ओपन आशिया पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत देवदत्त गुंडूने पटकावले ‘१ सिल्व्हर, ३ ब्राँझ’ मेडल

गुजरात येथे झालेल्या ओपन आशिया पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेत देवदत्त गुंडूने १ सिल्व्हर, ३ ब्राँझ मेडल पटकावले.

नगर – गुजरात येथे झालेल्या ओपन आशिया पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत अहिल्यानगरचे
देवदत्त प्रविण गुंडू यांनी १०० किलो वजनी गटात एक सिल्व्हर आणि तीन ब्राँझ मेडल
पटकावले. स्पर्धेत चार इव्हेंट होते. यामध्ये पूर्ण पॉवरलिफ्टिंग, पुश-पुल, ओन्ली डेडलिफ्ट, ओन्ली बेंच प्रेस हे इव्हेंट होते.
यात देवदत्त गुंडूने उत्तम कामगिरी करुन हे यश मिळविले. या ओपन आशिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप
२०२५ स्पर्धेत अहिल्यानगरमधून तीन खेळाडूंची निवड झाली होती. या स्पर्धेत आशिया खंडातील
४० हून जास्त देशातील खेळाडू सहभागी झाले होते. यापुढील होणार्‍या इंटरनॅशनल स्पर्धेसाठी
देवदत्त गुंडू हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. देवदत्त गुंडूला स्पर्धेसाठी युनायटेड पॉवर
लिफ्टींग असो. महाराष्ट्राचे अध्यक्ष सचिन टापरे,
उपाध्यक्ष मनोज गायकवाड, अदनान बदाम,
मधुकर गायकवाड, सोहेल शेख, सद्दम सय्यद,
अयनुल सय्यद, राजू थोरात व मुंबई पॉवर लिफ्टिंग
असो.चे अध्यक्ष सौरभ चौधरी व उपाध्यक्ष शितल
चौधरी आदींचे मार्गदर्शन लाभले.

पुण्याच्या धर्तीवर शिक्षण देणार्‍या ‘ईरा किड्स’ने एमआयडीसीनंतर सावेडीत दुसरी शाळा काढावी

इरा किड्स प्ले ग्रुपच्या स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमप्रसंगी संजय गाडेकर आदी.

संजय गाडेकर यांचे प्रतिपादन नगर – आपले शालेय शिक्षण पुण्यासारख्या मोठ्या विद्येचे माहेरघर असलेल्या शहरात झाले ईरा किड्समध्ये देखील अशाच प्रकारे मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम करणारे प्राथमिक शिक्षण दिले जाते त्यामुळे आता एमआयडीसी बोल्हेगाव नंतर ईरा किड्स प्ले ग्रुपने सावेडी मध्ये आपली दुसरी शाळा सुरू करावी, असे गौरवोद्गार अंकिता
फायबर ऑप्टिस आणि रेल वायरचे नगर मधील वितरक उद्योजक संजय गाडेकर यांनी काढले.
बोल्हेगाव येथील इरा किड्स प्ले ग्रुपच्या वार्षिक स्नेहसंमेलन, विविध गुणदर्शन
आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर रामदास साळुंके, शकुंतला साळुंके, संचालक रमेश साळुंके,
मुख्याध्यापिका अर्चना साळुंके, शुद्धायु लाकडी घाणा उद्योग समूहाच्या प्रमुख सौ.
सुवर्णा गाडेकर, प्रसन्न साळुंके, सौ. गौरी साळुंके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची
सुरुवात प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली.
प्रास्ताविक पर भाषणात अर्चना साळुंके म्हणाल्या की, ईरा किड्स प्ले ग्रुपमध्ये
गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. व्यक्तिमत्व  विकास आणि स्वयंशिस्त या विषयात प्रत्येक शिक्षक मुलांकडे जातीने लक्ष
घालतो यामुळे प्ले ग्रुप, एलकेजी आणि युकेजी मध्ये शिक्षण घेऊन पुढे प्राथमिक शाळेत जेव्हा विद्यार्थी प्रवेश घेतो तेव्हा
त्याला त्याच्या गुणवत्तेनुसार कधीकधी थेट दुसरीत प्रवेश दिला जातो. कोरोना नंतर शाळेची ही तिसरी बॅच आहे आणि
तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन आहे पण या कार्यक्रमाला मिळालेला पालक वर्गाचा
प्रतिसाद पाहता ही शाळा आणखी पुढे मुलांना नेईल असा विश्वास आपल्याला वाटतो
असे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मुलांनी
भाषणे कविता नाटिका आणि नृत्य सादर करून पालकांची मने जिंकली. राष्ट्रगीताने
कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन शिक्षिका सुप्रिया बनकर यांनी केले सत्काराची
उत्घोषणा कांचन वाघमारे यांनी केली तर स्कूलच्या वतीने शिक्षकांचे मनोगत वर्षा
राऊत यांनी व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी साळुंखे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुप्रिया मॅडम, वर्षा मॅडम, कांचन मॅडम, वंदना झिरपे,
दिगंबर झिरपे यांनी परिश्रम घेतले

