नाट्य कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ लवकरच नगरकरांच्या सेवेत सुरु होणार -आ. संग्राम जगताप

प्रोफेसर कॉलनी चौक येथील मनपाच्या नाट्यसंकुल कामाची पाहणी

नगर – मनपाच्या माध्यमातून नगरकरांच्या हक्काचे नाट्यसंकुल शहरात असावे यासाठी महापौर असताना काही प्रमाणात शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आणि कामाला देखील सुरुवात झाली मात्र या कामामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होत गेल्या. त्यावर मात करीत शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर नाट्य संकुलनाचे सिव्हिल वर्कचे काम अंतिम टप्प्यात आले, मात्र ठेकेदार कंपनीच्या काही अडचणीमुळे काम केले जात नसल्यामुळे महापालिका प्रशासनाने ठेकेदार बदलला असून, उर्वरित काम येत्या चार महिन्यात पूर्ण होईल आणि नाट्य कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ लवकरच नगरकरांच्या सेवेत सुरु होणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. प्रोफेसर कॉलनी चौक येथील मनपाच्या नाट्यसंकुल कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक धनंजय जाधव, निखिल वारे, संजय चोपडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, शहर अभियंता मनोज पारखे, आर्किटेक मनोज जाधव, अजय दगडे, मुकुल गंधे, नाट्य कलाकार अ.भा.मराठी नाट्य परिषद अध्यक्ष अमोल खोले, उपाध्यक्ष शशिकांत नजान, ज्येष्ठ रंगकर्मी पी.डी.कुलकर्णी, श्रेणिक शिंगवी, स्वप्नील मुनोत, प्रसाद बेडेकर, अनंत रिसे, गायक पावन नाईक, अनंत द्रविड आदी उपस्थित होते अहिल्यानगर शहराला नाट्य चळवळीचा मोठा वारसा लाभलेला असून आपले नाट्य कलाकार राज्यात कला सादर करून नावलौकिक वाढवत आहे त्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि अनेक वर्षाची त्यांची मागणी पूर्ण केली आणि नाट्यसंकुलचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. १४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाट्य संकुलन उभे राहावे यासाठी नाट्य कलाकार महापालिकेवर मोर्चे, आंदोलने केली, हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि आमच्या लढ्याला यश आले. लवकरच नाट्य संकुलनाचे काम पूर्ण होऊन या ठिकाणी युवा नाट्य कलाकारांना आपली कला सादर करता येईल, असे नाट्य कलाकार श्रेणिक शिंगवी यांनी सांगितले नाट्य संकुलनाचे काम मार्गी तातडीने मार्गी लागावे यासाठी उपाययोजना करत कामाला गती दिली. येत्या तीन महिन्यांमध्ये सिविल वर्कचे काम पूर्ण होईल आणि नाट्य कलाकारांना बरोबर घेऊन लाईट सिस्टीम, साऊंड सिस्टिम, बैठक व्यवस्था, चेंजिंग रूम, व्हीआयपी रूम याबाबत चर्चा करून पुढील कामालाही सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

 

हेच का मनपा आयुतांचं फ्लेसमुक्त शहराचं धोरण?

संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे ठिकाण फ्लेसमुक्त करा, पुतळा व नाट्यगृहाचे काम तात्काळ पूर्ण करा

