पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची तक्रारदाराला माहिती
नगर – महापालिका हद्दीत रस्त्यांच्या कामासाठी आलेल्या निधीचा महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी ठेकेदारांशी संगनमत करून निकृष्ट दर्जाचे काम करत आर्थिक गैरव्यवहार केल्या बाबत पोलिसांकडे करण्यात आलेला तक्रार अर्ज पुढील चौकशी व कारवाईसाठी महापालिका आयुक्तांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तक्रारदार यांना गुरुवारी (दि.२) पत्राद्वारे कळविली आहे. याबाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी २७ ऑगस्ट २०२४ रोजी पोलिस अधिक्षक राकेश ओला यांची भेट घेत नगर शहरात डांबरी व सिमेंट क्रॉकीटीकरणाचे रस्ते विकास कामा करीता आलेल्या निधीचा महापालिकेतील बांधकाम विभागांचे अधिकारी व नियुक्त ठेकेदार यांनी संगनमताने निकृष्ट दर्जाचे केलेल्या रस्त्याचे बांधकामातुन झालेल्या आर्थिक गैरव्यवहार बाबतचा तक्रारी अर्ज दिलेला होता. सदर तक्रार अर्जाची प्रत पोलीस अधीक्षक यांचे आदेशान्वये पुढील चौकशीकरीता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. सदर अर्जाचे अवलोकन करता शासना कडून रस्ते विकासा करीता प्राप्त निधीचा गैरवापर करून बांधकाम विभागांचे अधिकारी व नियुक्त ठेकेदार यांनी संगनमताने निकृष्ट दर्जाचे केलेल्या रस्त्याचे बांधकामात झालेल्या मोठया आर्थिक गैरव्यवहार बाबत शासनाची फसवणुक केल्याचे नमुद आहे. सदर निधीवर महापालिका आयुक्त यांचे नियंत्रण आहे. सदरचे तक्रारी अर्जाचे नियम व प्रचलित कायदयातील तरतुदीनुसार योग्य ती चौकशी होवुन त्यात फौजदारी स्वरुपाचा अपहार आढळून आल्यास चौकशी अधिकार्याचे फिर्यादीवरुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरीता सदरचे तक्रारी अर्ज महापालिका आयुक्त यांचे कडे वर्ग केला असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पो.नि. नितीन चव्हाण यांनी तक्रारदार गिरीश जाधव यांना पत्राद्वारे कळविले आहे.