एक चांगला खेळाडू उत्तम आर्किटेट इंजिनीअर्स होऊ शकतो

ज्ञानेश्वर खुरांगे यांचे प्रतिपादन; एसा आणि पोलाद स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने स्पोर्ट्स विक २०२५ चे उद्घाटन

नगर – आपले स्वास्थ्य हीच खरी संपत्ती असून त्यासाठी आपण कुठल्या तरी क्रीडा प्रकारच्या माध्यमातून रोज
ग्राउंडवर व्यायाम करणे गरजेचे आहे, हॉकी प्लेअर मेजर ध्यानचंद हे इंजिनिअर होते. तसेच मिल्खा
सिंग, अनिल कुंबळे, जहीर खान असे आर्किटेट आणि इंजिनीअर्स हे सुध्दा देशाचे नाव उज्वल
करण्यात अग्रेसर आहेत. एक चांगला खेळाडू उत्तम आर्किटेट इंजिनीअर्स होऊ शकतो, नेल्सन मंडेला यांनी एक चांगला
खेळाडू जग बदलू शकतो असे सांगितले होते. यावरून खेळात किती ताकद आहे हे आपल्या लक्षात येईल. एसा दरवर्षी आयोजित करत असलेला स्पोर्ट्स विक फक्त सभासदांना नाही तर अहिल्यानगरकरना खेळांचे महत्व पटवून देतात. असे
प्रतिपादन क्रीडा अधीकारी ज्ञानेश्वर खूरांगे यांनी केले एसा आणि पोलाद स्टील जालना यांच्या संयुक्त
विद्यमाने स्पोर्ट्स विक २०२५ चे उद्घाटन ज्ञानेश्वर खुरांगे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसा अध्यक्ष आदिनाथ
दहिफळे, उपाध्यक्ष विनोद काकडे, सचिव अभिजित
देवी, स्पोर्ट्स कमिटी हेड जितेश सचदेव, पोलाद स्टीलचे
सुशांत गव्हाणे, आदेश गूंगे, अमोल येनगंदुल, यश शहा,
वैभव निमसे, संतोष खांडेकर, अन्वर शेख, अविनाश
कुलकर्णी, सचिन डागा, सुरेश परदेशी, वैशाखी हिरे,
श्वेता मुळे, शुभम खोले यांच्यासह सभासद उपस्थित
होते.
आदिनाथ दहिफळे म्हणाले की आजच्या मोबाईल
युगात मैदानी खेळांकडे मुलांचे दुर्लक्ष होत असून अश्या
उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना आपण पुन्हा ग्राउंड वर
आणण्यास प्रवृत्त करु शकतो असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात फक्त ६ वर्ष वय असलेली आणि
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन विजेती योगा गर्ल राजवी
हर्षद मुळे हिने सादर केलेल्या योगाच्या प्रात्यक्षिकांनी
उपस्थितांची मने जिंकली.
उद्घाटन सामन्यात झालेल्या मिनी मॅरेथॉन
स्पर्धेत धनंजय गुंड- प्रथम, उदित हिरे – द्वितीय तर
प्रदिप तांदळे यांनी तृतीय क्रमांक
पटकावला. चेस स्पर्धेत रोशन
गुगळे – प्रथम, भूषण पांडव –
द्वितीय आणि अतुल गांधी यांनी
तृतीय क्रमांक पटकावला. या
कार्यक्रमाचे आयोजक स्पोर्टस
कमिटी सदस्य अविनाश देवी,
झोहेब खान, गौरव मांडगे, ओंकार
म्हसे, प्रमोद भाळवणकर, प्रथमेश
सोनावणे, संकेत पादिर हे काम
पाहत आहेत. उपाध्यक्ष विनोद
काकडे यांनी या स्पोर्ट्स विक
मध्ये जवळपास १५० सभासद
सहभागी झाल्याचे नमूद करून सर्व
सभासदांना या विविध स्पर्धांसाठी
उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
संस्थेच्या या स्पोर्ट्स विक मध्ये मिनी मॅरेथॉन,
चेस, बॅडमिंटन, कॅरम, फूट बॉल, स्विमिंग, टेबल
टेनिस आणि क्रिकेट अश्या विविध स्पर्धांचे आठवडाभर
आयोजन करण्यात आल्याचे स्पोर्ट्स कमिटी हेड जितेश
सचदेव यांनी नमूद केले.
पोलाद स्टील जालना यांनी या पूर्ण उपक्रमास
प्रायोजकत्व दिले असून कंपनीचे सुशांत गव्हाणे यांनी
या उपक्रमाच्या माध्यमातून सभासदांमधील संबंध आणि
खिलाडूवृत्ती दृढ होत असल्याचे नमूद केले. प्रदिप तांदळे
यांनी सूत्रसंचालन केले तर सचिव अभिजित देवी यांनी
सभासदांचे आभार मानले.

