‘तू नोकरी कशी करतो, तुझ्यावर दावाच ठोकतो’ असे म्हणत पोलिसाला शिवीगाळ करत धमकी

0
25

नगर – या पूर्वी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या रागातून पोलिस कर्मचार्‍याला फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत तु नोकरी कशी करतो असे म्हणत तुझ्यावर दावाच ठोकतो अशी धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.३) नगरमधील तोफखाना पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचार्‍याच्या बाबतीत घडला आहे. याबाबत पोलिस कर्मचारी सुधीर दत्तात्रय खाडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी तुषार रामभाऊ येवले (रा. किर्तीनगर, नवी सांगवी, पिंपरी चिंचवड, मूळ रा. रेनवडी, ता. पारनेर) याच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी सुधीर खाडे हे या पूर्वी पारनेर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असताना वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी तुषार येवले याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. त्याचा राग येवले याच्या मनात होता. त्यामुळे तो वारंवार त्यांना फोन करून शिवीगाळ करायचा. येवले याने शुक्रवारी (दि.३) सकाळी ९.३० च्या सुमारास खाडे हे तोफखाना पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असताना त्यांच्या मोबाईल वर फोन करत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच तु नोकरी कशी करतो तेच बघतो, तुझ्या विरोधात सेशन कोर्टात प्रकरण दाखल करतो अशी धमकी दिली असल्याचे खाडे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून येवले याच्या विरोधात भा.दं.वि.कलम २९४, १८९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.