मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
15

लहान मुलांना गुदद्वाराच्या जागी खाज का येते?

खूप वेळा लहान मुले संडासच्या जागी (गुदद्वाराजवळ) खाजवताना दिसतात. विशेषतः संध्याकाळ व रात्रीच्या वेळी ही बाब प्रकर्षाने जाणवते. खाज येण्याच्या अनेक कारणांत खरूज, त्वचादाह, अ‍ॅलर्जी इत्यादींचा समावेश होत असला; तरी अशी खाज फक्त गुदद्वाराजवळ न येता शरीरात अनेक ठिकाणी येते. तंतूकृमी किंवा एन्टेरोबियस व्हर्मीयूलॅरिस नावाच्या जंताची लागण झाली की, या जागेवर खाज येणे हे लक्षण दिसून येते. सोबतच चिडचिड करणे, झोप न येणे, अंथरुणात नकळत लघवी होणे ही लक्षणेही दिसून येतात. वारंवार खाजवल्यामुळे रक्त येते, जंतुसंसर्ग होऊन कधी कधी पू सुद्धा येतो. भारतात अनेक जणांना हा रोग असतो. या जंताची मादी एक सेंमी लांब असते. नर मात्र ०.३ सेंमी इतका लांब असतो. हे जंत पचनसंस्थेतील लहान आतडे, आंत्रपुच्छ, मोठे आतडे यांच्या आवरणाला चिकटून असे राहतात. फलन झाल्यावर रात्रीच्या वेळेस मादी गुदद्वाराबाहेर येऊन सुमारे १०,००० अंडी घालते व मरण पावते. स्त्रियांमध्ये क्वचित ही जंताची मादी गुदद्वारातून बाहेर येऊन योनीमार्गात जाते व गर्भाशयातून पोटाच्या आतील आवरणात जाऊ शकते. मादीच्या गुदद्वाराबाहेर येण्यामुळे, अंडी घालण्यामुळे गुदद्वारापाशी खाज येते. ही अंडी अस्वच्छपणामुळे व खाजवल्यामुळे नखाच्या घाणीतून परत तोंडात जातात. लहान आतड्यात गेल्यानंतर त्यातून अळी बाहेर येते. महिन्याभरात त्याचे प्रौढ जंत तयार होऊन पुन्हा हे चक्र सुरू राहते. या जंतांसाठी पिरँटील पामोएट वा मेबेंडॅझोल हे औषध प्रभावी ठरते. वैयक्तिक स्वच्छता नीट राखल्यास या जंताची लागण होणार नाही. नखे कापणे, शौचाला जाऊन आल्यानंतर तसेच जेवणापूर्वी हात साबण लावून पाण्याने स्वच्छ धुणे, एकमेकांचे कपडे न घालणे; या सोप्या गोष्टींमुळे या जंतांची लागण आपल्याला टाळता येते.