रॉयल कॉलेज ऑफ पॅथॉलॉजिस्टस्ची डॉ. सुप्रिया जैन यांना फेलोशिप प्राप्त

नगर – डॉ. सुप्रिया जैन यांनी त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. १६ डिसेंबर २०२४ रोजी
त्या रॉयल कॉलेज ऑफ पॅथॉलॉजिस्टस् ((FRCPath), लंडन यू.के., च्या फेलो म्हणून उत्तीर्ण झाल्या. औपचारिक
पदवीदान समारंभ २६ फेब्रुवारी रोजी पार पडला. ही फेलोशिप डॉ. जैन यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक प्रवासातील आणखी
एक लक्षणीय यश आहे. अहिल्यानगर येथील सेक्रेड हार्ट कॉन्वेंट हायस्कूल या शाळेच्या त्या
हेड गर्ल होत्या व एचएससी बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करत, जीवशास्त्र या
विषयात १००/१०० गुण मिळवले. डॉ. जैन यांनी नेहमीच उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. पुणे
येथील बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस आणि मुंबईतील नामांकित केईएम हॉस्पिटलमध्ये
एमडीच्या अभ्यासादरम्यान त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या मजबूत शैक्षणिक पायावर आधारित,
डॉ. जैन यांनी मुंबईतील नामांकित रुग्णालयांमध्ये काम करून मौल्यवान वैद्यकीय अनुभव घेतला.
त्यांच्या कौशल्याचा आणखी विस्तार करत, त्यांनी सिंगापूरमधील प्रतिष्ठित नॅशनल युनिव्हर्सिटी
हॉस्पिटल (छणक) मध्ये अनेक वर्षे काम केले. डॉ. जैन या श्यामा आणि
डॉ. प्रवीण मुनोत यांच्या कन्या आहेत, जे एक प्रसिद्ध शल्यविशारद आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक
कामगिरीमध्ये विद्यापीठ सुवर्णपदकाचा समावेश आहे. डॉ. मुनोत यांना नुकतेच राज्य
शल्यचिकित्सक संघटनेचे प्रतिष्ठित डॉ. के. सी. घारपुरे ओरेशनने सन्मानित करण्यात
आले आहे. त्या व्यतिरिक्त संघटनेचे त्यांनी सलग नऊ वर्षे कार्यकारी समिती
सदस्य म्हणून काम केले. राज्य सरकारच्या जिल्हा रुग्णालयात, ग्रामीण शिबिरांमध्ये आणि धर्मादाय
रुग्णालयात मोठ्या संख्येने शस्त्रक्रिया करून त्यांनी केलेल्या धर्मादाय शस्त्रक्रियेतील त्यांच्या
असाधारण समर्पणाची दखल या व्याख्यानात घेण्यात आली. डॉ. जैन या स्वर्गीय मदनलाल मुनोत
यांच्या नात आहेत. डॉ. जैन यांचे पती मयंक जैन हे एक आयआयटी पदवीधर असून अमेरिकेतील
स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीचे पदव्युत्तर पदवीधर आहेत तथा डॉ. जैन यांच्या संपूर्ण प्रवासात एक मजबूत
आधारस्तंभ राहिले आहेत. डॉ. सुप्रिया मयंक जैन यांचे त्यांच्या व्यवसायाप्रती समर्पण आणि त्यांची उल्लेखनीय
शैक्षणिक कामगिरी हे उत्कृष्टता आणि सेवेप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माहिती अधिकार कायद्याची अवहेलना थांबवावी

