0
21

नगर – शेअर बाजारात गुंतवणूक करून त्या बदल्यात चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची तब्बल ४६ लाख रुपयांची व एका नोकरदराची ३० लाख रुपयांची अशी एकूण ७६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजेंद्र जगन्नाथ ससाणे (वय ५३, रा. सारसनगर) व श्रीकांत ज्ञानदेव तवले (वय ३१, रा. जेउर, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणूक व ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निकेश सुरेश शिंदे (रा. पिंपळगाव माळवी, ता. नगर) याच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. निकेश शिंदे याने ससाणे यांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्याच्यावर विश्वास ठेऊन २० डिसेंबर २०२० ते १३ नोव्हेंबर २०२१ या काळात ससाणे यांनी शिंदे याला वेळोवेळी ४६ लाख रुपये त्याच्या खात्यावर जमा केले. तसेच तवले यांनीही शिंदे यास वेळोवेळी ३० लाख रुपये दिले. मात्र, शिंदे याने ससाणे व तवले यांना मुद्दल अथवा परताव्याची रक्कम परत न देता दोघांची ७६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भिंगार पोलिसांनी फसवणूक व एमपीआयडीनुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अतुल बोरसे व साळुंके करत आहेत.