लोकसभेची होऊ घातलेली निवडणूक ही कोणा व्यक्तीची, पक्षाची नव्हे तर विचारांची लढाई आहे .

0
46

खा. सुजय विखे यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे: खा. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन

नगर – देशात होऊ घातलेली लोकसभेची निवडणूक ही कोणत्या व्यक्तीची, पक्षाची नाही तर ती विचारांची लढाई आहे. गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी कामे केली, ती मागील अनेक वर्षात झाली नाहीत. त्यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या मार्गाने चालत असून, देशाकडे पाहण्याचा जगभराचा दृष्टिकोन बदलला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आज प्रत्येक कार्यकर्ता उभा आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे काम शिंदे यांनी केले आहे. विचार महत्त्वाचा असतो, व्यक्ती नाही. त्यामुळे बाळासाहेबांचे कडवट हिंदुत्वाचे विचार घराघरात पोहचवण्याचे काम शिवसैनिक करत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना नेते खा. श्रीकांत शिंदे यांनी केले. नगरमधील माऊली संकुलात शनिवारी (दि. २३) शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी ना. दादा भुसे, खा. सुजय विखे, भाऊ चौधरी, जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, बाबूशेठ टायरवाले, शहरप्रमुख दिलीप सातपुते, सचिन जाधव, माजी महापौर शिलाताई शिंदे, संजीव भोर, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना खा. शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात विकासाची कोणतीच कामे झाली नाहीत. स्वतःचा विचार बाजूला ठेवून सत्तेच्या लालसेपायी त्यांनी अविचारी लोकांबरोबर आघाडी केली. त्या काळात कोणतेही निर्णय आपण आपल्या मनाने घेऊ शकत नव्हतो. हिंदू सण, मंदिरे बंद करण्याचे काम या काळात या महाराष्ट्रात झाले. ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचे विचार पेरत होते त्याच शिवतीर्थावर सत्तेच्या लालसेपोटी अविचारी लोकांबरोबर जाऊन दोन दिवसांपूर्वी त्यांचे स्वागत करताना ते दिसले. त्यांच्या आजूबाजूला स्टॅलिन, ओमर अब्दुल्ला, फारुक अब्दुल्ला बसलेले सगळ्यांनी पाहिले. आपण स्वप्नातही विचार केला नव्हता की कधी काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल. परंतु आज त्यांच्याचबरोबर इंडी आघाडी बनून ते वावरत आहेत. सावरकरांना शिव्या घालणार्‍या लोकांबरोबर ते आज दिसतात. हे दुर्देवी चित्र आज पहायला मिळत आहे, असे टीकास्त्र खा. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता सोडले. या निवडणुकीत महायुती आणि नरेंद्र मोदींसाठी आपल्याला पुन्हा एकदा चांगले काम करायचे आहे. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याचा महत्त्वाचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला आहे. या जिल्ह्यात अनेक कामे मागील काही दिवसात झाली आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राला चांगले दिवस आले आहेत. १८ ते २० तास काम करणारा पहिलाच मुख्यमंत्री राज्याला भेटला आहे. त्यांच्या हातून सर्वसामान्यांसाठीचे काम चालू आहे. शेतकर्‍याच्या पोटी जन्मलेला, रिक्षा चालवणारा एक माणूस राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राने पाहिले आहे. लोकसभेची निवडणूक व्यक्तीची नव्हे तर विचारांची निवडणूक असून, कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. देशात ‘अबकी बार चारसोपाच पार’ व राज्यात ‘पैतालीस पार’ हा आकडा गाठायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच आपल्या सर्वांच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. त्यासाठी महायुतीची, मोदींची कामे लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत. सुजय यांच्या नावातच जय असल्याने