नगर – नगर अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी संचालक-अधिकार्यांवर कठोर कारवाई करून त्यांच्या मालमत्ता जप्त कराव्यात तसेच ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी पोलिस प्रशासनावर दबाव वाढविण्याच्या दृष्टीने बँकेच्या ठेवीदारांनी ३ मे रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण पुकारले होते. तथापी या आंदोलनासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उभारण्यात आलेला मंडप भिंगार कॅम्प पोलिसांनी शुक्रवारी (दि. ३) सकाळी जप्त करत ठेवीदारांना उपोषणास बसण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हाताश झालेल्या ठेवीदारांना निवेदन देण्यासाठी तीन तासाहून अधिक काळ भर उन्हात पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर ताटकळत उभे रहावे लागले. नगर अर्बन बँकेतील आर्थिक घोटाळ्यातील दोषी संचालक, अधिकारी, थकबाकीदार कर्जदारांवर कारवाई करावी, आणि ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी यासाठी बँक बचाव संघर्ष समितीने पोलिस अधीक्षकांना यापुर्वीच निवेदन देत ३ मे रोजी सनदशीर मार्गाने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे सुचित केले होते. त्यानुसार अनेक ठेवीदार शुक्रवारी (दि. ३) सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर जमा झाले. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरूनही अनेक ठेवीदार या ठिकाणी आले. परंतु आंदोलनासाठी उभारण्यात आलेला मंडप भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने सकाळीच जप्त केला. सध्या निवडणूक आचारसंहिता लागू आहे. तुम्ही आंदोलनासाठी रितसर परवानगी घेतलेली नाही ५ पेक्षा जास्त व्यक्तिंना एकत्र येण्यास मनाई आहे. अशी कारणे देत ठेवीदारांना उपोषणास बसण्यास पोलिसांनी मज्जाव केला.
आंदोलन स्थळावरील मंडप केला जप्त, भर उन्हात बसून ठेवीदारांकडून धिक्काराच्या घोषणा
आता आंदोलनास परवानगी नाकारली असली तरी आमचे निवेदन स्विकारा अशी मागणी करत ठेवीदार तीन तासाहून अधिक काळ पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर ताटकळत राहिले. ७ मे रोजी बँकेच्या खटल्यासंदर्भात न्यायालयात सुनावणी आहे. त्यावेळी सर्व ठेवीदार न्यायालयात हजर राहून न्याय मागणार असल्याचे बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांनी सांगितले. दोषी संचालक, अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्या मालमत्ता जप्त कराव्यात, फरार आरोपींना तात्काळ अटक करावी, बँकेसंदर्भात दाखल सर्व गुन्ह्यांमध्ये एमपीआयडी कलम ३, ४ व ५ तसेच कटकारस्थानचे कलम वाढविण्यात यावे, फॉरेंन्सिक ऑडिटरची चौकशी करून जाणीवपूर्वक वगळलेल्या आरोपींची नावे वाढविण्यात यावीत, आरोपींच्या मालमत्ता विक्रीची प्रक्रिया जलदगतीने राबवावी, ठेवीदारांच्या ठेवी परत कराव्यात, फरार आरोपींची नावे जाहीर करावीत यासह विविध मागण्यात करण्यात आल्या आहेत. या आंदोलनावेळी पोलिसांच्या कारवाई विरोधात ठेवीदारांनी घोषणाबाजी करत धिक्कार केला. या आंदोलनात समितीचे डी. एम. कुलकर्णी, राजेंद्र चोपडा, राजेंद्र गांधी, राजेंद्र सबलोक, आसाराम भागवत, दिलीप सोनार, सौ. वैशाली सोनार, विलास कूलकर्णी, अवधूत कुकडवाल, नंदकूमार भालेराव, सौ. सारिका पेठकर, अनिता भालेराव, भानुदास दाणे, बाबासाहेब दळवी, उषा दळवी, सुमन जाधव, अभिजित दळवी, पद्मा जोशी, सविता भंडारी, विठ्ठल पोटे, नारायण क्षिरसागर, शकूंतला लोहकरे, अशोक सुर्यवंशी, ताराबाई काकड, कृष्णनाथ वैकर, मोहिनीराज महाजन, मीरा देहडराय, एस आर बनकर यांच्यासह अनेक ठेवीदार सहभागी झाले होते.
पोलिसांनी परवानगी नाकारणे खेदजनकच : राजेंद्र चोपडा
नगर अर्बन बँकेचा घोटाळा देशभर गाजत आहे. गोरगरीबांच्या ठेवी बँकेत अडकल्या आहेत. आजारपण, दैनंदिन गरजा भागविण्यासाठी ठेवीदारांकडे पैसे नाहीत. न्याय मागण्यासाठी उपोषन केले जाणार होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली. आतापर्यंत अनेक राजकीय पक्ष, नेत्यांची आंदोलने झाली. पण अशा प्रकारची कारवाई झाली नाही. आता मात्र मंडप जप्त करण्यात आला ही खेदजनक बाब आहे. पोलिसांनी आरोपी संचालक व थकबाकीदार कर्जदार यांना पकडावे. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी करतानाच बँकेच्या या घोटाळ्याकडे कोणत्याही पुढार्याचे लक्ष नाही याचा खेद वाटतो, असे बँकेच सभासद राजेंद्र चोपडा यांनी म्हटले आहे.