अहिल्यानगर जिल्हयामधे माहिती अधिकार कायद्याची अवहेलना थांबविण्यासाठी उपजिल्हाधिकारी शाहूराव मोरे यांना निवेदन देताना भारतीय जनसंसदचे राज्य अध्यक्ष अशोक सब्बन, नगर तालुकाध्यक्ष पोपटराव साठे, शहर उपाध्यक्ष राम धोत्रे व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे.

नगर – अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माहिती अधिकार कायद्याची अवहेलना थांबवावी अशी मागणी भारतीय जनसंसदचे  जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे. शासकिय कार्यालयांमधुन जनतेला काम काजाची माहिती मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर समोर १० जुलै १९९७ ते १२ जुलै १९९७ पर्यंत बेमुदत उपोषण केले होते.
माहितीच्या अधिकाराचा कायदा होण्यासाठीचे हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले आंदोलन होते असे सुधीर भद्रे यांनी सांगितले.
उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी ११.०७.१९९७ रोजी समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी संपूर्ण देशात माहिती अधिकार कायदा लागू करण्यासाठी मी प्रयत्न करीन असे अण्णांनी उपोषण स्थळी सांगितले होते. उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी म्हणजे १२.०७.१९९७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १९२३ च्या केंद्रीय गुप्तता
कायद्याची होळी करून देशातील अवास्तव गोपनियतेचा निषेध करण्यात आला होता. माहिती अधिकार कायदा होण्यासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरुवात केल्यामुळे या कायद्याविषयी आम्हाला विशेष आपुलकी आहे. या कायद्यामुळे महाराष्ट्रासह
देशातील अनेक आर्थिक, सामाजिक, नैतिक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली. मोठ्या प्रमाणावर
भ्रष्टाचारातला पैसा शासनाच्या तिजोरीत जमा झाला. अनेक गुन्हेगारांना शिक्षा झाली. या कायद्यामुळे सामान्य
जनतेला शासकीय कारभारात सहभागी होण्याची संधी मिळाली. माहिती अधिकार कायद्यामुळे जनसामान्यांना,
सामाजिक कार्यकर्त्यांना तसेच शासकिय कर्मचारी – अधिकारी यांना मोठा आधार मिळालेला आहे. सर्वांनीच
या कायद्याचा समाजहितासाठी आणि स्वहितासाठी यशस्वी वापर केलेला आहे. देशामधे लागू असलेले सर्व
कायदे शासकिय यंत्रणा राबविते आणि जनतेवर अंकुश ठेवते. मात्र माहिती अधिकार कायदा हा असा एकमेव
कायदा आहे की जो जनता राबविते आणि शासनावर अंकुश ठेवते असेही सुधीर भद्रे यांनी स्पष्ट केले.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण केल्यानंतर असे निदर्शनास आले आहे की अनेक शासकीय कार्यालयांमधून सामान्य जनतेने माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केल्यानंतर अर्जाला उत्तर दिले जात नाही व माहितीही दिली जात नाही. यामुळे
जनतेला प्रथम अपील करावे लागते. प्रथम अपिलिय अधिकारी हे त्याच खात्यातील व त्याच कर्मचार्‍यांचे
वरिष्ठ असल्यामुळे ते त्यांच्या कनिष्ठांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी प्रथम अपिलाची सुनावणीच
घेत नाही. यामुळे जनतेला द्वितीय अपील करावे लागते. द्वितीय अपिलाची सुनावणी अनेक वर्षानंतर
घेतली जाते. त्यामुळे संबंधित प्रकरणाचे गांभीर्य कमी होते. उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच ठरतो.
यासाठी शासनाने माहिती अधिकार कायद्यामध्ये अर्ज केलेल्या सामान्य जनतेला माहिती मिळाली कि नाही
तसेच माहिती मिळाली नसल्यास प्रथम अपील केलेल्या लोकांना माहिती मिळाली कि नाही याचा तपास करावा.
यासाठी गत दोन वर्षातील म्हणजे १ जानेवारी २०२३ ते २५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीतील माहिती अधिकार
कायद्याअंतर्गत आलेल्या अर्जांची तपासणी करावी व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माहिती अधिकार कायद्याची
अवहेलना थांबवावी अशी मागणी राज्य अध्यक्ष अशोक सब्बन, पोपटराव साठे, राम धोत्रे व जिल्हाध्यक्ष सुधीर
भद्रे यांनी केली आहे.

