जलवाहिनीचा ‘वॉल्व्ह’ फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी

0
52

परिसरातील रस्त्यांवर साचले पाण्याचे तळे; महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

शहरातील नागापूर उपनगरातील विविध भागांना पाणी पुरवठा करणार्‍या शहर पाणी योजनेच्या जलवाहिनीचा वॉल फुटल्याने सोमवारी (दि.८) दुपारपासून लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे या परिसराला मंगळवारी (दि.९) पाणी पुरवठा होऊ शकला नाही. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाला २४ तास उलटल्यावर जाग आली आणि पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांनी दुरुस्तीचे काम सुरु केले. मात्र तोपर्यंत परिसरातील रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले होते. नागापूर परिसरात असलेल्या चैतन्य लासिक हॉटेल जवळ जलवाहिनी वरून अवजड वाहन गेल्याने जलवाहिनी व वॉल सोमवारी (दि.८) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास फुटला. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याची गळती सुरु झाली. दुपारपासून रात्रभर या ठिकाणी पाण्याची गळती सुरु होती.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया गेले. मंगळवारी (दि.९) दुपारी उशिरा महापालिका पाणी पुरवठा विभागाचे काही कर्मचारी तेथे आले व त्यांनी पाणी गळती थांबविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले होते. परिसरातील रस्त्यांवरून हे पाणी वाहिल्याने रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले होते. या ठिकाणाहून काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेजकडे जाणार्‍या रस्त्याची अगोदरच मोठी दुरावस्था झालेली आहे. जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यातच जलवाहिनीतून गळती होणारे पाणी साचल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सदर ठिकाणचा वॉल वारंवार नादुरुस्त होत असून तेथे नेहमीच पाण्याची गळती सुरु असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही. महापालिका प्रशासनाने या ठिकाणी कायमस्वरुपीच्या उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना होणार्‍या त्रासातून मुक्तता द्यावी अशी मागणी केली जात आहे.