आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत नगरकरांना सुविधा देणार : डॉ रेवती पैठणकर

0
50

डॉ. रेवती पैठणकर यांचे प्रतिपादन; सावेडीत गुलमोहोर रोडवर भगिनी निवेदिता सहकारी बँक शाखेचे उद्घाटन

नगर – पुण्यासारख्या शहरात गेल्या ५१ वर्षांत सर्वस्तरातील लाखो व्यक्ती, उद्योग, संस्थांना आर्थिक पाठबळ देऊन सर्वांसाठी महिलांनी चालविलेली सहकारी बँक अशी ख्याती असलेली ‘भगिनी निवेदिता सहकारी बँक’ नगरकरांच्या सेवेत रुजू होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत डिजिटल बँकिंगच्या सुविधा नगरकरांना देणार, असे प्रतिपादन बँकेच्या अध्यक्ष सीए डॉ.रेवती पैठणकर यांनी केले. सावेडी उपनगरात गुलमोहोर रोडवर भगिनी निवेदिता सहकारी बँकेची १९ वी व नगरमधील पहिल्या शाखेचे उद्घाटन खातेदारांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षा सीए डॉ. रेवती पैठणकर, उपाध्यक्षा सीएमए डॉ. नेत्रा आपटे, माजी अध्यक्षा जयश्री कुरुंदवाडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे व संचालक उपस्थित होते. डॉ. नेत्रा आपटे म्हणाल्या, ‘महिलांनी सर्वांसाठी चालविलेली सहकारी बँक’ असे बिरूद मिरवणार्‍या पुण्यातील भगिनी निवेदिता सहकारी बँकेची नवी शाखा अहमदनगर येथे सुरु झाली आहे. १९७४ मध्ये स्थापना झालेल्या पुण्यातील या अग्रेसर सहकारी बँकेने गेल्या ५१ वर्षांत चांगली सेवा देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळेच बँकेचा विस्तार होत आहे. यावेळी स्मिता देशपांडे यांनी अहमदनगरमधील महिला, उद्योजक, नोकरदार, व्यावसायिकांनी शाखेला भेट देऊन येथील सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करुन आभार मानले. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यास अहमदनगर शहरातील व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार व नागरिक उपस्थित होते.