श्रीरामकथेने मनावर होणारा शृंगार राममय होण्याचा परमानंद मिळवून देता : श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी

0
11

इस्कॉन मंदिरातील श्रीराम कथा महोत्सव : पुष्प तिसरे

नगर – रामायणातील श्रीरामकथा मनावर शृंगार करतात. मनाने शृंगार केला की राममय होण्याचा परमानंद प्राप्त होतो. राममय झाल्यास जीवनातील सर्व दुःख, संकटे, समस्या आपल्यापासून दूर पळतात, असे श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले. येथील पाईपलाइन रोडवरील कादंबरीनगरीत इस्कॉन मंदिरात सुरू असलेल्या श्रीराम कथा महोत्सवाचे तृतीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्यासपीठासमोर इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक श्रीगिरीवरधारी प्रभूजी यांच्यासह उपनगरांमधील स्त्री-पुरूष भक्तगण मोठ्या संख्येने विराजमान झालेले होते. श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी पुढे म्हणाले, शरिराच्या बाह्यांगावर शृंगार करण्यासाठी महागडी वस्त्र, आभूषणांची हौसेने खरेदी केली जाते. मात्र अंतर्मनावर शृंगार करण्याचा विचारही केला जात नाही. परिणामी शृंगार केलेल्या शरिरातील मन दोलायमान, स्वार्थी, कपटी असते, असे दिसते. श्रीराम आणि श्रीकृष्ण ही अक्षरे जीभेवर येताच आनंद मिळतो. आपल्याला मिळणारा आनंद इतरांना दिल्याने वाढतच जातो. अयोध्यानगरीत श्रीरामलल्लांनी जन्म घेतल्याचा आनंद राजा दशरथांना इतका झाला की, त्यांनी राजधानीत विविध दान करत तिजोरी सात वर्षांपर्यंत सर्वांसाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी श्रीरामजन्माच्या आनंदात सर्वांना सामावून घेतले होते. वरिष्ठ ऋषींनी श्रीरामांचा नामकरण संस्कार विधीवत केला. या सोहळ्याची स्मृती जागवत श्रीराम नवमीस प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव सोहळा आजही मोठ्या उत्साहात श्रध्देने साजरा केला जातो.

नामकरण हा भारतीय संस्कृतीतील सुंदर संस्कार असून हा बाळाच्या गुणांचे दर्शन घडवतो. श्रीराम हे आनंदाचे स्त्रोत आहेत. त्यांची माता कौसल्या या स्वतः त्याग करत इतरांना प्रसन्न ठेवण्यात धन्यता मानतात. मातेचा हाच गुण श्रीरामांमध्ये उतरलेला आहे. माता सुमित्रा सेवा आणि सहयोगाचा संस्कार मुलगा लक्ष्मण याच्यावर करते. त्यामुळे लक्ष्मण श्रीरामाची सेवा करत त्यांना सहयोग देण्यात जीवन समर्पण करतो. पित्याच्या आशीर्वादात खूप शक्ती असते. पित्याने केलेले संस्कार जीवनभर प्रेरणा देतात. माता-पित्यांकडून आलेले गुण लगेच दिसून येतात. आज भक्तीम ार्गात असलेल्यांकडे पहा म्हणजे लक्षात येईल. आपण जे उत्तम काम करतो ते आपल्या जन्मदात्या माता-पित्यांच्या आशीर्वादानेच! गर्भवती मातेच्या विचारांचा प्रभाव तिच्या गर्भातील बाळावर पडतो. सुसंस्कारासाठी मातेच्या मनातील भाव-विचार उत्तम असले पाहिजेत. उत्तम प्रजेच्या निर्मितीसाठी महिलांचे उत्तम रक्षण करणे महत्वाचे ठरते. महिलांकडूनच मुलांवर उत्तम संस्कार होतात. कुंभकर्णासारखे गाढ निद्रेचा आनंद घेणारे आज बरेच लोक आहेत. हे लोक अध्यात्मिक आनंद कधीच घेऊ शकत नाहीत! राक्षसांना माहित होते की आपले जीवन झोपा काढण्यासाठी नाही म्हणूनच त्यांनी कठोर तपश्चर्या करत देवतांना प्रसन्न करून घेत वरप्राप्तीचा आनंद मिळविला. जे राक्षसांना कळते ते आज माणसांना कळत नाही ही वस्तुस्थिती आहे.

देव आहे का? असे विचारणारे महाभाग आहेतच ना! राक्षस मायावी होते तसे ते कपटीही होते. आजही नात्यांमध्ये, शेजार्‍यांशी, मित्रांशी कपटाने वागणारे लोक दिसतातच ना! नात्यांमधील प्रेमाची परिभाषा वेगळीच असते. नाते उत्तम रहाण्यासाठी एकमेकांजवळ निरपेक्ष सेवाभावाने येत जावे. प्रसंगानुरूप उपयुक्त भेटवस्तू देत जावी. दोन शब्द आपलेपणाच्या मायेने गोड बोलत जावे. सुखासारखीच दुःखातही सोबत करावी. एकमेकांना वेळ द्यावा. दिलखुलास गप्पा कराव्यात. नात्यांची भाषा समजून घेतली की नात्यांमधील आनंद लगेच व्दिगुणीत होईल. प्रभू श्रीरामांना ३५३ माता होत्या. भाऊ, मंत्रीगण, प्रजा यामधून सीतामाईला देण्यास वेळच नसल्याने १४ वर्षांचा वनवासकाळ आला. चित्रकूट येथे प्रभू श्रीराम आणि सीतामाईंपासून लक्ष्मण थोडे दूर राहिलेले दिसतात. तारका राक्षसीण आणि तिचे पुत्र मारिच व सुबाहू हे यज्ञात विघ्न आणत असल्याने विश्वाचे भले करणारे विश्वामित्र ऋषी अयोध्या नगरीत येवून राजा दशरथाकडून श्रीरामाला मागवून घेतात. श्रीराम या राक्षसांचा वध करत यज्ञ सिध्दीस जाण्यास मदत करतात. भावांनी एकमेकांशी कसे वागावे? नाते कसे जपावे? त्याग कसा करावा? सेवा कशी करावी? श्रध्दा कशी असावी? वरिष्ठांचा आदर कसा ठेवावा? आई-वडिलांची आज्ञा कशी पाळावी? कोणत्याही परिस्थितीत कोणालाही कधीही दुखवू नये, हे रामायण आपल्याला शिकवते म्हणूनच श्रीराम कथा महोत्सव वारंवार आयोजित केले तरी भाविकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद लाभतोच, असे श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी यांनी सांगितले.