छत्रपती अभियांत्रिकी मधील शिबिरात २३ विद्यार्थ्यांनी केले रक्तदान

नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये
आयोजित शिबिरात रक्तदान करताना विद्यार्थी.

नगर – स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी निमित्त २५ फेब्रुवारी रोजी नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित रक्तदान शिबिरामध्ये २३ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले असून विद्यार्थ्यांमध्ये समाजकार्याची भावना जागृत करण्यासाठी असे उपक्रम  महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी केले. रक्तदान या विषयावर विद्यार्थ्यांशी बोलत असताना आपल्या
भाषणामध्ये हे देखील नमूद केले की, दिवसेंदिवस रक्ताची गरज वाढत असून, मोठ्या प्रमाणात रक्त
संकलित होणे ही काळाची गरज बनली आहे. रक्तदान चळवळ अधिक सक्षमपणे समाजामध्ये
रुजविण्यासाठी विद्यार्थ्यांकडून चाललेले कार्य प्रेरणादाणी आहे. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना
आणि अष्टविनायक रक्त संकलन केंद्र अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला अष्टविनायक रक्तपेढीचे डॉ. संदीप पाटोळे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी हा
उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले त्यांना राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. अक्षय देखणे
यांचे मार्गदर्शन लाभले. रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांना अष्टविनायक रक्तपेढी द्वारे प्रमाणपत्र
देण्यात आले.

माळीवाडा परिसरातील शाळेची धोकादायक भिंत मनपाने हटवली, धोकादायक व जुन्या इमारत मालकांनी स्ट्रचरल ऑडिट करावे

पावसाळ्यापूर्वी सर्व धोकादायक इमारतींवर कारवाई करणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचा इशारा

नगर – महानगरपालिका प्रशासनाने धोकादायक व मोडकळीस आलेल्या जुन्या इमारती, वस्तूंची पाहणी सुरू केली आहे.
ज्यांच्या इमारती, बांधकामे जुनी आहेत, ३० वर्षांपेक्षा अधिक जुने बांधकाम असेल, अशांनी त्यांच्या इमारतींचे स्ट्रचरल ऑडिट करून घ्यावे. महानगरपालिका लवकरच धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू करणार असल्याचे आयुक्त तथा
प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले. माळीवाडा परिसरातील एका शाळेची धोकादायक भिंत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने बुधवारी उतरवून घेतली. याची माहिती देताना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी शहरातील
धोकादायक इमारतींची तपासणी सुरू केल्याचे सांगितले. महानगरपालिका शहरातील मोडकळीस आलेल्या
व अर्धवट पडलेल्या इमारतींचा सर्वे करून धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींना नोटिसा
बजावते. मात्र, अनेक ठिकाणी घरमालक व भाडेकरू वादात या इमारती रिकाम्या केल्या जात
नाहीत. शासनाच्या निर्देशानुसार ३० वर्षांपेक्षा जुने बांधकाम असणार्‍या इमारतींचे स्ट्रचरल ऑडिट करणे
आवश्यक आहे. पावसाळ्यात एखादी दुर्घटना टाळण्यासाठी जुन्या इमारत
मालकांनी आपल्या इमारतींचे स्ट्रचरल ऑडिट करून घ्यावे. महापालिकेने तपासणी सुरू केली
आहे. माळीवाडा परिसरातील एका शाळेची भिंत धोकादायक अवस्थेत होती. ती पडून रस्त्यावरून येणार्‍या
जाणार्‍या नागरिकांना किंवा शाळेतील मुलांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शयता असल्याने आपत्ती
व्यवस्थापन विभागामार्फत ही भिंत हटवण्यात आली आहे. शहरातील इतर धोकादायक इमारतींवर कारवाई
करण्यात येणार आहे, असेही यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

