‘महेश पतसंस्थे’चे निम्म्याहून अधिक सभासद मतदानापासून राहणार वंचित

0
20

प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध, शेअर्स पूर्णत्वासाठी मुदतवाढीची मागणी

भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, त्यात १७०३ सभासद मतदार मतदानासाठी पात्र ठरले आहेत. त्यानंतर विहित मुदतीत ४१ सभासदांनी आपल्या शेअर्सची पूर्ण रक्कम भरल्याने त्यांचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार आहे. तथापि सुमारे २१०० सभासदांनी आपल्या शेअर्सची रक्कम पूर्ण न भरल्याने ते या निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे निवडणूक प्राधिकरणाने शेअर्सची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सभासदांमधून होत आहे. तालुका कार्यक्षेत्र असलेल्या महेश नागरी पतसंस्थेची सन २०२३-२४ ते २०२८-२९ या पंचवार्षिकसाठी संचालक मंडळ निवडणूक होत आहे. १७ जागांसाठी ही निवडणूक होत असून, त्यात सर्वसाधारण मतदारसंघ- १२, महिला राखीव- २, अनु. जाती-जमाती- १, इतर मागास प्रवर्ग- १ आणि भटया विमुक्त जाती जमाती- १ अशा जागांचा समावेश आहे. सदर निवडणुकीसाठी तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था शुभांगी गोंड यांनी २ जानेवारी रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. सदर यादीवर हरकतीसाठी ८ जानेवारीपर्यंत मुदत होती. या मुदतीत केवळ एकच हरकत दाखल झाली असून, सभासदांच्या शेअर्सची रक्कमेसंदर्भात ही हरकत होती. प्रारुप मतदार यादीत १७०३ सभासद पात्र ठरले तर हरकतीच्या मुदतीत आणखी ४१ सभासदांनी आपल्या शेअर्सची रक्कम १००० रुपये पूर्ण भरली आहे. तथापि अजूनही सुमारे २१०० सभासदांकडे ५०० रुपयांचाच शेअर्स असून त्यांना १००० रुपये पूर्ण रकमेचा शेअर्स करण्यासाठी प्रशासनाने मुदत द्यावी, अशी मागणी होत आहे. कारण जेवढे सभासद पात्र ठरले आहेत त्यापेक्षा जास्त सभासद अपूर्ण शेअर्स रकमेमुळे मतदानासाठी अपात्र ठरले आहेत. प्राधिकरणाने प्रारुप यादीसंदर्भात प्रसिद्ध केलेली जाहिरात अनेक सभासदांच्या वाचण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना आपला शेअर्स पूर्ण भरता आलेली नाही. त्यामुळे मतदानापासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली असून, शेअर्सची रक्कम पूर्ण करण्यासाठी सभासदांना मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे. अंतिम मतदार यादी १२ जानेवारीला प्रसिद्ध होणार असून, तत्पूर्वी याबाबत निर्णय अपेक्षित आहे.