भाजप कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करणाऱ्या ‘आम आदमी’च्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

0
35

नगर – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ नगर शहरातील भाजप कार्यालय समोर घोषणाबाजी करणार्‍या आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (दि.२१) रात्री ईडीने अटक केली आहे. त्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. आप चे कार्यकर्ते ठिकठिकाणी भाजपाच्या कार्यालयांच्या बाहेर निदर्शने, आंदोलने करत आहेत. नगरमध्येही शुक्रवारी (दि.२२) दुपारी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शहर भाजपच्या गांधी मैदानाजवळ असलेल्या कार्यालयाबाहेर जमा झाले व त्यांनी केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यातील जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव, मनोजकुमार गोपाळे, भरत खाकाळ, संतोष नवलखा, भैरवनाथ भारस्कर, सुभाष केकाण, राजेंद्र कर्डिले, गणेश मारवाडे व इतर ४ ते ५ कार्यकर्ते यांच्यावर जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी भा.दं. वि. कलम १८८, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.