मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
30

आपण बोलतो कसे?

लहानपणापासून आपण बोलत असतो, बोललेले ऐकत असतो. हे इतया सवयीचे झालेले असते, की आपण काही विशेष वेगळी क्रिया करत आहोत, हे जाणवतही नाही; पण ज्यावेळेस आवाज बसतो त्यावेळेस बोलण्याची क्रिया कशी होत असेल, असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. आवाजाच्या निर्मितीत पोटाचे स्नायू, छाती व पोट यांच्यामधील पडदा, फुफ्फुस, स्वरयंत्र, घसा, नाक, तोंड या अवयवांचा सहभाग असतो. यातही स्वरयंत्रांचे काम महत्त्वाचे असते. उत्क्रांतीमध्ये स्वरयंत्राचा विकास होऊन बोलणे हे कार्य मानवात स्वरयंत्र करू लागले. बोलण्याच्या क्रियेत सर्वप्रथम मेंदूतील वाचाकेंद्रातून आज्ञा येते. त्यानुसार स्वरयंत्राची स्वरतंतूची हालचाल होऊन आपण बोलावयास लागतो. फुफ्फुसातील हवेचा वापर यासाठी केला जातो. तसेच वर सांगितल्याप्रमाणे घसा, टाळू, दात, ओठ, नाक व जिभेच्या सहाय्याने वेगवेगळ्या शब्दांची निर्मिती केली जाते. जसे कंठ्य शब्द क, ख, ग. इ; तालव्य शब्द ट, ठ, ड; दंत्य शब्द त, थ, द; ओष्ठ्य शब्द प, फ आणि अनुनासिक शब्द ञ वगैरे. अशा प्रकारे आपण बोलतो. वरीलपैकी कशात बिघाड झाला, म्हणजे वाचाकेंद्र, आज्ञावहन करणारे चेतातंतू, स्वरयंत्रातील स्वरतंतू आणि घसा, जीभ वगैरे अवयव यात बिघाड झाल्यास वा या ठिकाणी व्याधी झाल्यास बोलण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊन आवाज पूर्ण बंद होणे, अडखळत बोलणे अशी लक्षणे निर्माण होतात.