नगर – नुकतेच मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी शहर फ्लेसमुक्त करणार असल्याचे धोरण जाहीर केले. अनधिकृत फ्लेसवर कारवाई केली जाईल असे सांगितले. मात्र प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये लावण्यात आलेल्या राजकीय अनधिकृत फ्लेस वरून हेच का मनपा आयुक्तांचे फ्लेसमुक्त शहराचे धोरण?, असा सवाल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला शहराचं बॅनरबाजीमुळे विद्रूपीकरण होत आहे. हे थांबवत शहर स्वच्छ केल पाहिजे. मनपाने जाहीर केलेल्या धोरणाचे आम्ही काँग्रेसकडून निश्चितपणे स्वागत करतो. मात्र मनपाचे धोरण हे सर्वांसाठी समान नसून सत्ताधारी राजकीय पक्षांना यातून सूट देण्यात आली आहे. म्हणूनच इतर राजकीय पक्ष तसेच व्यावसायिक जाहिरातींचे फलक मनपाने काढले खरे. मात्र काहींना यातून मनपाने सूट दिली आहे. आयुक्तांनी सांगितले होते की इथून पुढे शहरात फ्लेस लावण्यापूर्वी मनपाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. परवानगीचा क्रमांक संबंधित फ्लेसवर छापावा लागेल. तो न छापता फ्लेस लावला गेल्यास फ्लेस छपाई करणार्‍या प्रिंटर्सवर देखील गुन्हा दाखल केला जाईल. ज्यांचे फ्लेसवर फोटो, नावे आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले जातील. आता मनपा या राजकीय फ्लेसबाजी करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची धमक दाखवणार काय?, असा सवाल किरण काळे यांनी आयुक्त डांगे यांना केला आहे. पुतळ्याचे काम तात्काळ पूर्ण करा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे आणि पुतळ्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच या ठिकाणी फ्लेसचा बाजार भरला आहे. मनपाने ही जागा तात्काळ फ्लेसमुक्त करत रखडलेले काम तात्काळ पूर्ण करावे. नाट्यगृहाबाबत आश्वासने नको कृती हवी फ्लेसबाजीच्या . छायाचित्रात मागे मनपाच्या प्रलंबित नाट्यगृहाचा भग्नावस्थेतील सांगाडा दिसत आहे. काँग्रेसने यापूर्वी देखील पोलखोल करत या ठिकाणी तळीरामांच्या भरलेल्या अड्ड्याचे ओंगळवाणे चित्र मनपासमोर मांडले होते. मात्र अनेक दिवस उलटूनही हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. कालच या जागेची पाहणी शहराच्या लोकप्रतिनिधींनी करत लवकरच हे काम पूर्ण होईल असे म्हटले होते. यावर किरण काळे म्हणाले की, काम लवकर होईल असे आजवर लोकप्रतिनिधी मागील सुमारे सात ते आठ वर्षांपासून सांगत आहेत. आश्वासन नको कृती करा. नाट्य, साहित्य, संगीत कलाकार आणि रसिकांची मागणी पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा किरण काळे यांनी दिला आहे.

 

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांचा ४ जानेवारीला नगरमध्ये सर्वपक्षीय सत्कार

नगर – राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका या पार पडल्या व महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. या निवडणुकीत कर्जत जामखेडचे महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांचा पराभव झाला मात्र शिंदे यांना पक्षाकडून एकनिष्ठेचे फळ मात्र मिळाले. शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागली. राज्यातील एक महत्त्वाचे संविधानिक पद व नगर जिल्ह्याच्या अनुषंगाने त्याचे महत्त्व पाहता नामदार राम शिंदे यांचा नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय यांच्यावतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता नगर शहरातील माऊली संकुल या ठिकाणी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला समाजसेवक अण्णा हजारे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे व पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रमुख उपस्तिीत असणार आहे. तसेच जिल्ह्यातील दोन्ही खासदार व सर्व लोकप्रतिनिधींसह पक्षाचे सर्व पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत. भाजपचे अभय आगरकर म्हणाले, आमच्या कडून सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे. आम्ही वारंवार सर्वांना फोनदेखील केले आहेत. जिल्हा विकासासाठी सर्व पक्ष एकत्र येणार का? आमदार राम शिंदे यांची वर्णी राज्यातील सांविधानिक पदावर लागली असून विधानपरिषदेचे सभापती शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. नगर जिल्ह्याच्या भूमिपुत्राच्या या यशाबद्दल सर्वपक्षियच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान या सत्कारासाठी सर्वपक्ष एकवटणार आहे मात्र अशीच परिस्थिती जिल्ह्याच्या विकासासाठी भविष्यात दिसणार का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. दरम्यान हे या दृष्टीने पहिले पाऊल असल्याचे यावेळी अभय आगरकर यांनी म्हंटले आहे. यावेळी प्रा. भानुदास बेरड, वसंत लोढा, अनिल शिंदे, संभाजी कदम, संजय आडोळे, किरण काळे आदी उपस्थित होते

 

शहरातील रस्त्यांच्या कामातील आर्थिक गैरव्यवहाराबाबतचा तक्रार अर्ज चौकशीसाठी महापालिका आयुक्तांकडे केला वर्ग

पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची तक्रारदाराला माहिती

नगर – महापालिका हद्दीत रस्त्यांच्या कामासाठी आलेल्या निधीचा महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी ठेकेदारांशी संगनमत करून निकृष्ट दर्जाचे काम करत आर्थिक गैरव्यवहार केल्या बाबत पोलिसांकडे करण्यात आलेला तक्रार अर्ज पुढील चौकशी व कारवाईसाठी महापालिका आयुक्तांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तक्रारदार यांना गुरुवारी (दि.२) पत्राद्वारे कळविली आहे. याबाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी २७ ऑगस्ट २०२४ रोजी पोलिस अधिक्षक राकेश ओला यांची भेट घेत नगर शहरात डांबरी व सिमेंट क्रॉकीटीकरणाचे रस्ते विकास कामा करीता आलेल्या निधीचा महापालिकेतील बांधकाम विभागांचे अधिकारी व नियुक्त ठेकेदार यांनी संगनमताने निकृष्ट दर्जाचे केलेल्या रस्त्याचे बांधकामातुन झालेल्या आर्थिक गैरव्यवहार बाबतचा तक्रारी अर्ज दिलेला होता. सदर तक्रार अर्जाची प्रत पोलीस अधीक्षक यांचे आदेशान्वये पुढील चौकशीकरीता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. सदर अर्जाचे अवलोकन करता शासना कडून रस्ते विकासा करीता प्राप्त निधीचा गैरवापर करून बांधकाम विभागांचे अधिकारी व नियुक्त ठेकेदार यांनी संगनमताने निकृष्ट दर्जाचे केलेल्या रस्त्याचे बांधकामात झालेल्या मोठया आर्थिक गैरव्यवहार बाबत शासनाची फसवणुक केल्याचे नमुद आहे. सदर निधीवर महापालिका आयुक्त यांचे नियंत्रण आहे. सदरचे तक्रारी अर्जाचे नियम व प्रचलित कायदयातील तरतुदीनुसार योग्य ती चौकशी होवुन त्यात फौजदारी स्वरुपाचा अपहार आढळून आल्यास चौकशी अधिकार्‍याचे फिर्यादीवरुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरीता सदरचे तक्रारी अर्ज महापालिका आयुक्त यांचे कडे वर्ग केला असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पो.नि. नितीन चव्हाण यांनी तक्रारदार गिरीश जाधव यांना पत्राद्वारे कळविले आहे.

 

सार्वजनिक स्वच्छतेच्या संदेशाने नवीन वर्षाचा प्रारंभ

हरदिन मॉर्निंग ग्रुपने राबविले चाँदबीबी महाल परिसरात स्वच्छता अभियान

नगर – आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणार्‍या हरदिन मॉर्निंग ग्रुपने नवीन वर्षाचे प्रारंभ सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देऊन करण्यात आला. शहरा जवळ असलेल्या ऐतिहासिक चाँदबीबी महाल परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. परिसरात लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देऊन वृक्ष संवर्धनाचाही संदेश यावेळी देण्यात आला. तर विविध क्षेत्रात यश प्राप्त करणार्‍या ग्रुपच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. भिंगार शहरातील धम्ममित्र दीपक अमृत यांना कर्नाटक राज्यात आदर्श बौद्ध कार्यातील डॉटरेट पदवी मिळाल्याबद्दल, सोलापूर येथील सोनार समाजाच्या वतीने रत्नकुमार मेहेत्रे यांना उद्योग रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल व मानव अधिकार संरक्षण समितीच्या (नवी दिल्ली) जिल्हा नियोजन कमिटी सदस्यपदी जैद सय्यद यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्वच्छता अभियानात संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, अ‍ॅड. अतुल गुगळे, अशोकराव दळवी, राजू शेख, रमेशराव वराडे, मेजर दिलीप ठोकळ, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, दीपकराव धाडगे, मनोहर दरवडे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, जालिंदर बेल्हेकर, दिलीप गुगळे, सुधीर तावरे, गणेश बुर्‍हा, राहुल भिंगारकर, प्रा. सलाबत खान, अभिजीत सपकाळ, सुधीर कपाळे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, अविनाश जाधव, अशोकराव पराते, विकास भिंगारदिवे, सरदारसिंग परदेशी, अशोकराव लोंढे, मुन्ना वाघस्कर, रामनाथ गर्जे, अरुण तनपुरे, शिरीषराव पोटे, दीपक मेहतानी, प्रकाश देवळालीकर, राजू कांबळे, सूर्यकांत कटोरे, अविनाश पोतदार, बबन चिंचिणे, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, नामदेवराव जावळे, सिताराम परदेशी, शेषराव पालवे, भीमराव फुंदे, सखाराम अळकुटे, योगेश चौधरी, नितीन भिंगारकर, प्रशांत भिंगारदिवे, सुनील कसबे, भरत कनोजिया, सुभाष गोंधळे, दिलीप बोंदर्डे आदी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालवली जात आहे. प्रत्येकाचे जीवन आरोग्यमयी होण्यासाठी योग-प्राणायामाच्या माध्यमातून तर पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपणाद्वारे हरदिन मॉर्निंग ग्रुप योगदान देत आहे. आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची असून, ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर स्वच्छतेचे उपक्रम घेण्यात येतात. नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेची जागृती निर्माण झाल्यास रोगराईला आळा बसणार असल्याचे स्पष्ट केले. तर ग्रुपच्या वतीने लावण्यात आलेल्या झाडांचे संवर्धनाचेही काम सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रुपच्या सदस्यांनी चाँदबीबी महाल परिसरात पसरलेला प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बॉटल व इतर मोठ्या प्रमाणात कचरा जमा करुन परिसराची स्वच्छता करण्यात आली.

