वॉचमनचे हातपाय बांधून शोरूम फोडणारे सराईत चोरटे पकडले

0
30

नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जेऊर जवळील धनगरवाडी येथील शोरूमच्या वॉचमनचे हातपाय बांधुन शोरूम मधून १ लाख ५५ हजारांचा ऐवज चोरून नेणारे ३ सराईत चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले असून त्यांच्याकडून चोरीतील १७ पैकी १० एलईडी टीव्ही हस्तगत केले आहेत. धनगरवाडी येथील सोपान भिकाजी शिकारे यांचे शुभम ट्रेडर्स नावाचे शोरुम १९ मार्च रोजी पहाटे च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडून शोरुम मधील कामगार बाबुलाल राजभर याचे हातपाय पॅकिंग पट्टयांनी बांधुन शिवीगाळ, मारहाण करुन शोरुममधील १ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे पीएचएस, सॅमसंग कंपनीचे १७ एलईडी व तांब्या पितळाचे भांडे बळजबरीने चोरुन नेले होते. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. सदर घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पो.नि. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील स.पो.नि. हेमंत थोरात तसेच अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, आकाश काळे, देवेंद्र शेलार, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे, भाऊसाहेब काळे व संभाजी कोतकर यांचे पथक नेमून तपास सुरु केला. या पथकाने घटना ठिकाणचे व आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्ह्याचा तपास सुरु केला तसेच रेकॉर्डवरील अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपीची माहिती घेत असताना पथकास वरील प्रमाणे दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी प्रविण काळे (रा. छत्रपती संभाजीनगर) याने त्याचे साथीदारांसह केला असुन तो फोर्ड फियागो गाडीत शुभम ट्रेडर्समधील चोरी केलेल्या मालापैकी काही एलईडी विक्री करण्यासाठी नगर – छत्रपती संभाजीनगर रोडवरील पांढरीपुल येथे साथीदारांसह येणार आहे अशी माहिती मिळाली. या पथकाने लागलीच त्या ठिकाणी जावुन पहाणी करता १ फोर्ड फियागो वाहन रस्त्याचे कडेला उभे असलेले पथकास दिसले. पथकातील स.पो. नि.थोरात यांनी काही अंमलदारांना बनावट ग्राहक म्हणुन संशयीतांशी संपर्क करण्यास सांगितले. त्यावर पथकातील अंमलदारांनी सदर फोर्ड फियागो वाहनाजवळ जावुन संशयीतांशी चर्चा करुन एलईडी खरेदी करण्याची तयारी दाखवताच संशयीतांनी एलईडी कमी किंमतीत देण्याची तयारी दाखवल्याने पथकाची खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेतले. प्रविण श्रीधर काळे (वय २४, रा. भेंडाळा, ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर), ज्ञानेश्वर मनोहर जाधव (वय २८) व संतोष अशोक कांबळे (वय २३, दोन्ही रा. वाळुंज, ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे एलईडीबाबत विचारपुस करता त्यांनी शुभम ट्रेडर्स येथुन चोरी केले असुन विक्री करता आणलेले आहेत असे सांगितले या आरोपींना १० एलईडी टीव्ही, फोर्ड फियागो कंपनीची गाडी असा एकुण ५ लाख ४० हजार रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.