श्रीनिवास कल्याणोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

0
41

श्री तिरुपती बालाजी, पद्मावती देवी व महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मुर्त्यांचे नगर शहरात आगमन

नगर – आंध्रप्रदेश येथील तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थानचा श्रीनिवास कल्याणोत्सव सोहळ्याचे आयोजन नगरमध्ये २७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. श्री बालाजींच्या श्रीनिवास कल्याणोत्सव (विवाह) सोहळ्यासाठी आज सायंकाळी तिरुपती येथील मंदिरातील मुख्य गाभार्‍यातील श्री तिरुपती बालाजी, पद्मावती देवी व महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मुर्त्यांचे आगमन नगरमध्ये होणार आहे. या सोहळ्यासाठी पुना रोड वरील शिल्पा गार्डन येथील तयारी अंतिम टप्यात आहे. यासाठी शिल्पा गार्डन येथे ६० बाय ४० फुटाचे भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. याठिकाणी हजारो भाविकांची दर्शनाची सोय करण्यात आली आहे. हा सोहळा सर्व भाविकांसाठी मोफत असणार आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील भाविकांनी या सोहळ्याचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक व तिरुमला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांनी केले आहे. संयोजन समितीचे संजय ताथेड म्हणाले, नगरमध्ये प्रथमच होणार्‍या या श्री बालाजींच्या श्रीनिवास कल्याणोत्सव सोहळ्यासाठी नगरचे सौरभ बोरा यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. यानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी नगर शहरात भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शिल्पा गार्डन परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली असून स्टेज उभारण्यात आले आहे. तसेच भाविकांना देण्यात येणारा तिरुपती येथील लाडू प्रसाद काउंटर, पोंगल प्रसाद काउंटर, चप्पल स्टँड आदी उभारणी करण्यात आली आहे.

भाविकांच्या चार चाकी व दोन चाकी गाड्यांसाठी मोठे पार्किंग करण्यात आले आहे. आलेले भाविक प्रसाद व दर्शन घेवून कमीत कमी वेळेत परत बाहेर पडतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. येणार्‍या व जाणार्‍या भाविकांसाठी वेगवेगळे द्वार करण्यात आले आहे. श्री बालाजींच्या श्रीनिवास कल्याणोत्सव सोहळ्यानिमित्त मंगळवारी दुपारी ४ वाजता बडीसाजन मंगल कार्यालय ते शिल्पा गार्डन दरम्यान भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत आकर्षक सजवलेल्या रथात श्री तिरुपती बालाजी, पद्मावती देवी व महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मुर्त्या ठेवण्यात येणार आहेत. या महाराष्ट्र व दक्षिण भारताच्या परंपरेप्रमाणे ही शाही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात नागरिक व महिला पारंपारिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता देवाच्या विवाह सोहळा विधीस सुरुवात होणार आहे. सुमारे दोन ते अडीच तासाचा हा धार्मिक विधी आहे, अशी माहिती नियोजन समितीचे सुधीर मुनोत यांनी दिली. सोहळा यशस्वी होण्यासाठी ३०० सेवेकरी स्वयंसेवक, ३०० कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. यासाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, पोलीस अधिक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त पंकज जावळे यांचे सहकार्य होत आहे. तसेच याठिकाणी तातडीच्या सेवेसाठी डॉटर, प्रथमोपचार व रुग्णवाहिका, अग्निशमन गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. नियोजन अनिल लुंकड, किरण राका, अनिल शर्मा, अनिल पोखरणा, अजित बोथरा, नरेंद्र बाफना, अमित मुथा, आशिष खंडेलवाल, पियुष मुथा, अभिजीत कोठारी, महेश गुगळे व धनेश कोठारी आदींसह सदस्य करत आहेत.