सशस्र दरोडा टाकणारी टोळी २४ तासांत केली जेरबंद

0
12

२ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; ४ गुन्ह्यांची दिली कबुली

नगर  – पारनेर तालुयातील रांजणगांव मशिद शिवारात सोमवारी (दि.१५) पहाटे धारदार हत्यारांसह सशस्र दरोडा टाकत २ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा ऐवज घरातील कुटुंबियांना मारहाण करत पळवून नेणार्‍या ६ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले असून या टोळीने ४ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पकडलेल्या टोळीकडून २ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रांजणगांव मशिद शिवारात जवक वस्तीवर वसंत गणपत जवक हे कुटूंबियासह घरात झोपलेले असताना अनोळखी ६ दरोडेखोरांनी त्यांचे खोलीचे लोखंडी दरवाजाची कडी उघडुन आत प्रवेश केला व जवक यांच्यासह कुटूंबियांना लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण व जखमी करुन घरातील २ लाख ४८ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर घरगुती साहित्य चोरी करुन नेले होते. याबाबत सुपा पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांनी पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, समाधान भाटेवाल व अंमलदार भाऊसाहेब काळे, बबन मखरे, रविंद्र कर्डीले, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संदीप चव्हाण, भिमराज खर्से, संदीप दरंदले, फुरकान शेख, मच्छिंद्र बर्डे, रविंद्र घुगांसे, रोहित येमुल, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाणे, जालिंदर माने, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर व महिला अंमलदार भाग्यश्री भिटे व ज्योती शिंदे अशांची २ विशेष पथके तयार केली होती. या पथकांनी फिर्यादी व त्यांचे कुटूंबियाकडुन आरोपींचे वर्णन, आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत याबाबत माहिती घेवुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे तपास करताना पो.नि.दिनेश आहेर यांना वरील गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी रमेश भोसले (रा. कामरगांव, ता. नगर) याने त्याचे इतर साथीदारासह केला असुन आरोपी कामरगांव शिवारातील नगर पुणे रोडवरील हॉटेल संतोष जवळ येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.त्यामुळे पो. नि.आहेर यांनी तात्काळ तपास पथकांना तिकडे रवाना केले. या पथकाने कामरगांव शिवारातील हॉटेल संतोष येथे सापळा लावुन थांबलेले असताना थोड्याच वेळात विठ्ठलवाडी रोडने १ संशयीत इसम पायी येताना पथकास दिसला.

पथकाची खात्री होताच त्यास ताब्यात घेण्याचे तयारीत असताना संशयीतास पोलीस पथकाची चाहुल लागुन तो पळुन जावु लागला. पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले असता तो रमेश ऊर्फ मुकेश सिताराम भोसले (वय ३०, रा. विठ्ठलवाडी रोड, कामरगांव, ता. नगर) हा असल्याचे समोर आले. त्याच्या कडे कसून चौकशी केल्यावर त्याने इतर साथीदार दिनेश भोसले, सागर भोसले, शशिकांत भोसले, वसिम भोसले, राहुल भोसले (सर्व रा. विठ्ठलवाडी रोड, कामरगांव शिवार, ता. नगर) व पायल काळे (रा. भोरवाडी, ता. नगर) अशा सर्वांनी मिळुन रांजणगांव मशिद, ता. पारनेर येथील एका घरात जावुन घरातील लोकांना लाकडी दांडके व कत्तीने मारहाण करुन चोरी केल्याचे सांगितले. या पथकाने कामरगाव शिवारातून इतर ५ जणांना ताब्यात घेतले. मात्र पायल काळे हा मिळुन आला नाही. या आरोपींनी घराच्या परिसरात लपवून ठेवलेले चोरीतील दागिने, रोख रक्कम, पल्सर मोटार सायकल, २ लोखंडी कत्ती व १ लोखंडी तलवार असा एकुण २ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.