डायल ११२ नंबरवरून मिळाली घरात गांजा ठेवल्याची खबर

0
22

पोलिसांनी पाईपलाईन रोडवर छापा टाकून एकाला पकडले

डायल ११२ नंबरवरून माहिती दिल्यानंतर तोफखाना पोलिसांनी एका घरातून ८ हजार रूपये किमतीचा ८०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी अशोक गंगाराम कांबळे (वय ३७ रा. चिंचोडी पाटील ता. नगर, हल्ली रा. मोकाशे वस्ती, वाणीनगर, पाईपलाईन रस्ता, सावेडी) याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार गोरख धाकतोडे यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. ८) पहाटे ही कारवाई करण्यात आली. अंमलदार धाकतोडे यांच्यासह पोलीस अंमलदार गोपी क्षिरसागर हे रविवारी (दि. ७) रात्री हद्दीत गस्त घालीत असताना त्यांच्याकडील एमडीटी मशीनवर डायल ११२ नंबरवरून एक व्यक्तीने फोन करून शेजारी असलेल्या घरात गांजा ठेवला असल्याची माहिती दिली. पोलिसांनी सदरची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना कळवून सोमवारी पहाटे चारच्या सुमारास वाणीनगर येथील संतोष मोकाशे यांच्या भाडोत्री खोलीमध्ये राहत असलेल्या अशोक कांबळे याच्या खोलीत तपासणी केली असता त्याच्याकडे ८०० ग्रॅम गांजा व गांजा पिण्याची चिलीम मिळून आली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून कांबळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.