सावेडी उपनगरात महिलेच्या गळ्यातील दागिने पळविले

0
73

नगर – नगर शहर परिसरात गेल्या महिनाभरापासून चेन स्नॅचिंग करणार्‍या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मार्केट यार्ड, तारकपूर, केडगाव बायपास, सिव्हिल हडको, भिस्तभाग रोडवरील वृंदावन कॉलनी परिसरात घडलेल्या घटना ताज्या असताना गुरुवारी (दि.२) सायंकाळी सावेडी उपनगरातील नवलेनगर येथे रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसका मारून तोडून नेले आहेत. याबाबत कांता सुभाष पुरी (रा. नवले नगर, सावेडी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पुरी या गुरुवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास नवले नगर परिसरात रस्त्याने पायी घराकडे जात होत्या. त्या सदाफुले यांच्या घरासमोर आल्या असता त्यांच्या पाठीमागून विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर दोन जण आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या इसमाने पुरी यांना धक्का मारून खाली पाडले, त्यानंतर त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसका मारून तोडून तातडीने मोटारसायकल वर बसून भरधाव वेगात तेथून दोघेही पसार झाले. चोरट्याने दिलेल्या धक्क्याने रस्त्यावर पडलेल्या फिर्यादी यांना सावरे पर्यंत चोरटे तेथून गायब झाले होते. नंतर फिर्यादी पुरी यांनी आरडा ओरडा केला मात्र नागरिक जमा होवूनही उपयोग झाला नाही. याबाबत पुरी यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भा.दं. वि.कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना चोरटे का सापडेनात

दरम्यान नगर शहर परिसरात गेल्या महिनाभरापासून चेन स्नॅचिंगच्या घटना वारंवार घडत आहेत. रस्त्याने चाललेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने हे चोरटे हिसका मारून तोडून नेत आहेत. विशेषतः तोफखाना पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या उपनगरी भागात हे प्रमाण जास्त आहे. या भागात गेल्या काही दिवसात अनेक चेन स्नॅचिंगचे प्रकार तर सकाळी ८ ते ८.३० च्या दरम्यान घडले आहे. मध्यंतरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक चोरटा पकडला होता, मात्र तरीही या घटना थांबलेल्या नाहीत त्यामुळे अशा प्रकारे चोर्‍या करणारे अनेक चोरटे सक्रीय असल्याचे स्पष्ट होत आहे. तोफखाना तसेच कोतवाली पोलिसांना मात्र हे चोरटे सापडत नाहीत. सध्या निवडणुकीमुळे सर्वत्र नाकाबंदी केली जात असताना हे चोरटे विना क्रमांकाच्या मोटारसायकल वर बिनधास्त फिरतातच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.