अन्ननलिकेतून जठरात येऊन पोचते.

जठरात अन्न दीड ते दोन तास राहते. तसेच स्नायूंच्या आकुंचन प्रसरणाने अन्न घुसळले जाते. येथे हायड्रोक्लोरिक आम्ल व गॅस्ट्रीन आदी जठरात स्रवणार्‍या द्रव्यांमुळे पचनाची क्रिया होते. नंतर अन्न लहान आतड्यात येते. येथे अन्नात पित्तरस आणि स्वादुरस मिसळला जातो, तसेच आतड्यातून आणखी एक रस (आंत्ररस) पाझरतो. या रसांमुळे अन्नातील सगळे अन्नघटक नीट पचवले जातात व मग हळूहळू आतड्याच्या आवरणातून रक्तात शोषले जातात. अन्नाचे पचन व शोषण लहान आतड्यात होते. बरीचशी औषधेही लहान आतड्यातच शोषली जातात. त्यामुळे लहान आतड्याचा रोग झाल्यास, अन्नपचन न झाल्याने कुपोषण होण्याची शक्यता असते. लहान आतड्यातून अन्न मोठ्या आतड्यात येते. यात बहुतांश चोथा व पाणीच असते. मोठ्या आतड्यात पाण्याचे शोषण होते व चोथा जमा होवून संडासवाटे बाहेर टाकला जातो. अशा प्रकारे पचनाच्या क्रियेतून कर्बोदकांचे ग्लुकोजमध्ये, प्रथिनांचे अमीनो आम्लामध्ये, तर स्निग्ध पदार्थांचे मेदाम्लात रूपांतर होते व त्यांचा वापर शरीराची वाढ व विकास यासाठी केला जातो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून, पचन चांगले असेल तर आरोग्य चांगले राहते. यासाठी भूक लागल्यावरच जेवावे. दुपारी जेवल्यानंतर झोपू नये. जेवताना दोन घास कमीच खावे. रात्री जास्त जेवू नये. दुपारी 12 ते 1 व रात्री 7 ते 8 या जेवणाच्या योग्य वेळा होत. रात्री जागरण टाळावे आणि बद्धकोष्ठ होऊ देऊ नये. सूर्योदयापूर्वी मलविसर्जन व्हावे. असे केल्याने आपण नक्कीच निरोगी राहू शकू.