नगरमध्ये २२ जानेवारीला हनुमान चालिसा, भजन संध्या व रामायण नाट्य सादरीकरण

0
22

राम मंदिर लोकार्पणानिमित्त दिपोत्सव, दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळाचे आयोजन

श्रीराम जन्मभूमी अयोध्येत २२ जानेवारी रोजी भव्य दिव्य राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. देशाच्या इतिहासातील हा ऐतिहासिक सोहळा ठरणार असून देशभरात प्रभू श्रीरामांचा जयघोष सुरु झाला आहे. या सोहळ्यानिमित्त नगरमध्ये श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळाने सावेडीतील जॉगिंग ट्रॅक मैदानावर २२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ ते रात्री ११ यावेळेत हनुमान चालिसा पाठ, भजन संध्या व रामायण नाट्य सादरीकरण कार्यक्रम आयोजित केला आहे. नगरमधील तमाम प्रभू श्रीराम भक्तांसाठी ही मोठी धार्मिक पर्वणी ठरणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत हेडा यांनी दिली. मंडळाचे उपाध्यक्ष रमेश शहाणे व सचिव सुनिल जांगीड यांनी सांगितले की, प्रभू श्रीराम हा भारतीय संस्कृतीचा आदर्श आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम शेकडो वर्षानंतर आपल्या जन्मस्थानी अयोध्येतील मंदिरात विराजमान होत आहेत हा प्रत्येकासाठी सोनेरी क्षण आहे. राम मंदिर लोकार्पणाचा हा सोहळा अधिक संस्मरणीय होण्यासाठी विशेष हनुमान चालीसा पाठ, भजन संध्या तसेच श्रीरामकथेचे नाट्य सादरीकरण होणार आहे. याशिवाय दीपोत्सव आणि एलईडी स्क्रिनवर अयोध्येतील मंदिर लोकार्पण सोहळ्याची चित्रफितही दाखवली जाईल. श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ नगरमध्ये गेल्या २४ वर्षांपासून हनुमान चालिसा पाठ कार्यक्रम आयोजित करते. हजारो नगरकर यात उत्साहात सहभागी होतात. श्रीराम मंदिर लोकार्पणानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमास नगरकर रामभक्तांनी हजेरी लावण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.