 

सक्षम युवा प्रतिष्ठानच्यावतीने प्रोफेसर कॉलनी चौकात मध्यरात्री १२ वाजता नटराज पूजनाने नववर्षाचे स्वागत

नववर्षाचे हे अनोखे स्वागत तरुणांना दिशा दर्शक : डॉ.सौ.सुधा कांकरिया

नगर – भारतीय संस्कृती ही जगात महान संस्कृती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे आपल्या संस्कृतीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. थर्टीफस्टला घांगडधिंगाना घालून समाजात उपद्रव निर्माण करण्यापेक्षा काही विधायक कामे केली तर ती समाजासाठी व येणार्या पिढीसाठी आदर्शवत ठरतील. त्यामुळे युवकांनी अशाच विधायक कामात आपला वेळ घालविला पाहिजे. युवा शक्तीने आपली बुद्धमत्ता, ताकदीचा उपयोग हा देशाच्या विकासासाठी केला पाहिजे. सरत्या वर्षात नगर- मधील कलाकारांनी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमातून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आगामी वर्ष हे बालिका वर्ष म्हणून साजरे करूया तसेच अहिल्यानगर कलाकारांसाठी उज्वल राहील. सक्षम युवा प्रतिष्ठानच्यावतीने नववर्षाचे हे अनोखे स्वागत तरुणांना दिशा दर्शक असे आहे, असे प्रतिपादन डॉ.सुधा कांकरिया यांनी केले. नववर्षाचे स्वागत प्रोफेसर कॉलनी चौक येथे सक्षम युवा प्रतिष्ठानच्यावतीने मध्यरात्री १२ वाजता नटराज पुजन करुन करण्यात आले. याप्रसंगी शिल्पकार प्रमोद कांबळे, डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया, पवन नाईक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विराज मुनोत, तेजस अतितकर, संकेत होशिंग, अनंत जोशी, सदानंद भणगे, भूपेंद्र रासने, पूनम रासने, संदीप दंडवते, प्रशांत जठार, अ‍ॅड. सतीशचंद्र सुद्रिक, सुजाता पायमोडे, सरिता पटवर्धन, संदीप भुसे, सुधीर कुलकर्णी, अभय गोले, विनय मुनोत, गौरी सुद्रिक, बालकलाकार ध्वज मुनोत आदि उपस्थित होते. गौरी सुद्रिक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आधारित पोवाडा सादर केला. यावेळी सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे कलाकारांचा गौरव करण्यात आला. यामध्ये संजोग धोत्रे, अवनती गोले, सिद्धी कुलकर्णी, पवन नाईक, तसेच देखावा व रिकामिक एकांकिकांचे संघ, फुलपाखरू बालनाट्य संघ राजश्री भणगे आदींचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रमोद कांबळे, पवन नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ.सुधा कांकरिया यांनी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. सूत्रसंचालन तेजस अतितकर यांनी केले तर आभार विराज मुनोत यांनी मानले. या कार्यक्रमासाठी ऋषिकेश जोशी, आशुतोष मेनसे, क्षितिजा होशिंग, पुष्कर शुक्रे, मंगेश जोशी, सचिन तुपे, निखिल डफळ, रघुनाथ सातपुते आदींनी सहकार्य केले.