शिक्षक, शिक्षकेतरांना मार्च २०२४ आखेर पर्यंतच्या पी.एफ.च्या पावत्यासह पुरवणी व वैद्यकीय देयके मिळावी

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे प्रस्ताव मंजूर करा : बाबासाहेब बोडखे

नगर – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांना सन २०२१-२२ पासून ते
मार्च २०२४ च्या पी.एफ. च्या पावत्या मिळाव्या, सर्व प्रकारची पुरवणी व वैद्यकीय देयके द्यावी
आणि प्रलंबित असणारे वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे प्रस्ताव मंजूर करण्याच्या मागणीचे निवेदन
माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना देण्यात आले.
शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या
शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन सदर प्रश्न
उपस्थित केला. यावेळी वैभव शिंदे, सुदेश छजलाने,
सुन्ने सर, नूतन गाडे आदींसह शिक्षक वर्ग उपस्थित
होते.
जिल्ह्यातील सर्व विद्यालयांना सन २०२१-२२
सालापर्यंत भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या मिळालेल्या
आहेत. तसेच सन २०२१-२२ प्रमाणे सर्व विद्यालयातील
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे
खाते विशेष कॅम्पद्वारे ऑनलाईन अपडेट करण्यात
आलेले आहेत. परंतु त्यापुढील वर्षाच्या भविष्य निर्वाह
निधीचे कोणालाही ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्लिफा
मिळालेल्या नाहीत. त्यामुळे
कर्मचार्‍यांना पीएफ खात्यातून
कर्ज काढायचे असल्यास सन
२०२१-२२ सालापर्यंतचे शिल्लक
रकमेवर कर्ज मंजूर केले जाते.
पुढील दोन वर्षांचा हिशोब धरला
जात नसल्याचे अनेक कर्मचारी
तक्रार करत असल्याचे स्पष्ट
करण्यात आले आहे.
मार्च २०२४ अखेरच्या
स्लिपा ऑनलाईन किंवा
ऑफलाईन पद्धतीने विशेष कॅम्प
आयोजित करून तात्काळ सर्व
कर्मचार्‍यांना मिळाव्या, जिल्ह्यातील
शिक्षक, शिक्षेतर कर्मचार्‍यांचे सर्व
प्रकारचे पुरवणी देयके, वैद्यकीय
देयके व मुख्याध्यापक शिक्षकेतर (सेवानिवृत्त) यांचे
रजा रोखीकरणाचे देयके लवकरात लवकर द्यावे आणि
प्रलंबित असणारे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणीचे
प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक
परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

केडगावातील महिलेच्या खून प्रकरणातील आरोपी २४ तासात जेरबंद

केडगावातील महिलेच्या खून प्रकरणातील आरोपी सारस दत्तू सुरवसे याला पकडल्यानंतर त्याच्या समवेत कोतवाली पोलिसांचे पथक.

