जय श्रीराम….जय श्री हनुमानाच्या जयजयकारात हनुमान जन्मोत्सव साजरा

0
168

नगर – नगर शहरात हनुमान जयंती आज माेठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरी झाली. शहरात सर्व भागांमध्ये माेठ्या संख्येने रामभक्त हनुमानाची मंदिरे आहेत. अयाेध्येत श्रीराम मंदिर झाल्याने नुकतीच श्रीराम नवमी माेठ्या उत्साहात साजरी झाल्यानंतर आज रामभक्त हनुमानाचाही जन्माेत्सव शहरात माेठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा झाला. शहरातील हजाराे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सर्जेपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आज सूर्यदय वेळी हनुमान जयंती भक्तिभावाने साजरी झाली. यानिमित्त पहाटे हनुमानाच्या मूर्तीला महाभिषेक व विधिवत पुजा करून हनुमान चालीसा पाठ, श्रीराम नामाचा जप व आरती करून हनुमंताच जन्माेत्सव साजरा करण्यात आला. बराेबर सुर्यदयाच्या वेळी उपस्थित शेकडाे भाविकांनी जय श्रीराम… जय श्री हनुमान… असा जयजयकार करत पाळणा हलवून हनुमानाचा जन्माेत्सव साजरा केला. श्री हनुमान जयंतीनिमित्त येथील मंदिरामध्ये पहाटे पासूनच भाविकांची दर्शनासाठी लगबग सुरू हाेती. यानिमित्त मंदिरात अंतर्गत सजावट व मंदिरावर आकर्षक विद्युत राेषणाई करण्यात आली हाेती. स्पीकरवर हनुमान चालीसा पाठ व भक्तिगीते लावण्यात आली. हनुमान जयंती निमित्त सर्जापुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे पुजारी कन्हैय्यालाल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जन्माेत्सव साेहळा साजरा करण्यात आला, अशी माहिती प्रवीण परदेशी यांनी दिली.