त्यांचा विजय घडवून आणायचा आहे. महायुतीची प्रत्येक जागा जिंकून आणायची आहे आणि तीही मोठ्या फरकाने. त्यासाठी एकदिलाने काम करावे, असे आवाहन करतानाच लोकसभेच्या निवडणुकीनंतर होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभेच्या निवडणुकाही आपण मोठ्या फरकाने जिंकू शकतो, असा विश्वास खा. शिंदे यांनी केला. सुजय विखे यांच्या विजयात शिवसेना सिंहाचा वाटा उचलेल ः ना. दादा भुसे यावेळी बोलताना ना. दादा भुसे म्हणाले की, सुजय विखे यांच्या विजयात यावेळी भाजपपेक्षाही शिवसेना सिंहाचा वाटा उचलेल. मुख्यमंत्री शिंदे जीवाचे रान करून काम करत आहेत. आतापर्यंत ‘वर्षा’ची दारे सर्वसामान्यांसाठी खुली नव्हती ती आता राज्यातील गोरगरिबांसाठी, कार्यकर्त्यांसाठी नेहमीच खुली आहेत. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांची प्रथा-परंपरा पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत. ज्या-ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत, तेथे मोदीच उमेदवार असल्याचे ठरवून त्यांच्या विजयासाठी प्रत्येकाने काम करावे. विखेंना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कष्ट करावे. स्व. अनिल राठोड आज हयात असते तर त्यांनीही मुख्यमंत्र्यांनाच साथ दिली असती. या निवडणुकीत किंतु-परंतु बाजूला ठेवून महायुतीचा विजय करायचा आहे आणि मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करताना या जिल्ह्याचा बुलंद आवाज पुन्हा संसदेत पाठवायचा आहे. त्यासाठी शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. शिवसैनिक हा शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे विखे पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकास पाहिजे असेल तर मोदींशिवाय व महायुतीशिवाय पर्याय नाही ः खा. सुजय विखे यावेळी बोलताना खा. सुजय विखे म्हणाले की, शिवसेना आणि विखे परिवाराचे जुने नाते आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेने विखे परिवाराला नेहमीच ताकद दिली आहे. मी खासदार होण्यात शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे. अहिल्यानगर जिल्हा हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्हा आहे. नगरचे नाव अहिल्यानगर करण्याबाबतचा दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी खरा करून दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. मागच्या दीड वर्षात जे काम झाले ते गेल्या ३५ वर्षातही झाले नाही. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने जिल्ह्यात ३ एमआयडीसींना मंजुरी मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या काळात जिल्ह्यात एकही विकास काम झाले नाही. आज महायुतीचा उमेदवार ठरलेला असताना समोरचा उमेदवार अजून ठरत नाही. माझ्या भूमिकेला काहीजण विरोध करतात, परंतु वेळ आल्यावर सगळ्यांच प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत आणि ती मी देणार. एखाद्या परिवाराच्या पाठीशी जिल्ह्यातील जनता गेली ५० वर्षे उभी राहत असेल तर त्यापाठीमागे काहीतरी विचार असेलच ना. त्यांचे काहीतरी काम असेलच ना! म्हणूनच चौथ्या पिढीलाही या जिल्ह्याने सत्तेवर बसवले आहे. जिल्ह्यात १० हजार कोटीची कामे झाली. विकास पाहिजे असेल तर मोदींशिवाय व महायुतीशिवाय पर्याय नाही. महायुती ही अर्थकारणाने झालेली नाही. राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी महायुती अस्तित्वात आलेली आहे. निवडणूक कोणाविरुद्ध कोण याचा महत्त्व नसून, ही निवडणूक विचारांची आणि विकासाची निवडणूक आहे. स्थानिक पातळीवर असलेले पक्षांतर्गत मतभेद बाजूला ठेवून आपल्या सर्वांना पुढे चालायचे आहे. असलेले मतभेद, मनभेद एकत्र बसून तोडगा काढून ते मिटून आपल्याला मोदींच्या पाठीशी उभे राहायचे आहे, असे आवाहन खा. विखे यांनी केले