नगर – केडगाव येथे महिलेचा गळा आवळून
खून करणार्‍या आरोपीला कोतवाली पोलिसांनी
२४ तासाच्या आत कर्जत येथील माळी गल्ली येथे
पकडले आहे. सारस दत्तू सुरवसे (वय ३५) असे
या आरोपीचे नाव असून त्याला २६ फेब्रुवारी रोजी
पकडण्यात आले आहे.
केडगाव येथील संगीता जाधव या महिलेचा
खून झाल्याचा गुन्हा दाखल होताच कोतवाली
पोलिसांनी आरोपीच्या मूळ गावी, जवळचे
नातेवाईक, केडगाव परिसर या ठिकाणी शोध
घेऊन त्याच्या नातेवाईकांचे फोन नंबर प्राप्त
करून घेतले. व त्याचप्रमाणे आरोपीच्या घरावर
साध्या वेशातील पोलिसांनी नजर ठेवली. आरोपी
सुरवसे यांनी माळीवाडा परिसरातील रोडवर
कापड विक्री करणार्‍या इसमाच्या फोनवरून घरी
फोन केला असल्याचे समजल्याने पोलिसांनी
कापड विक्रेत्याकडून माहिती घेऊन आरोपीचे
कपड्यांविषयी पथकास माहिती दिली. त्याप्रमाणे
आरोपी हा त्याच्या राहते घरी आल्याची माहिती
मिळताच कर्जत पोलीस यांच्या मदतीने सापळा
रचून आरोपीस सुरवसे यास ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे
यांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार सहाय्यक पोलीस
निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलीस अंमलदार
राजेंद्र औटी, योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी,
संदीप पितळे, सलीम शेख, दीपक रोहोकले,
तानाजी पवार, अभय कदम, अतुल काजळे,
अतुल कदम, सचिन लोळगे, अमोल गाडे, संकेत
धीवर, राम हंडाळ, मोबाईल सेलचे पोलीस
अंमलदार राहुल गुंडू तसेच कर्जत पोलीस ठाण्याचे
पोलीस कॉन्स्टेबल दंदाडे, किरण बोराडे, प्रताप
देवकाते यांनी केली.

जिल्ह्यात वाढत असलेली जातीय विषमता शासनाने लक्ष घालून त्वरित दूर करावी

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

नगर – जिल्ह्यात सध्या विविध संघटनांकडून जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
त्यातून जातीय विषमता वाढत असून सामाजिक शांतता भंग होत आहे. त्यामुळे या प्रकारात शासनाने
तातडीने लक्ष घालून हे प्रकार थांबवावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या
अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात
आली आहे. नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
यांना जिल्ह्यात जातीय तणाव वाढत असलेल्या विविध घटनांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच यावेळी
दिलेल्या निवेदनात जे समाज विघातक लोक समाजात विष पेरण्याचे काम करीत आहे अश्या लोकांना वेळीच
आळा घाला अन्यथा समाज व्यवस्थेवर यांचे दुषपरिणाम निर्माण होतील अशी मागणी करण्यात आली
तसेच मागील चार दिवसांपूर्वी पाथर्डी तालुयातील मढी येथील ग्रामसभेत सरपंच व ग्रामसेवक यांनी
असंविधानिक ठराव मंजूर केले त्यामुळे अश्या चुकीच्या पद्धतीने वागणार्‍या पदाधिकारी व शासकीय कर्मचार्‍यांवर
कठोर कारवाई करावी. असे अनेक मुद्दे अल्पसंख्यांक समाजाशी निगडित आहेत, त्या
सर्व विषयात शासनाने लक्ष घालून वेळीच योग्य निर्णय घ्यावे अन्यथा अश्या चुकीच्या पद्धतीने
वागणार्‍या लोकांमुळे जिल्ह्याचे नाव खराब होईल. कारण नगर जिल्हा हा एक सुसंस्कृत जिल्हा
आहे. अश्या जिल्ह्यात चुकीच्या वागणार्‍या अधिकारी, पदाधिकारी यांना वेळीच आवर घालण्याची
गरज असल्याचे अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष अथर खान यांनी निवेदनात म्हंटले आहे.
या निवेदनावर समीर पठाण, शहर जिल्हा अध्यक्ष अलतमश जरीवाला, प्रदेश
सचिव फारूक रंगरेज, महिला आघाडी उपजिल्हाध्यक्ष फरीन शेख, रुखय्या शेख,
रफिक बाबुलाल शेख, तालुका अध्यक्ष अल्ताफ शेख, कार्याध्यक्ष मोहसीन पठाण, पारनेर विधान सभा अध्यक्ष
तौफिक पटेल, सचिन नवगिरे, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष असीर शेख आदींच्या सह्या आहेत.