 

३१ डिसेंबरचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्यावतीने मनोरुग्णांना भोजन

३१ डिसेंबर निमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून शहरातील मनोरुग्ण विकलांगांना
सांभाळणारी मानव सेवा संस्थेतील रुग्णांना जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने भोजन देण्यात आले.
यावेळी पप्पू गीते, दत्ता साठे, निलेश म्हसे, अ‍ॅड. चेतन रोहकले, शशिकांत भामरे, आनंद
किलोर, बापूसाहेब राजेभोसले, उदय अनभुले, मिलिंद जपे, अतुल लहारे, राजेंद्र कर्डिले, श्रीपाद
दगडे, संजय चव्हाण, राजेंद्र ससे, रामदास वाघ व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे सर्व सदस्य
उपस्थित होते

 

ख्रिस्तजन्मोत्सव सप्ताह कार्यकमांतर्गत नववर्षाचे स्वागत

नगर – १ जानेवारी २०२५ रोजी नुतन वर्षा- निमीत्त चर्चमध्ये विशेष भक्तीचे नियोजन केले गेले. नुतन वर्ष तसेच प्रभु येशूचे नामकरण दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. चर्चचे धर्मगुरु यांनी उपस्थित भक्तगणांना नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या प्रवचानातून परमेश्वरांने पुन्हा एक नविन वर्ष आपल्याला दाखविले आहे म्हणून त्या सर्वसमर्थ परमेश्वराचे आपण आभार मानिले पाहिजे. या नविन वर्षामध्ये संकल्प करतांना त्या सर्वसमर्थ परमेश्वराला समोर ठेवून बायबलमधील शिकवणीनुसार आपले आचरण शुध्द आणि पवित्र असायला हवे जेणेकरुन या भुतलावर प्रभु येशूचे दुसरे आगमन होईल त्या दिवशी आपण त्याच्यासमोर उभे राहण्यास लायक ठरु अन्यथा नरकाच्या भयंकर यातनांपासून आपली सुटका नाही असे रेव्ह. तुपसुंदरे पाळकसाहेब आपल्या प्रवचानातून म्हटले. चर्चमधील भक्ती झाल्यानंतर सभासदांनी एकमेकांना नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता चर्चचे धर्मगुरु रेव्ह अभिजीत तुपसुदरे, सचिव सतिश मिसाळ, उपसचिव प्रितम जाधव, खजिनदार डॉ. संजय लाड, उपखजिनदार सॅम्युएल बोर्डे, कार्यक्रम समिती अध्यक्ष प्रसन्ना शिंदे, प्रा. विनीत गायकवाड, रविद्र लोंढे सुनित ढगे, अमोल लोंढे, कुमार हर्षल पाटोळे, शोभना गायकवाड, वंदना शिंदे, कांदबरी सुर्यवंशी, शशिकला साळुंके, श्रीमती स्नेहल साळवे हया कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतले तसेच कौतुकास्पद परिश्रम चर्चचा तरुण संघाने घेतले महिला मंडळ, चर्च सभासद यांचे सहकार्य लाभले.

 

पे अ‍ॅण्ड पार्क योजना मनपाने तत्काळ रद्द करावी अन्यथा ‘आंदोलन’ करणार : शिवसेनेचा इशारा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महानगरपालिकेची पे अँड
पार्किंग योजनेसंदर्भात मनपा उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले.

नगर – शहरातील विविध ठिकाणी पे अँड पार्क योजनेची अंबलबजावणीची घोषणा अहिल्यानगर महानगरपालिकेने केली आहे. यामध्ये शहराच्या मुख्य मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरातील प्रमुख रहदारीचे रस्ते, जागा यांचा समावेश आहे. प्रत्येक्षात शहरातील नागरिक हा महागाईने त्रस्त आहे व नगरकरांनी कोट्यावधीचा कर भरुन देखील कोणतीही मुलभूत सुविधा नागरिकांना मनपा व्यवस्थित देत नाही. असे असताना नविन योजनेची अंबलबजावणी करुन नगरकरांना लुटण्याचा घाट मनपा घालत आहे. मनपाने ही योजना त्वरीत मागे घ्यावी व मनपाकडे स्वमालकीचे भूखंड बाजारपेठेलगत असलेल्या जागेत वाहनतळ निमार्ण करुन नगरकरांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्या, अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने मनपा उपायुक्त यांना देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, युवा सेनेचे विक्रम राठोड, दत्ता जाधव, संतोष गेनपा, दत्ता कावरे, रावजी नांगरे, योगिराज गाडे, प्रशांत गायकवाड, रविंद्र वाकळे, सचिन शिंदे, विशाल गायकवाड आदी उपस्थित होते नागरिकांचा महानगरपालिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा व ही योजना त्वरीत रद्द करावी अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल.

 

सुविचार

एका हृदयाने दुसर्‍या हृदयाकडे काय मागाव? आयुष्यभराची साथ आणि आभाळाएवढं प्रेम मागावं.