मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
39

आपण झोपतो म्हणजे काय?

झोप झाल्यावर माणूस ताजातवाना होतो. रोज आपण दिवसभराच्या परिश्रमानंतर झोपी जातो व सकाळी उठून परत कामाला लागतो. झोप न मिळाल्यास काय होते हे तुम्ही अनुभवले असेलच. आपण चिडचिडे होतो, कामात लक्ष लागत नाही, डुलया येतात, कधीकधी चक्कर येते. यावरून झोप घेणे ही अपरिहार्य गोष्ट आहे, हे आपल्या लक्षात येईल. लहान मुले १६ ते १८ तास झोपतात. या काळात अपचयाचा दर कमी असतो व मुलांची वाढ होते. हळूहळू झोप कमी होते. तरुण व्यक्तींना ७ ते ८ तास झोप आवश्यक असते. वृद्धावस्थेत मात्र ५ ते ६ तास झोपही पुरते. सहसा दुपारी झोपू नये. नुसते पडून राहणे म्हणजे झोप नव्हे, हे तुम्हाला माहीत आहे. झोपेचे इलेट्रो एनकेफॅलोग्रॅम वा मेंदूच्या कार्याच्या आलेखाद्वारे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की, या काळात मेंदूच्या येणार्‍या लहरी कमी होतात; पण त्यांची उंची वाढते. नंतरच्या अवस्थेत डोळ्यांच्या जलद हालचाली होतात व मेंदूतून येणार्‍या लहरींची संख्या वाढते. या लहरींची उंची कमी असते. झोपेच्या एका चक्रात डोळ्यांची जलद हालचाल न होणारी झोप व डोळ्यांची जलद हालचाल होणारी झोप अशा दोन अवस्था असतात. एकदा प्रौढ माणूस झोपल्यावर अशी ४ ते ५ चक्रे त्यात असतात. या प्रत्येक चक्राचा कालावधी दीड तासांचा असतो. झोप ही लंबमज्जेतील चेतातंतूंवर अवलंबून असते. त्यामुळे या भागाला इजा झाल्यास वा त्यावर परिणाम झाल्यास खूप झोप येते वा येतच नाही. हे जरी खरे असले तरी सामान्यतः जास्त झोप हा सवयीचाच परिणाम असतो. त्यामुळे योग्य सवय लागल्यास झोप कमी होते. झोप ही जीवनासाठी आवश्यक असते, कारण या काळात शरीराला विश्रांती मिळते. श्वसन व रक्ताभिसरणाचे कार्यही मंदावते. अशी ही झोप जास्त झाली, तर मात्र ‘झोपाळूपणाचा’ आरोप येतो आणि खूप कमी झाली तरी चिंता वाटते.