अडाणी माणूस
एक गरीब आणि अडाणी माणूस शहराबाहेर असलेल्या झोपडीत भाडे भरून राहत होता. झोपडीसमोर रिकाम्या जागी त्याने काही भाजीपाला लावल्या होता. शेजारीच एका बिळात एक ससा राहत होता. तो दररोज त्या भाजीच्या वाफ्यात येऊन त्यातील भाज्या फस्त करीत असे. त्याच्या त्रासाला वैतागून तो माणूस शहरात असलेल्या मालकाकडे जाऊन म्हणाला, “मालक, मी झोपडीसमोरच्या जागेत काही भाजीपाला, फळझाडे लावली आहेत. शेजारचा ससा सारखा तेथे येऊन भाजीपाला, फळझाडे खाऊन जातो. त्यावर दगड फेकले, धावून गेले, त्याला भीती दाखवली तरी तो कशालाच जुमानीत नाही. तेव्हा आपण त्याचा बंदोबस्त केला तर बरे होईल. तेव्हा आपण उद्या तेथे येऊन त्या सशाचा बंदोबस्त करू, असे त्या माणसाला सांगून परत पाठविले. दुसर्या दिवशी मालक घोड्यावर बसून बरोबर काही मित्र, कुत्रे असा लवाजमा घेऊन तेथे आला. मग मालक व बरोबर आलेले त्याचे घोडेस्वार मित्र त्या माणसाला म्हणाले, सशाच्या बिळाजवळ जाऊन जोरजोराने शिंग वाजव म्हणजे ससा बाहेर पडताच आम्ही त्याचा समाचार घेऊ. यावर तो माणूस जोरजोराने शिंग वाजवू लागला. कुत्री भुंकू लागली. आवाजाने बिळातील ससा घाबरला आणि बाहेर पडून भाजी व फळझाडांच्या वाफ्यातून सैरावैरा धावू लागला. ससा पाहताच कुत्रीही त्याच्या पाठी लागली. मालक आणि त्याचे घोडेस्वार मित्रही सशापाठी धावू लागले. ससा सर्व भाजीपाल्यात पळत आसरा शोधू लागला. थोड्याच वेळात ससा तेथून निसटून जाण्यात यशस्वी झाला. बराच वेळ झाला. काही हालाचाल दिसली नाही. तेव्हा सर्वांना कळून चुकले ससा दुसरीकडे पळून गेला आहे. मग त्या माणसाचे लक्ष भाजी आणि फळझाडांच्या पिकाकडे गेले असता त्याचा झालेला विध्वंस पाहून त्याने कपाळाला हात लावला. घोडेस्वार आणि कुत्र्यांनी सर्व पिकात नाचून सर्व मळा उजाड करून टाकला होता.
तात्पर्य- कधी कधी रोग परवडला पण औषध नको असे म्हणण्याची पाळी येते.